अमृत संस्थेच्या योजनेचाही होईल उपयोग!
प्रागैतिहासिक काळात आदिमानव नुकताच शेतीकडे वळला आणि आपल्यापुरते अन्न पिकवणे शिकला तेव्हा शेतीची सुरुवात होती. माणूस जसजसा शेती करू लागला तसतशी उत्क्रांतीच्या या टप्प्यात त्याची प्रगती झपाट्याने होऊ लागली. जमिनीच्या एखाद्या भागाची मशागत करून त्यावर विविध पिकांचे उत्पादन सुरू केल्याने मानव स्थिर झाला. पुढे तो समूहात राहू लागला. कुटुंबव्यवस्था निर्माण होऊ लागली. गावे वसू लागली. म्हणजे शेतीमुळे खऱ्या अर्थाने माणूस माणसाळला, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
हळूहळू काळ पुढे सरकू लागला. माणूस जगाच्या विविध भागांमध्ये जाऊन स्थिरावला. तेथील हवामान, पिकांची उत्पादनक्षमता, व्यापारासाठी पिकांचे उत्पादन यानुसार शेतीचे स्वरूप बदलत गेले. आता प्रत्येक मानव आपल्यापुरती शेती न करता काही मोजकी माणसे मोठ्या प्रमाणावर शेती करू लागली. थोडक्यात शेती हा व्यवसायाचे स्वरूप घेऊ लागला. माणूस शेतीत अनेक प्रयोग करू लागला. जास्त उत्पादन मिळावे यासाठी संकरित वाण, बी-बियाणांच्या विविध जाती, जमिनीचे परीक्षण करून त्यात कोणते पीक उत्तम येईल यासाठी सुधारणा करू लागला. एवढेच नाही, तर पिकांसाठी अनेक खतांचा वापर त्याने सुरू केला. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन होऊ लागले. पुढे अनेक देशांमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. यंत्रांच्या साह्याने शेतीतील अनेक उत्पादनांचा विविध मार्गांनी उपयोग करणे माणसास शक्य झाले. दळणवळणाची साधने वाढली. त्यामुळे उत्पादन कमीत कमी वेळात विविध ठिकाणी पोहोचवणे शक्य झाले. इतकेच काय, या यांत्रिकीकरणामुळे शेतीतसुद्धा अनेक यंत्रांचा वापर होऊ लागला. नांगरणी, फवारणी, छाटणी, मळणी अशी अनेक कामे यंत्रांमुळे अगदी पटकन, कमी मनुष्यबळात आणि व्यवस्थितपणे होऊ लागली.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी अन्नाची गरज ही शेतीमार्फतच पूर्ण केली जाते. त्यामुळे शेतकरी हा भारतासारख्या देशात देवासारखाच मानला जातो. वर्तमानकाळात मात्र या सगळ्या यांत्रिकीकरणाचा उपयोग करूनही बदलते हवामान आणि वाढती अन्नाची मागणी यामुळे पारंपरिक शेती पद्धती आजच्या गरजा पूर्ण करण्यात अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषिक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन-आधारित तंत्रज्ञान या दोन गोष्टी मोठी क्रांती घडवत आहेत.
नीती आयोगाच्या २०२३च्या अहवालानुसार, कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षमतेत २०–२५ टक्के वाढ होऊ शकते, तसेच शेतीवरील खर्चातही लक्षणीय घट होऊ शकते. त्याचबरोबर, भारतातील कृषी ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळवणे, पिकांचे निरीक्षण करणे आणि योग्य वेळी आवश्यक उपाययोजना करणे अधिक सोपे झाले आहे. केंद्र सरकारच्या ड्रोन शक्ती योजनेसारख्या उपक्रमांमुळे देशभरात शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत आहे. एआय आणि ड्रोन तंत्रज्ञान यांच्या संयुक्त वापरामुळे भारतीय शेतीचे निरीक्षण, व्यवस्थापन आणि लागवडीच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडून येत आहेत.
कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय?
तसे पाहिले, तर प्रचंड मनुष्यबळ असलेल्या भारतात एआयचा वापर करायचा का, असा प्रश्न विचारला जातो. परंतु या मनुष्यबळाला प्रशिक्षित केले, तर त्या मनुष्यबळाची काम करण्याची पद्धत बदलेल. हेच प्रशिक्षित मनुष्यबळ आज गरजेचे आहे. विचार करा - शेतात बुजगावणे उभे करून शेतावर लक्ष ठेवण्यापेक्षा, एखाद्या ड्रोनच्या साह्याने ते काम केले गेले, तर ते किती उपयुक्त असेल? यात मनुष्यबळ कमी झाले नाही. त्या प्रशिक्षित माणसाने ड्रोनद्वारे शेतावर लक्ष ठेवले आहे. लक्ष ठेवणे एवढेच ड्रोन किंवा एआयचे काम नाही, तर भारतातील कृषिक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर ही आता काळाची गरज आहे. शेतीमध्ये प्रगत संगणकीय अल्गोरिदम्सचा वापर करणे म्हणजेच कृषिक्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता होय. हे अल्गोरिदम विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून सारासार विचार करतात, निर्णय घेतात आणि शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करतात.
कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाचे प्रमुख उपयोग -
- हवामान, पिकांचे उत्पादन आणि कीड प्रादुर्भाव यांचे पूर्वानुमान. (Predictive Analysis)
- मशीन लर्निंगच्या साह्याने माती आणि पिकांच्या आकडेवारीतील नमुने ओळखणे.
- संगणकीय प्रणालीद्वारे (Computer Vision) रोग आणि तण शोधणे.
- सेन्सर-आधारित स्मार्ट सिंचन व्यवस्था.
- शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या एआय आधारित सल्लागार प्रणाली.
जे निर्णय घेण्यासाठी पूर्वी अनेक दिवस लागत होते, ते आता एआयच्या मदतीने काही सेकंदांत घेणे शक्य झाले आहे.
भारतात कृषी क्षेत्रात एआयचा वाढता वापर शेतीला पारंपरिक पद्धतीतून सक्रिय आणि नियोजनबद्ध पद्धतीकडे घेऊन जात आहे. एआयमुळे शेती अधिक अचूक, कार्यक्षम आणि शाश्वत बनत आहे. खालील क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन दिसून येत आहे.
मृदा आरोग्य निरीक्षण : मातीच्या माहितीच्या आधारे एआय प्रणाली योग्य पिके आणि खतांची शिफारस करते.
कीड व रोगांचे लवकर निदान : प्रतिमा विश्लेषण तंत्रज्ञानामुळे रोगांचा प्रसार होण्यापूर्वीच ओळख करता येते.
काटेकोर शेती (Precision Agriculture) : पाणी आणि पोषकद्रव्ये योग्य वेळी व आवश्यक त्या प्रमाणात दिली जातात.
उत्पादनाचा अंदाज : एआय मॉडेल्स पिकांच्या उत्पादनाचा अंदाज वर्तवतात. त्यामुळे बाजारपेठेची तयारी अधिक चांगली करता येते.
रोबोटिक कृषी यंत्रसामग्री : एआय-आधारित रोबोट्स तण काढणे, पेरणी यांसारखी पुनःपुन्हा करावयाची कामे करतात.
या आधुनिक उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना पिकांची उत्पादकता वाढविण्यासोबतच पाणी, खते आणि इतर संसाधनांचा वापर कमी करण्यासही मोठी मदत होत आहे. या सगळ्या कामांसाठी ड्रोनच्या वापरामुळे अनेक कामे सुलभ, अचूक आणि कमी श्रमांत होऊ लागली आहेत.
भारतीय शेतीमध्ये एआय आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे
कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर भारतीय शेतकऱ्यांसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे. हे तंत्रज्ञान शेती अधिक आधुनिक, अचूक आणि किफायतशीर बनवत आहे.
- मजुरी आणि सर्वेक्षण खर्चात बचत : ड्रोनच्या मदतीने मोठ्या शेतक्षेत्राचे कमी वेळेत सर्वेक्षण करता येते. एआय तंत्रज्ञानामुळे दैनंदिन आणि वारंवार करण्याची अनेक कामे स्वयंचलितपणे केली जातात. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करता येऊ शकते.
- पिकांचे अधिक प्रभावी निरीक्षण : ड्रोन शेतातील प्रत्यक्ष स्थितीची रिअल-टाइम छायाचित्रे आणि माहिती पुरवतात. एआय प्रणाली पिकांमधील निकृष्ट भाग, रोग किंवा इतर समस्या त्वरित ओळखते.
- साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर : पाणी, खते आणि इतर गोष्टी किती वापरायच्या याबाबत एआय तंत्रज्ञान अचूक मार्गदर्शन करते. त्यामुळे साधनसंपत्तीची बचत होते आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळते.
- उत्पादनक्षमतेत वाढ : शेतकऱ्यांना पेरणी, सिंचन आणि लागवडीसंदर्भात योग्य वेळी सल्ला मिळतो. अंदाजाऐवजी अचूक माहितीवर आधारित निर्णय घेतल्यामुळे उत्पादन वाढते.
- कीड आणि रोगांचे व्यवस्थापन : कृषी ड्रोन शेतातील विशिष्ट भागांमध्ये कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव अचूकपणे शोधतात. त्यामुळे आवश्यक त्या भागापुरत्याच या उपाययोजना करता येतात.
- कर्ज आणि विमा सुविधांमध्ये सुलभता : ड्रोनद्वारे संकलित केलेला, तपासलेला डेटा पीक विमा दाव्यांसाठी उपयुक्त ठरतो. लघू आणि सीमान्त शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे अधिक सोपे होते.
- लहान ते मोठ्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त : एआय आधारित मोबाइल अॅप्समुळे लहान शेतकरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे कृषी क्षेत्रातील अनेक नवकल्पना सर्वसमावेशक आणि व्यापक बनत आहेत.
कृषी क्षेत्रातील एआयचे भविष्य
भारतातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता येत्या काळात वेगाने विकसित होणार असून, शेती अधिक स्मार्ट, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित बनणार आहे. भविष्यातील काही महत्त्वाच्या दिशा पुढीलप्रमाणे असतील.
स्मार्ट फार्म व्यवस्थापन प्रणाली : हवामान, माती आणि पिकांशी संबंधित सर्व माहिती एकाच केंद्रीकृत डॅशबोर्डवर उपलब्ध होईल. त्यामुळे शेती व्यवस्थापन अधिक सुलभ आणि प्रभावी बनेल.
स्वॉर्म ड्रोन आणि रोबोटिक्स : एकाच वेळी समन्वयाने काम करणारे ड्रोन निरीक्षण, फवारणी आणि शेत नकाशांकन यांसारखी कामे अधिक वेगाने आणि अचूकपणे करतील.
एआय आणि ब्लॉकचेनचे एकत्रीकरण : शेती उत्पादनाचा प्रवास शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पारदर्शक पद्धतीने होणार आहे.
हायपरलोकल एआय सल्ला प्रणाली : एखाद्या प्रदेशाची भौगोलिक आणि पर्यावरणीय स्थिती, मातीचा प्रकार आणि पिकांच्या गरजांनुसार 'एआय'आधारित अचूक मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.
अमृत संस्थेचे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण
आपण ड्रोन आणि एआय याचे वर्तमानातील स्वरूप आणि भविष्यातील व्याप्ती याचे विविध पैलू पाहिले. भविष्यातील हीच व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनाच्या अमृत संस्थेने एक अनोखा प्रशिक्षण उपक्रम आखला आहे. अशाप्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणारी अमृत ही कदाचित पहिलीच शासकीय संस्था असेल. शेती क्षेत्रापासून फोटोग्राफीपर्यंत विविध क्षेत्रांतील कामे अचूक आणि उत्तम पद्धतीने करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. हे ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात; मात्र राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण चक्क मोफत दिले जाते. एवढेच नव्हे, तर प्रशिक्षणानंतर ड्रोन उडवण्याचा अधिकृत परवानाही दिला जातो. अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, एरव्ही ज्यासाठी किमान लाख-दीड लाख रुपये मोजावे लागतात, तो १० दिवसांचा निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातो.
ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण कार्यक्रमामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केली. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना, विशेषत: ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
मुख्यत्वेकरून शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण, एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन या विषयांमधून प्रशिक्षणाचा विषय या कोर्समध्ये निवडता येतो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात 'डीजीसीए'ची सुरक्षित उड्डाण नियमावली, तसेच आधुनिक ड्रोन हाताळणी, ड्रोनचा मेन्टेनन्स वगैरे बाबींचे प्रशिक्षणही या कोर्समध्ये दिले जाते. प्रात्यक्षिक ज्ञानावर भर हे या कोर्सचे वैशिष्ट्य आहे. कोर्स कालावधीतील १० दिवसांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था आणि खर्चही अमृत संस्थाच करते. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्याला ड्रोन विकत घेऊन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचाही लाभ घेता येऊ शकेल.
कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. अमृत संस्थेची कार्यालये राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा.
नियम :
- उमेदवार वर दिलेल्या लक्ष्यित गटातील असावा आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- त्याचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे.
- उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
- अन्य सर्व कागदपत्रांसह वैद्यकीय अधिकाऱ्याकडून फिटनेस दाखला घेणे आवश्यक.
कोणत्याही देशासाठी तीन घटक हे त्या देशासाठी आधारस्तंभ असतात. शेतकरी आपल्याला जीवन देणारे अन्न पिकवतात. वैज्ञानिक आणि डॉक्टर आपले जीवनमान उंचावण्यास मदत करतात आणि सैनिक आपले संरक्षण करतात. या तीन आधारस्तंभांपैकी एक म्हणजे शेतकरी. अन्नदाता सुखी झाला तर आपणही सुखी होणार आहोत. शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास सुरुवात केली तर त्यांचे उत्पादन अधिक गुणवत्तापूर्ण आणि अधिक प्रमाणात तर होईलच; पण त्यासाठी लागणाऱ्या खर्चातही कपात करणे शक्य होईल. शेती निसर्गावर अवलंबून असते आणि निसर्गासमोर माणूस कधीही मोठा नसतो; मात्र या हवामानबदलाचा शेतीवर कसा आणि किती प्रमाणात परिणाम होणार आहे, याचा तंत्रज्ञानाच्या मदतीने अंदाज बांधता आला तर ते शेतकऱ्यांनाही फायद्याचे होणार आहे. असा फायद्याचा व्यवसाय असेल तर मग आपल्या या अन्नदात्याची पुढची पिढीसुद्धा गावातच राहून या व्यवसायाला आणखी मोठे स्वरूप देऊ शकेल. मग आपला देश खऱ्या अर्थाने ‘सुजलाम-सुफलाम’ होईल आणि आपला हा पोशिंदा, आपला अन्नदाता सुखी होईल...
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment