अहिल्यानगरात अमृतपेठ उद्घाटनप्रसंगी राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांचे प्रतिपादन
अहिल्यानगर : 'अमृतपेठ ही केवळ बाजारपेठ नसून स्थानिक उत्पादक, महिला बचत गट आणि लघुउद्योजकांना थेट व्यासपीठ देणारी चळवळ आहे. ग्राहकांना दर्जेदार व विश्वासार्ह स्वदेशी उत्पादने मिळावीत आणि उत्पादकांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे,' असे प्रतिपादन अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी केले. अहिल्यानगरमध्ये अमृतपेठ उपक्रमाचे उद्घाटन आज (२३ मे) त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, नगरसेवक ऋग्वेद गंधे, सुरेश क्षीरसागर, गीता गिलडा, प्रिया जानवे, संध्या पावसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून स्वदेशी व दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेने हा उपक्रम आयोजित केला आहे. अहिल्यानगरमधील चितळे रोडवरील ऋग्वेद भवन हॉलमध्ये २३ आणि २४ मे या दोन दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
नगरसेवक ऋग्वेद महेंद्र गंधे यांनी सांगितले, 'अहिल्यानगरसारख्या शहरात अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळाल्यास रोजगारनिर्मिती वाढते आणि स्वदेशी उद्योग अधिक मजबूत होतो. नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा.'
मंगेश खाडिलकर म्हणाले, की व्यावसायिकांनी अमृतपेठच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करून आपल्या व्यवसायवृद्धीसाठी उपयोग करून घ्यावा. मार्च महिन्यात मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर पुन्हा एकदा अहिल्यानगरकरांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
या बाजारपेठेत महिला बचत गट व लघुउद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये नाचणी व शेंगदाणा लाडू, चकली, लोणचे, मसाले, पापड, खाकरा, बाकरवडी यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ, तसेच हँडमेड ज्वेलरी, मोती व अमेरिकन डायमंड दागिने, साड्या, कुर्ती, बॅग्ज, देववस्त्रे, हस्तकला उत्पादने यांचा समावेश आहे.
याशिवाय आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने, अगरबत्ती, परफ्युम, स्किन व हेअर केअर उत्पादने, सोलर पॅनल, वॉटरप्रूफिंग साहित्य आणि विविध उपयोगी वस्तूंचे स्टॉल्सही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे शासकीय योजनांची माहिती व नोंदणीसाठी स्वतंत्र स्टॉलही येथे आहे.
'दर्जेदार, स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्यासाठी नागरिकांनी कुटुंबासह अमृतपेठेला अवश्य भेट द्यावी,' असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे. या उपक्रमासाठी अमृतमित्र वैभव कुलकर्णी, शरद क्षीरसागर, संदीप देशपांडे, वृषाली भोपे, गौरी कुलकर्णी व सुजल झुंजारे यांनी विशेष मेहनत घेतली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment