सहकार्याचे दिले आश्वासन
शिरूर (जि. पुणे) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे पुणे जिल्हा उपव्यवस्थापक कमलाकर कुलकर्णी यांनी शिरूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीतम पाटील यांची भेट घेतली. गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील परिवार सर्वेक्षणाबद्दल पाटील यांना माहिती देण्यात आली. तसेच अमृत संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या ड्रोन प्रशिक्षण योजनेबद्दलही सांगण्यात आले.
कुलकर्णी यांनी पाटील यांना अमृत संस्थेच्या योजना, कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, अमृत परिवार सर्वेक्षण उपक्रमाबद्दलही सांगितले. अमृत संस्थेच्या लक्ष्यित समाजघटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली. अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाबद्दल माहिती देऊन शिरूर नगरपालिकेचे सभागृह त्या उपक्रमासाठी उपलब्ध करून देण्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली. मुख्याधिकारी पाटील यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि सहकार्याचे आश्वासनही दिले. या वेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया हेही उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment