देशबंधू -चित्तरंजन दास

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आपल्या ज्ञानाने आणि आपल्या शब्दसंपदेने अमुल्य योगदान देणारे- देशबंधू अर्थात चित्तरंजन दास यांचा आज स्मृतीदिन, त्यानिमित्त त्यांच्या अमुल्य योगदानाचा हा संक्षिप्त आढावा.

देशबंधू -चित्तरंजन दास मुख्य फोटो
मुख्य फोटो

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व प्रभावी वक्ते म्हणजे चित्तरंजन दास. ‘देशबंधू’ या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म कलकत्ता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात ५ नोव्हेंबर १८७० रोजी झाला. चित्तरंजन दास यांचे वडील भुवनमोहन कलकत्त्यात वकिली करायचे. चित्तरंजन यांचे शिक्षण कोलकाता येथे झाले. बी. ए. झाल्यावर सन १८९० मध्ये ते आय. सी. एस. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली. याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने भारतीय जनतेविषयी अनुद्गार काढले. तेव्हा भारतीय लोकांची सभा घेऊन चित्तरंजनांनी मॅक्लिनचा निषेध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करून घेतले. याचा परिणाम म्हणून ते आय. सी. एस. परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत व अखेर बॅरिस्टर होऊन त्यांना भारतात परतावे लागले (१८९३). विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली साहित्याचा अभ्यास केला. शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक होते. त्यांच्या लेखनातून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कलकत्त्यात वकिलीचा प्रारंभ केला पण सुरुवातीस फारसा जम बसेना. म्हणून ते ग्रामीण भागात वकिली करू लागले. चित्तरंजन दास यांनी 'मालंच' (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह त्याकाळी प्रसिद्ध केला. यात देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे.

हळूहळू चित्तरंजन यांचा वकिलीत जम बसत होता. या सुमारास वंगभंगाची चळवळ सुरू झाली. अरविंद घोष व इतर काही तरुणांवर खटले भरण्यात आले. अलीपूर बाँबकेस म्हणून हा खटला गाजला. अरविंदांकडे पैसे नव्हते, तेव्हा चित्तरंजन यांनी आपली घोडा–गाडी विकून स्वेच्छेने हा खटला चालविला. अरविंदबाबू निर्दोष सुटले (१९०८). त्यानंतर चित्तरंजन दास यांची मोठ्या वकिलांत गणना होऊ लागली. असाच ढाका–कटाचा खटला (१९१०–११) त्यांनी चालविला. त्यांना प्रतिष्ठा आणि पैसाही भरपूर मिळू लागला. ते स्वातंत्र्यलढ्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांचे खटले विनामूल्य चालवीत. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय संस्थांना लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या.

विद्यार्थी असल्यापासूनच ते सार्वजनिक व राष्ट्रीय कार्यांत भाग घेत. अनुशीलन समिती या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते. बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले. सन १९१७ मध्ये ते प्रांतिक परिषदेचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून अखिल भारतीय राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. सन १९१८ मध्ये त्यांनी माँटेग्यू–चेम्सफर्ड सुधारणांना विरोध केला. कोलकाता येथील सन १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी गांधींच्या असहकार चळवळीला प्रथम विरोध केला, पण पुढे नागपूर काँग्रेसमध्ये ते पूर्णतः गांधीवादी झाले. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपली वकिली सोडली व पुढे आपली राहती वास्तू आणि इतर मालमत्ताही काँग्रेसला व पर्यायाने देशास समर्पित केली. त्यांची अहमदाबाद (१९२१) व नंतर गया (१९२२) येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भेटीवर बहिष्कार टाकावा म्हणून जी चळवळ झाली, त्यात त्यांना सहा महिने तुरुंगात डांबण्यात आले. त्यामुळे अहमदाबाद येथील काँग्रेस अधिवेशनास ते हजर राहू शकले नाहीत. पुढे असहकाराची चळवळ शिथिल करण्यात आल्यावर त्यांनी काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. कायदेमंडळात जाऊन तेथे असहकाराचे धोरण चालविण्याच्या कार्यक्रमाला प्रथम त्यांचा विरोध होता, पण दिल्ली येथील अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब झाले. विधिमंडळात त्यांनी सरकारचे अंदाजपत्रक नामंजूर करून आपले म्हणणे सिद्ध केले. सन १९२४–२५ या साली ते कोलकाता महानगरपालिकेचे महापौर होते. त्या वेळी सुभाषचंद्र बोस त्यांचे साहाय्यक होते. स्वराज्य हे लोकांचे व लोकांसाठी असावे हे त्यांचे सूत्र होते. ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करण्यावर त्यांचा भर होता. पूर्वीप्रमाणे आपली खेडी सुसंघटीत आणि समृद्ध व्हावीत, असे त्यांना वाटे. भारतीयांनी राष्ट्रीय शिक्षण व मातृभाषेचा वापर यांचा अंगीकार करावा, हे मत त्यांनी सन १९२१ मध्ये विक्रमपूरच्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. चित्तरंजन दास जरी एक नामांकित कायदेतज्ज्ञ होते, तरी त्यांचे हृदय कवीचे होते. गोरगरीब, पददलित यांबद्दल त्यांना सहानुभूती होती. 'मालंच' नंतर त्यांनी 'माला', 'सागर संगीत', 'किशोर–किशोरी' व 'अन्तर्यामी' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. यांतून त्यांनी आपल्या उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी काही लहानमोठ्या कथाही लिहिल्या. त्यांच्या काव्यास बंगाली साहित्यात आज मानाचे स्थान दिले जाते. 'नारायण' या नावाचे साहित्यविषयक मासिक त्यांनी काढले (१९१४). याशिवाय 'बांगला कथा' हे बंगाली सायंदैनिक (१९२२) व स्वराज्य पक्षाचे मुखपत्र 'फॉर्वर्ड' हे दैनिक त्यांनी सुरू केले (१९२३). कलकत्ता महापालिकेचे महापौर असताना त्यांनी 'म्युनिसिपल गॅझेट' हे पालिका मुखपत्र सुरू केले (१९२४).

त्यांना जातीयता आणि अस्पृश्यता मान्य नव्हती. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे आणि स्त्रीशिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. विधवाविवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. सूतकताटीचाही त्यांनी प्रसार केला आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला. अखेरच्या दिवसांत कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. दार्जिलिंग येथे ते विश्रांतीस गेले आणि तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने १६ जून १९२५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ 'चित्तरंजन' हे शहर वसविण्यात आले, तसेच त्यांच्या राहत्या घरात 'चित्तरंजन सेवासदन' नावाचे रुग्णालय स्थापण्यात आले. या थोर विचारवंतास नमन!

संदर्भ- मराठी विश्वकोश

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 16-06-2026 News publication date | Time: 12:09 PM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 16-06-2026 News publication date | Time: 12:09 PM News publication time | Views: 58 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement