अभिजात नाट्यकलेचे प्रेरणास्थान- गोविंद देवल

प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या नाट्यप्रवासाचा हा संक्षिप्त आढावा

अभिजात नाट्यकलेचे प्रेरणास्थान- गोविंद देवल मुख्य फोटो
मुख्य फोटो

प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक. सांगली संस्थानातील हरिपूर येथे १३ नोव्हेंबर १८५५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बल्लाळ ऊर्फ बाळाजीपंत संस्थानी नोकर होते. देवलांचे ज्येष्ठ बंधू कृष्णाजीपंत ह्यांचा संगीतशास्त्राचा मोठा व्यासंग होता. मधले बंधू रामभाऊ हे त्या काळी प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीकर नाटक मंडळीतील एक उत्तम नट होते. देवलांचे मराठी शिक्षण प्राथमिक शाळेत आणि संस्कृतचे अध्ययन खाजगीरीत्या हरिपूरला झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूर व बेळगाव येथे झाले. सन १८७८ मध्ये ते मॅट्रिक झाले. बेळगावच्या रहिवासात सुप्रसिद्ध नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याशी त्यांचा घनिष्ट परिचय झाला. पुढे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजातील शेतकी शिक्षणवर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करून देवलांनी सन १८८० मध्ये प्रमाणपत्र मिळविले. सांगलीचा नाट्यानुकूल परिसर, वडील व बंधू संगीतज्ञ, दुसरे बंधू कुशल नट आणि किर्लोस्करांसारखे मुरब्बी नाट्यगुरू असे त्यांच्या भोवतालचे वातावरण नाट्याला पोषक होते. साहजिकच अल्पकाळ शिक्षकाचा व्यवसाय केल्यावर देवलांनी हयातभर नाट्यसेवेला वाहून घेतले.

पुण्यात असताना देवल आणि शंकरराव पाटकर यांनी 'आर्योद्धारक' नावाची नाटक मंडळी नाट्यकलेला नवे वळण लावण्याच्या हेतूने स्थापन केली. या मंडळीत असताना परशुरामपंत तात्या गोडबोल्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या 'वेणीसंहार' नाटकातील अश्वत्थामा आणि महादेवशास्त्री कोल्हटकर यांच्या 'अथेल्लो'मधील अजितसिंग या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. महादेवशास्त्र्यांनी शेक्सपिअरच्या 'अथेल्लो' ह्या मूळ नाटकाचे भाषांतर केले होते. त्यावरून अजितसिंग ही रंगावृत्ती तयार करण्यात आली होती. ती करण्याच्या कामीही देवलांनी आपल्या लेखणीचा हातभार लावला. सन १८८० मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी स्थापन झाली. किर्लोस्कर पद्धतीची नाट्यपदे रचण्यात देवल कुशल होते. किर्लोस्करांच्या 'शाकुंतल' मधील शकुंतलेची पदे देवलांनी रचली आणि त्या मंडळीचे ते आधारस्तंभच बनले. देवल निपुण नाट्यशिक्षकही होते. भाऊराव कोल्हटकर, नानासाहेब जोगळेकर, गणपतराव बोडस, काशिनाथपंत परचुरे व बालगंधर्व यांसारख्या नटश्रेष्ठांना देवलांनीच तालीम देऊन तयार केले.

देवलांनी इंग्रजीवरून तीन, संस्कृतवरून तीन व एक स्वतंत्र अशी एकूण सात नाटके रचली. टॉमस सदर्नकृत 'द फेटल मॅरेज'वरून गॅरिकने तयार केलेल्या 'इझाबेला' या रंगावृत्तीच्या आधारे 'दुर्गा' (१८८६), शेक्सपिअरकृत 'अथेल्लो'ची रंगावृत्ती 'झुंझारराव' (१८९०) व मर्फी आणि मोल्येर यांच्या अनुक्रमे 'ऑल इन द राँग' आणि 'गॉनारेल' या नाटकांवरून 'फाल्गुनराव अथवा तसबिरीचा घोटाळा' (१८९३) ही त्यांची परकीय नाट्यकृतींची रूपांतरे होती. पुढे फाल्गुनराव...चे गंधर्व नाटक मंडळीसाठी केलेले संगीत रूपांतर 'संशयकल्लोळ' (१९१६) हे कमालीचे लोकप्रिय ठरले. 'मृच्छकटिक' (१८८९), 'विक्रमोर्वशीय' (१८८९) व बाणाच्या कादंबरीवर आधारित 'शापसंभ्रम' (दुसरी आवृत्ती १९००) ही त्यांची संस्कृत आधारांवर रचलेली नाटके होती. त्यांच्या 'दुर्गा' नाटकाला राजाराम कॉलेजचे, तर 'शापसंभ्रम'ला इंदूरच्या महाराजांचे पारितोषिक मिळाले होते. पण या दोन्ही नाटकांपेक्षा त्यांच्या 'मृच्छकटिक', 'झुंझारराव' आणि 'संशयकल्लोळ' यांना विशेष प्रायोगिक यश मिळाले. त्यांचे 'संगीत शारदा' (१८९९) हे नाटक साहित्यिक आणि प्रायोगिक या दोन्ही दृष्टींनी अद्वितीय ठरले. शारदेसारखी अस्सल सामाजिक नाट्यकृती तत्पूर्वी मराठी रंगभूमीवर आलेली नसल्याने मराठी सामाजिक रंगभूमीचा पाया घालण्याचे श्रेय देवलांना मिळते. 'संगीत शारदा' मधील अस्सल वातावरण, जिवंत स्वभावचित्रण, सुटसुटीत व मार्मिक संवाद, प्रासादिक पद्यरचना आणि सहजसुंदर विनोद यांमुळे त्या नाटकास तोड नाही. देवलांनी रेनल्ड्झच्या 'मिस्टरीज ऑफ द कोर्ट ऑफ लंडन' ह्या कादंबरीवरून 'लंडनरहस्य, पूर्वार्ध भा. १' (१८९४) ही कादंबरी व पुणे वैभवपत्रात प्रचलित विषयावर स्फुटलेखनही केले होते.

अत्यंत प्रयोगक्षम नाट्यकृतींचे लेखन आणि स्वाभाविक अभिनयशिक्षण या माध्यमातून देवलांनी रंगभूमीची जी सेवा केली, ती अमूल्य आहे. शेवटी काही वर्षे देवल रंगभूमीवरून निवृत्त झाले होते. मधुमेहाच्या विकाराने त्यांचे मिरज येथे १४ जून १९१६ रोजी निधन झाले.

-संदर्भ- मराठी विश्वकोश

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-06-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-06-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement