खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींना धाराशिव कार्यालयाचे आवाहन
धाराशिव : आधुनिक काळात शेती, सर्वेक्षण, फोटोग्राफी, सुरक्षा, तसेच विविध तांत्रिक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भविष्यातील वाढती गरज ओळखून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पूर्णपणे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अमृत ड्रोन मिशनअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानशी जोडून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना डीजीसीए मान्यताप्राप्त अधिकृत ड्रोन पायलट परवाना देण्यात येणार असून, त्याद्वारे कृषी, सर्वेक्षण, ड्रोन फवारणी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, आपत्ती व्यवस्थापन, तसेच ड्रोन मास्टर ट्रेनर म्हणून करिअरच्या विविध संधी उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षण कालावधी दहा दिवसांचा असून, संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांच्या राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
अर्जदार संस्थेच्या लक्ष्यित गटातील असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे. किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे फोटो, सही, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, बारावीची गुणपत्रिका, फिटनेस प्रमाणपत्र व स्वयंघोषणापात्र जोडणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन अमृत संस्थेचे धाराशिव जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी, उपव्यवस्थापक अजय कुलकर्णी यांनी केले आहे.
संकेतस्थळ :www.amrutdronemission.com
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत धाराशिव जिल्हा कार्यालय,
ऋणानुबंध, तळमजला, जिल्हा कारागृहासमोर, धाराशिव
मोबाइल : ७३९१०६५४६९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment