अमृत संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयात सावरकरांना अभिवादन

१४३वी जयंती उत्साहात साजरी

अमृत संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयात सावरकरांना अभिवादन मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयात सावरकरांना अभिवादन अतिरिक्त फोटो

भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयात २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री प्रकाश पांडे, तसेच बजरंग दलचे जिल्हा संयोजक नील दीक्षित उपस्थित होते. 

भारतमाता व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी अमृतसखी सौ. साक्षी जोशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर ओघवत्या शब्दात प्रकाश टाकला. सावरकरांची अद्वितीय देशभक्ती, क्रांतिकारी विचारसरणी आणि राष्ट्रनिर्मितीसाठीच्या त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करून जोशी यांनी उपस्थितांना प्रेरणेचा संदेश दिला. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या गीताचे व अमृत संस्थेच्या 'मातृभूमी गान से' या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण वातावरण देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेले. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी सावरकरांविषयी आपले विचार व अनुभव व्यक्त केले. 'प्रत्येक हिंदू युवकाने सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,' असे प्रतिपादन प्रकाश पांडे यांनी या वेळी केले. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील विद्यार्थी आशुतोष प्रकाश पांडे याची नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये (NDA) निवड झाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. 

अमृत संस्थेची सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला अनिल बुधवानी, सौ. लीनाताई हरदास, कु. वैष्णवी हरदास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सेवानिवृत्त क्षेत्र वनाधिकारी व विभाग सद्भाव संयोजक महादेव माकडे, जिल्हा सद्भाव संयोजक रामकृष्ण बिसने, नंदलाल रहांगडाले (जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हा भटके विमुक्त परिषद), अमृतमित्र स्वप्नील येवले, तसेच कार्यालयातील अमृतमित्र, अमृतसखी व जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृतमित्र हेमंत चंदवासकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ओमकार हरदास यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदान गायन व प्रसाद वितरणाने झाली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Sakshi Joshi News publisher name | Date: 30-05-2026 News publication date | Time: 01:48 PM News publication time | Views: 182 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: Sakshi Joshi News publisher name | Date: 30-05-2026 News publication date | Time: 01:48 PM News publication time | Views: 182 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement