राज्यभरातील विद्यार्थी झाले होते सहभागी
सिल्लोड : 'अमृत संस्थेच्या माध्यमातून मिळालेले संस्कार, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे आयुष्यात उपयोगी पडतील,' अशी भावना अमृत मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मौजे केरळा (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालय येथे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमृतवर्ग या किशोरवयीन मुलांसाठीच्या उपक्रमांतर्गत दोन दिवसांची अमृत मेळावा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. १९ मे रोजी त्या कार्यशाळेचा समारोप झाला. राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे ६५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद लुटला.
अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी विद्यार्थ्यांना अमृतवर्ग उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. अमृतवर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव, शिस्त कशी रुजवली जाते, संस्कार करून व्यक्तिमत्त्व विकास कसा केला जातो याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रार्थना, प्राणायाम, सूर्यनमस्कार, देशभक्तिपर गीते, प्रेरणादायी कथा, विविध बौद्धिक सत्रे व खेळ यांसारखे उपक्रम घेण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि समूहभावना वाढीस लागल्याचे त्यांनी सांगितले.
समारोप कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरण गतिविधी प्रमुख डॉ. संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि निसर्गाशी नाते जपण्याचे महत्त्व पटवून दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा व्यवस्थाप्रमुख संदीप झालाणी यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व सांगून अशा उपक्रमांची आजच्या काळात मोठी गरज असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्रमुख ह. भ. प. श्री. देविदासमहाराज मिसाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. आपल्या आभार प्रदर्शनात देविदासमहाराज मिसाळ यांनी अमृत संस्थेचा हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय स्तुत्य आणि समाज घडण्यासाठी उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि संस्कार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अमृतवर्गाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, श्याम जोशी, राहुल पांढरे, तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment