साहित्य,नाट्य आणि सामाजिक क्षेत्रातील अवलिया- प्रल्हाद केशव अत्रे

मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते प्र.के.अत्रे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचा जीवनप्रवासाचा हा धावता आढावा.

साहित्य,नाट्य आणि सामाजिक क्षेत्रातील अवलिया- प्रल्हाद केशव अत्रे मुख्य फोटो
मुख्य फोटो

प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड (जिल्हा पुणे) ह्या गावी झाला. त्यांचे सासवड, पुणे, मुंबई व लंडन या ठिकाणी बी. ए., बी. टी., टी. डी. पर्यंत शिक्षण झाले; नंतर पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. तेथे असतानाच राजा धनराज गिरजी हायस्कूल (१९२७) व मुलींचे आगरकर हायस्कूल (१९३४) या शाळांच्या संस्थापनेत त्यांनी सहभाग घेतला. पुण्याच्या नगरपालिकेचे ते काही काळ सदस्य होते. सन १९३३ पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. सन १९३९ नंतर ते मुंबईला स्थायिक झाले. सन १९४० मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक 'नवयुग'पासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते राहिले. याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावसायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांचे योगदान तर अमूल्यच होते. त्यांनी आपली वाणी व लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले.
प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी त्यांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले (१९२५) हा त्यांच्या विनोदी व विडंबन-कवितांचा संग्रह प्रसिद्ध होता. त्यात जुन्या वळणाचे, विशेषतः ‘रविकिरणामंडळा’चे कवी व त्यांच्या कवितांमधील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबनकाव्याची परंपरा हीच याच काव्यसंग्रहापासून सुरू झाल्याचे मानले जाते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा प्रभाव दिसणारी त्यांची स्फुट कवितासंग्रह 'गीतगंगा' (१९३५) हा आहे.
अत्र्यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड सन १९३३ ते १९६० हा आहे. त्यावेळी संगीत नाटके व नाटककार तसेच गायक-नटवर्गाची परंपरा खंडित व निष्प्रभ झाली होती. चित्रपटसृष्टीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी रंगभूमीस उतरती कळा आली होती. आर्थिक मंदीमुळेही रंगभूमीचा लोकाश्रय कमी होत होता. अशा काळात अत्र्यांची मुख्यत: प्रहसनात्मक व विनोदी नाट्यदृष्टी परिणामकारक ठरली. विशेष यशस्वी झालेल्या त्यांच्या एकूण बारा नाटकांपैकी दहा नाटके प्रहसनात्मक व विनोदप्रचुर आहेत. गुरुस्थानी मानलेले गडकरी व फ्रेंच प्रहसनकार मोल्येर यांचा प्रभाव त्यांच्या नाटकांवर पडलेला दिसतो. त्या नाटकांत सामाजिक दोषदर्शन व दंभस्फोट आहेत, पण उपहास, उपरोध, विडंबन व अतिशयोक्ती या विनोदसाधनांच्या द्वारे ते प्रकट केले आहेत. साष्टांग नमस्कार (१९३३), भ्रमाचा भोपळा (१९३५) व लग्नाची बेडी (१९३६) ही त्यांपैकी काही लोकप्रिय नाटके होती. घराबाहेर (१९३४) व उद्याचा संसार (१९३६) ही त्यांची विशेष गंभीर व सामाजिक समस्यात्मक नाटके आहेत. त्या काळात विशेष अनुकरणीय ठरलेल्या इब्सेन या नॉर्वेजियन नाटककाराचा संस्कार वरील दोन नाटकांवर झाल्याचे जाणवते. त्यावेळी मराठी रंगभूमीचा लोकाश्रय टिकवून ठेवण्यात अत्र्यांची नाटके यशस्वी झाली. सन १९६० नंतरच्या दुसऱ्या कालखंडातील त्यांची महत्त्वाची नाटके म्हणजे 'तो मी नव्हेच' (१९६२) व 'डॉक्टर' (१९६७) ही होती. सत्यसृष्टीतील खळबळजनक घटनांवर ती आधारलेली आहेत. तंत्रदृष्ट्या प्रगत मराठी रंगभूमीचे दर्शनही त्यांत घडते. वर्तमानकालीन अशा नाट्यात्म घटनांची अभिज्ञता अत्र्यांना स्वभावतः होती. या कालखंडातील अत्र्यांची लोकप्रिय नाटके पूर्वकालीन नाटकांच्या तुलनेने अधिक प्रत्यक्षदर्शी आहेत. मराठी रंगभूमीवरील अखंड प्रयोगशीलतेच्या व तीव्र स्पर्धेच्या या कालखंडातही त्यांची सर्वच नाटके लोकप्रिय ठरली.
चांगुणा (१९५४) ही कादंबरी व बत्ताशी व इतर कथा (१९५४) यांसारखी त्यांची ग्रंथसंपदा थोडी वेगळी आहे. विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो. महात्मा फुले (१९५८), पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त (१९६४), समाधीवरील अश्रू (१९५६), केल्याने देशाटन (१९६१), अत्रे उवाच (१९३७), ललित वाङ्‌मय (१९४४), हशा आणि टाळ्या (१९५८) ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होती. त्यांच्या नवयुग वाचनमाला (१९३७) व सुभाष वाचनमाला (१९६२) यांनी—विशेषतः पहिल्या मालेने—मराठी भाषासाहित्यविषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठीत एक आदर्शच निर्माण केला. अप्रकाशित 'गडकरी' (१९६२) हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ अभ्यासपूर्ण आहे. 'मी कसा झालो?' (१९५३) हे त्यांचे वाङ्‌मयीन आत्मशोधन होय. अत्र्यांनी आपले जीवननाट्य अत्यंत रसाळ व भावपूर्ण शैलीने प्रस्तुत पुस्तकात निवेदन केले असल्याने मराठी आत्मचरित्रपर साहित्यात त्यास विशेष महत्त्वाचे स्थान आहे. 'कऱ्हेचे पाणी' या पाच खंडांतील (१९६३, १९६४, १९६५, १९६७ व १९६८) विस्तृत आत्मचरित्रात त्यांनी आपली जीवनकथा सांगितली आहे.
अत्र्यांच्या स्वतंत्र वृत्तपत्रव्यवसायाचा आरंभ साप्ताहिक 'नवयुग'पासून (१९४० ते १९६२) झाला. १९४३–१९४४ मध्ये 'समीक्षक' मासिकाच्या गडकरी विशेषांकाचे व दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केले. १९४७–१९४८ या वर्षांत 'जयहिंद' नावाचे एक सायंदैनिकही त्यांनी चालविले. 'तुकाराम' (१९५४) नावाचे साप्ताहिकही त्यांनी काढले होते. १९५६ मध्ये सुरू केलेल्या 'दैनिक मराठा'चे ते अखेरपर्यंत संपादक होते. त्यांच्या वृत्तपत्रीय शैलीवर संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकरांचा फार मोठा परिणाम जाणवतो.
मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून व पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून अत्र्यांनी महत्त्वाचे कार्य केले. धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होते. त्यांच्या 'श्यामची आई' या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक (१९५४) व 'महात्मा फुले' या चित्रपटास रौप्यपदक (१९५५) मिळाले. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र ही त्यांची राजकीय कार्याची प्रभावी साधने होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही अत्र्यांचा लौकिक होता.
नाशिक येथे १९४२ मध्ये झालेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन (बेळगाव, १९५५), दहावे मराठी पत्रकार-संमेलन (१९५०) आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषविली होती. मुंबई येथे त्यांचे १३ जून १९६९ रोजी निधन झाले. अशा या थोर व्यक्तिमत्वास शतश: नमन!
संदर्भ- मराठी विश्वकोश

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-06-2026 News publication date | Time: 12:28 PM News publication time | Views: 9 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-06-2026 News publication date | Time: 12:28 PM News publication time | Views: 9 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement