मानसिक आरोग्य क्षेत्रात अत्यंत मूलभूत आणि चौफेर कार्य करणारे आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. आनंद नाडकर्णी यांचं १५ मे रोजी निधन झालं. त्यांच्या कार्याचं मोठेपण जवळून अनुभवलेल्या अमित सामंत यांनी लिहिलेला हा त्यांच्या स्मृती जागवणारा लेख...
डॉ. आनंद नाडकर्णी सर गेल्याची बातमी आली आणि गेले दोन-तीन दिवस मन शब्दशः सुन्न झालंय! ज्या ध्रुवताऱ्याच्या दिशादर्शनावर आपण आजवर सुखेनैव प्रवास करत होतो, तो ताराच आता असणार नाही ही भावना REBT (रॅशनल इमोशनल बिहेवियर थेरपी) कितीही शिकली, तरीही सहज स्वीकार करण्यासारखी नाही.
सरांचं जाणं हे केवळ त्यांचे कुटुंबीय, सहकारी, पेशंट्स, वाचक, विद्यार्थी अथवा संस्थेचं नुकसान नाही, तर ते अखंड समाजाचं नुकसान आहे. ही केवळ एक डॉक्टर, लेखक, प्रभावशाली व्यक्तीची एक्झिट नव्हे, तर क्वचित निर्माण होणाऱ्या सामाजिक नेतृत्वाच्या जाण्याने तयार झालेली भयंकर पोकळी आहे.
सरांचा मला झालेला परीसस्पर्श!
अनंत अडचणी आणि मानसिक अस्वास्थ्य पार केल्यानंतर जेव्हा मी याच क्षेत्रात काम करायचं ठरलं, तेव्हा पाहिलं नाव समोर होतं डॉ. नाडकर्णी सर! मास्टर्स झाल्यावर काहीही करून सरांना भेटायचं हे एकमेव ध्येय होतं. योगायोगाने 'आयपीएच'मध्ये (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) निरीक्षणाची/शिकण्याची संधी इंटर्नशिपच्या रूपाने मिळाली; पण ठाण्यात राहणं, खाणं, प्रवास आदी खर्च बघता एकूण रस्ता कठीण होता. जवळच्या व्यक्तीने आर्थिक आणि मानसिक सपोर्ट दिल्याने 'आयपीएच'ला दाखल झालो. पहिल्याच दिवशी माझा नंबर थेट सरांसोबत लागला होता. चारचारदा वाचून खात्री केली! सरांच्या केबिनमधील तो पहिला दिवस आयुष्यात कायम लक्षात राहील असाच होता. सर समोर बसलेले... रुग्णांशी बोलत होते; पण पहिला तासभर माझ्या कानात काहीच जात नव्हतं. मी नुसतं सरांच्या प्रसन्न, हसऱ्या मुद्रेकडे पाहत बसलो होतो. त्या दिवसभरात सरांनी न थकता खूप रुग्ण तपासले... मध्येच येणारे फोन... आमच्या शंकांना उत्तरं... संध्याकाळी यू-ट्यूब शूटिंग, जातानाही चेहरा तेवढाच फ्रेश, आनंदी आणि नैसर्गिक हास्याने फुललेला!
त्यानंतरच्या वास्तव्यात सरांना अजून अनुभवता आलं, त्यांचं अद्भुत ज्ञान, समजावून सांगण्याची हातोटी, मृदू, पण ठाम बोलणं, उदाहरणं देणं... 'एम्पथी' शब्दाचं जिवंत रूप म्हणजे सर! आपल्या मुलीसाठी औषध न्यायला आलेल्या एका माध्यमवयीन स्त्रीची अत्यंत आपुलकीने चौकशी करताना, तिने स्वतःची काळजी घ्यावी म्हणून कडक शब्दांत सांगताना पाहून सरांना त्याचं कारण विचारलं. त्यांचं उत्तर होतं..., 'तिचा नवरा खूप वर्षं मानसिक विकाराने ग्रस्त होता. सासू अंथरुणाला खिळलेली. आता मुलीचा आजार. मग तिची काळजी तिने घेतलीच पाहिजे. बाकी औषध द्यायला आपण आहोतच!' एका सामान्य कामगार स्त्रीप्रति इतका संवेदनशील आणि दयाभाव असणारा माणूसच 'मेंटल हेल्थ फॉर ऑल' हे ब्रीदवाक्य (टॅगलाइन) सार्थ करू शकतो!
प्रत्येक पेशंटची हिस्ट्री सरांना तोंडपाठ असायची. याच वास्तव्यात निगरगट्ट वाटणारा माणूस सरांसमोर ढसाढसा रडताना पाहिला, आक्रमक म्हणून आणलेले पेशंट सरांसमोर गरीब गाय बनून बसलेले पाहिले, एक प्रचंड हट्टी खेळाडू सरांसोबत पाच मिनिटं बोलून अगदी नम्र झालेली बघितली, प्रशासन चालवताना थोडे कठोर निर्णय घेणारे सरही अनुभवायला मिळाले. सरांना कितीही आणि कोणतेही प्रश्न वर्ज्य नसत. जेवढं पुस्तकात शिकलो त्यापेक्षा जास्त आम्हाला 'आयपीएच'मध्ये शिकायला मिळालं. सरांची पुस्तकं वाचून चर्चा करता आली, आशीर्वाद घेता आला, आयुष्याचं सार्थक झालं!
सर : एक दीपस्तंभ
मानसिक त्रास असणं हे ज्या काळात कमीपणाचं मानलं जात होतं, तेव्हा सरांनी 'आयपीएच'च्या माध्यमातून 'सर्वांसाठी मानसिक आरोग्य' हे मिशन घेऊन मानसिक आरोग्य या सर्वाधिक गरजेच्या तरीही उपेक्षित क्षेत्रात शब्दशः चमत्कार वाटाव्यात अशा हजारो गोष्टी केल्या. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मानसोपचार, सामाजिक उपक्रम, जागृती कार्यक्रमांचा यज्ञ त्यांनी सुरू ठेवला आहे. दुर्धर मानसिक आजाराच्या रुग्णाला 'शुभार्थी' संबोधून त्यांनी त्याची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांना 'शुभंकर' असं नाव दिलं. हे शुभार्थी-शुभंकर मॉडेल देशातच नव्हे तर जगभर गाजलं. त्यांच्या संकल्पनेतील त्रिदल (आत्यंतिक मानसिक व्याधिग्रस्त लोकांना आधार व उपचार), 'आवाहन' हा अवेअरनेस उपक्रम, 'मनतरंग' हा मानसिक आरोग्याला वाहिलेला चित्रपट महोत्सव, 'प्रकाशदूत' (डिप्रेशन आणि व्यसन याबाबतचे उपक्रम), ड्रग्जसारख्या भयावह व्यसनांचे व्यक्ती आणि त्यांच्या सबंध कुटुंबावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करणारी 'नई पहचान', एलिगन्स कॉर्पोरेट ट्रेनिंग, मिशन एक्सलन्स ही क्रीडा क्षेत्रात चॅम्पियन बनवणारी फळी, जिज्ञासा हा नवतरुणांना मार्गदर्शन करणारा प्रोजेक्ट, आनंदी वृद्धत्वासाठी 'सेज' प्रकल्प, मैत्र हेल्पलाइन, अस्मि (युवतींसाठी उपक्रम), बहर (मेनोपॉज काळातील स्त्रियांसाठी उपक्रम), वेध, सप्तसोपान आदी मानसिक आरोग्य क्षेत्रातील प्रचंड मोठे प्रकल्प त्यांनी (डॉ. शुभा थत्ते, अनुराधा सोवनी आणि अन्य मान्यवर सहकाऱ्यांच्या साथीने) पूर्णत्वास नेले. सोबतच व्यक्तिगत शेकडो व्याख्याने, लेख, अनेक पुस्तके, यू-ट्यूब एपिसोड्स (पॉडकास्ट्स) अशी, इतकी अद्भुत, अशक्य वाटावी अशी कामं सरांनी पूर्ण केली. हजारो लोकांना व्यसनाच्या विळख्यातून सोडवणाऱ्या 'मुक्तांगण'च्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या वाटचालीतही सरांची भूमिका मोलाची राहिली आहे.
'आनंद मरते नहीं' हा सिनेमातील डायलॉग आज खूप जवळचा वाटला. सर लौकिकार्थाने गेले तरीही त्यांच्या चैतन्यस्पर्शाने घडलेली माणसं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं आता ध्रुवताऱ्याचं काम करतील!
- अमित सामंत, रत्नागिरी
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment