अधिक मासाचा अन्वयार्थ
भारतीय पंचांगात दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून, त्यामागे खगोलशास्त्रीय कारणही आहे. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित आहे, तर इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीवर आधारित असते. चांद्रवर्ष साधारण ३५४ दिवसांचे, तर सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजे दर वर्षी सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो.
हा फरक भरून काढण्यासाठी जवळपास ३२ महिने १६ दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास म्हणतात. म्हणूनच तो साधारणपणे तीन वर्षांनी येतो. यामुळे ऋतू, सण आणि पंचांग यांचा समतोल राखला जातो. यंदाचा अधिक महिना १७ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत आहे.
धार्मिक परंपरेनुसार, हा महिना पूर्वी मलमास म्हणून ओळखला जाई आणि त्याला विशेष मान नव्हता. पुराणकथेनुसार, या महिन्याने भगवान विष्णूंकडे आश्रय मागितला. तेव्हा विष्णूंनी त्याला आपले नाव देऊन ‘पुरुषोत्तम मास’ असे नाव दिले. असे गौरवपूर्ण स्थान मिळाल्याने हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो.
या महिन्यात जप, तप, दान, व्रत, सत्संग, भगवंताचे नामस्मरण आणि आत्मचिंतन यांना विशेष महत्त्व असते. विवाहासारखी शुभकार्ये टाळली जातात. कारण हा काळ बाह्य उत्सवांपेक्षा आंतरिक शुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी राखून ठेवलेला असतो.
अधिक मास आपल्याला शिकवतो, की जीवनातील विसंगती दूर करण्यासाठी पंचांगात ज्याप्रमाणे एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तसेच आयुष्यातही वेळोवेळी थांबून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. हा महिना म्हणजे स्वतःकडे पाहण्याची, संस्कार जपण्याची आणि अध्यात्माशी नाते दृढ करण्याची सुवर्णसंधी होय.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment