'आधुनिक दधीचि' अर्थात स्व. वसंतराव कसबेकर चरित्रग्रंथ प्रकाशनाचा पथदर्शी सोहळा

कल्पक नियोजन असलेला समारंभ

'आधुनिक दधीचि' अर्थात स्व. वसंतराव कसबेकर चरित्रग्रंथ प्रकाशनाचा पथदर्शी सोहळा मुख्य फोटो
मुख्य फोटो

आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी नि:स्वार्थपणे राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला वाहिले, त्या वसंतराव कसबेकर यांच्या समर्पित जीवनाची गाथा असलेल्या ‘आधुनिक दधीचि’ या चरित्रग्रंथाचे नुकतेच अकोल्यात प्रकाशन झाले. त्या प्रकाशनसोहळ्याची वैशिष्ट्ये सांगणारा लेख...

रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालय परिसरातील सभागृहात पार पडलेल्या 'आधुनिक दधीचि' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा भव्यदिव्य आणि नियोजनबद्ध होताच; पण त्याहूनही अधिक तो पथदर्शी स्वरूपाचा ठरला, याविषयी कुणाचेही दुमत होणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघर्ष अन प्रतिकूलतेच्या काळात अकोला-बुलडाणा परिसरात बँकांचे जाळे विणणारे आणि अनेक प्रथितयश शैक्षणिक संस्थांची मुहूर्तमेढ रोवणारे प्रचारक स्व. वसंतराव कसबेकर यांच्या प्रसिद्धीपराङ्गमुखतेच्या काळोखाआड दडलेल्या प्रेरणादायी जीवनचरित्राच्या प्रकाशनाचा हा सोहळा होता. संघ परिवारातील मंडळींचे आयोजन शिस्तबद्ध आणि काटेकोर वेळेनुसार होते, असे म्हटल्यास तो खरे म्हणजे पुनरुक्तीचा प्रमाद होईल. त्यापलीकडे या समारंभाच्या कल्पक नियोजनातील अनेक लक्षणीय उपक्रमांची नोंद घेणे अधिक मोलाचे आहे. 

या चरित्रग्रंथाची जन्मकथा अशी - प्रा. सुरेशराव कुळकर्णी यांनी पसायदानामृत हा दहा वर्षांपासून प्रसिद्ध होणारा वार्षिकांक आणि स्व. वसंतराव स्मृती व्याख्यान या दोन उपक्रमांमधून स्व. वसंतरावांच्या प्रेरणापुंजीचे जतन करणारी एक पणती जणू अखंड तेवत ठेवली. पुढे वसंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका लक्षात घेवून त्यांचे निर्मोही जीवनकार्य समाजासमोर आले पाहिजे हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी रवी भुसारी यांनी मोठी भूमिका घेतली. सुरेशराव कुळकर्णी यांच्या आठवणी शब्दबद्ध करण्याची जबाबदारी निशिकांत देशपांडे यांच्याकडे देण्यात आली, तर अन्य साह्यासाठी अकोल्यातील रामेश्वर फुंडकर, विनोद देशमुख, महेश जोशी, समीर थोडगे, राम भिरड, रवी कसबेकर, संदीप निकम, अतुल ठकरे, श्रीमती आरती लढ्ढा व वैशाली देशपांडे या अनुभवी व नि:स्पृह कार्यकर्त्यांना या मिशनमध्ये जोडण्यात आले. सर्वांना एकत्र आणून स्व. वसंतराव कसबेकर स्मृती संकलन समितीची स्थापना झाली आणि या संकल्पसिद्धीची मशालच जणू या सुजाण, अनुभवी आणि उत्साही मंडळींच्या हाती दिली गेली. गेल्या सुमारे वर्ष-दीड वर्षापासून समितीने निरपेक्ष भावाने केलेल्या कार्याचे सफल आणि प्रकट रूप म्हणजे पथदर्शी अशा स्वरूपाचा अविस्मरणीय प्रकाशन सोहळा.

अत्यंत आत्मीयतेने आयोजित केलेल्या या सोहळ्यातील विविध उपक्रमांमधून स्व. वसंतरावाविषयीचा आदर प्रकटला आणि त्यांच्या चरित्रातून अंगीकारलेली प्रेरणा दृग्गोचर झाली हे या उपक्रमाचे खरेखुरे फलित आहे. कार्यक्रमाकरिता कसबेकर कुटुंबीयांना आदरपूर्वक आमंत्रण देण्यात आले. त्यांच्या आजच्या पिढीतील आप्तांपैकी अनेक जण कार्यक्रमाला हजर राहिले. त्यातून कार्यक्रमाच्‍या आधी तर कसबेकर कुटुंबीयांचेच एक छोटे स्नेहमीलन झाले. यातील अनेक जण खूप वर्षांनंतर एकमेकांना भेटत होते. आपल्‍या वंशाची माहिती तयार करायची, तसेच परिवाराचा व्‍हॉट्सॅप ग्रुप तयार करायचा ठरावच जणू या कसबेकर कुटुंबीयांनी केला. डॉ. सौ. अपूर्वा पालकर या मुंबईतील रतन टाटा विद्यापीठाच्या कुलगुरू वसंतराव यांच्या त्या पुतणी. आपले मनोगत व्यक्त करताना त्या भारावून गेल्या होत्या. वसंतरावांच्या जाण्यानंतर जवळपास २३ वर्षांनी त्यांची आठवण ठेवणे, त्यांची माहिती गोळा करणे, पुस्तक काढणे, कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावून त्यांचे आदरातिथ्य करणे या सगळ्यामुळे एकूणच कसबेकर कुटुंबीय आनंद, अभिमान आणि कृतार्थतेने भारून गेले. संघकार्यात कोणतीही जबाबदारी आली तर ती आम्ही आनंदाने स्वीकारू हा हृदयातून आलेला त्यांचा कृतज्ञोद्गार सुखावून गेला. रवी कसबेकर यांच्या गीतगायनाच्या सुस्वरांना सार्थकतेची मखमली किनार होती. त्यामुळे हा केवळ पुस्तक प्रकाशनाचा औपचारिक कार्यक्रम न उरता त्यास कृतज्ञता आदानप्रदानाच्या उदात्त संस्कार सोहळ्याचे मूल्य प्राप्त झाले. आपसूकच हा सोहळा अनुभवणे सर्वच उपस्थितांच्या संवेदना जागवणारे ठरले. पंचपरिवर्तनातील कुटुं‍ब प्रबोधनाचा बिंदू असा सहज अंकुरित होताना पाहून संघाचा अधिकारीवर्ग नक्‍कीच सुखावला असेल.

'आधुनिक दधीचि' या चरित्रग्रंथाला सन्मानपूर्वक विराजमान करून त्याची पालखी खांद्यावरून मिरवणारी दिंडी सुरुवातीलाच काढण्यात आली. निर्मोही अन् निरपेक्ष समाजसेवेत जीवन व्यतीत केलेल्या एका अनोख्या जीवनचरित्राची पालखी आपल्या संस्कारक्षम खांद्यांवर वाहणारे बालगोपाल हे चित्र खूप सूचक आणि संदेशात्मक होते. विनायकराव पांडे यांच्या दमदार शंखनादाने अधिक अनुरूप अशी वातावरणनिर्मिती झाली. सुनीलमहाराज कराळे यांच्या वारकरी पथकाने या ग्रंथदिंडीचे नियोजन केले होते. महाराष्‍ट्राची परंपरा असलेल्‍या वारकरी दिंडीने सभागृहात भक्‍तीचा, प्रेमाचा आणि आनंदाचा अबीर गुलालच उधळला जणू. हे दृश्य टिपण्‍यासाठी मोबाइलचे कितीतरी कॅमेरे ऑन झाले होते.

वसंतरावांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या अकोला, बुलडाणा, देवलापार, नागभीड आदी ठिकाणच्या बँका तथा शैक्षणिक क्षेत्रातील एकंदर १२ संस्थांचे संचालक मंडळ या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. या सर्व संचालकांना त्यांच्या संस्थेसाठी वसंतराव कसबेकर यांची प्रतिमा भेट देऊन आयोजकांनी त्यांचा सत्कार केला. वयोज्येष्ठता आणि कर्तृत्व लक्षात घेऊन ज्येष्ठांचा त्यांच्याजवळ जाऊन केलेला अनौपचारिक सन्मान हे या कार्यक्रमाचे लक्षणीय वैशिष्ट्य होते. 'आधुनिक दधीचि' या चरित्रग्रंथाची प्रत प्रत्येकाला भेट करण्यात आली. 

अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे भाषण वसंतरावांविषयी मनात जपलेल्या अकृत्रिम आदरभावाने ओथंबलेले होते. कोणताही राजकीय अभिनिवेष नसलेले त्यांचे मनोगत उपस्थितांना भावले आणि स्व. भाऊसाहेबांचा समाजाधिष्ठित राजकारणाचा वारसा त्यांनी जपला असल्याचा साक्षात्कार उपस्थितांना आनंद देणारा ठरला. १९५० ते १९६८ या दीर्घ कालखंडात वसंतराव हे अकोल्यात विभाग प्रचारक होते. त्यानंतर तब्बल ३० वर्षांनी म्हणजे १९९८च्या सुमारास विभाग प्रचारक म्हणून दायित्व पार पाडलेले प्रदीप जोशी हे या सोहळ्यात मार्गदर्शक वक्ते होते हा एक उल्लेखनीय योगायोग. वसंतरावांचे कार्य म्हणजे केवळ बँका अथवा शैक्षणिक संस्था स्थापन करणे एवढ्या मर्यादित अर्थाचे नसून, प्राप्त परिस्थितीची गरज द्रष्टेपणाने ओळखून त्यानुसार समाजहिताचे काम उभे करणे यात त्यांच्या कर्तृत्वाचे अनोखेपण सामावले असल्याचे त्यांचे विश्लेषण भावणारे होते. 'अशा कारणांमुळेच अकोला विभागातील संघकार्य अन्‍य अनेक विभागांसाठी प्रेरक आहे, उदाहरण देता येईल असे आहे, हे मी अकोला विभागात असताना अनुभवले आहे,' हा त्‍यांचा अभिप्राय अकोलेकरांसाठी उत्साहवर्धक ठरेल असाच होता. 

आजच्या काळात वसंतराव असते तर कोणत्या विषयांची चिंता केली असती आणि त्यांनी काळाची गरज म्हणून कोणती कामे उभी केली असती, याचे चिंतन सर्वांनी केले पाहीजे. सध्‍या देशाच्‍या व्‍यवस्‍थांवर प्रश्‍नचिन्‍ह उभे करून देशविरोधी नॅरेटिव्‍ह समाजात रुजवण्‍याचा प्रयास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याविषयी जागरूकतेने सकारात्‍मकता निर्माण करणारी कामे त्‍यांनी उभी केली असती, वसंतरावांचा हा दृष्‍टिकोण आपण आज घेतला पाहिजे, हे प्रदीप जोशींचे आवाहन सर्वांच्‍या अंत:करणाला स्‍पर्शून गेले. 

प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी अध्‍यक्षीय भाषणातून पुस्‍तक प्रकाशनाचा सुंदर शब्‍दांत मागोवा घेतला. 'प्रचारकांवर निर्माण होत असलेली पुस्‍तके अमूल्‍य आहेत. ती आजच्‍या पिढीने काम कसे केले पाहिजे हे सांगणारा वस्‍तुपाठ आहेत,' असे सांगून मोघे .यांनी वसंतरावांसोबतचे काही अनुभव उपस्थितांना सांगीतले. 'वसंतराव महाल संघ कार्यालयातील रोजची वर्तमानपत्रे त्‍यांच्‍या कक्षात जपून ठेवत. एकदा आम्‍ही काही स्‍वयंसेवकांनी शाखा संपल्‍यानंतर कच्‍चा चिवडा बनवला. हा चिवडा खाण्‍यासाठी म्‍हणून रद्दी पेपर घेण्‍यासाठी मी वसंतरावांच्‍या कक्षात गेलो तर ते माझ्यावर रागावले. 'रद्दी पेपरसुद्धा संघाची प्रॉपर्टी आहे. असे कच्‍चे चिवडे खाण्‍यासाठी ते घेऊ नकोस,' असे मला त्यांनी स्पष्ट बजावले. या छोट्या गोष्‍टीतून वसंतरावांनी फार मोठा धडा आम्‍हाला दिला,' असे ते म्हणाले. 

मंचावर एलईडी स्क्रीनवरून प्रदर्शित केले गेलेले ग्रंथाचे मुखपृष्ठ आणि त्याविषयीची समीर थोडगे यांच्या कल्पकतेतून साकारलेली संक्षिप्त मांडणी आकर्षक आणि पूरक होती. सरसंघचालकांच्या शुभसंदेशाचे अतुल ठकरे यांनी केलेले वाचन यथार्थ होते. महेश जोशी यांचे सूत्रसंचालन अगदी नेटके आणि प्रभावी होते. या पुस्‍तकाचे लेखक डॉ. निशिकांत देशपांडे यांनी भावस्‍पर्शी आणि नेमक्‍या शब्‍दांत पुस्‍तकामागील प्रवास प्रास्‍ताविकातून मांडला. 

या पुस्तक प्रकाशनाचा संपूर्ण खर्च पुण्यातील सुधीर अलकरी आणि डॉ. अपूर्वा पालकर यांनी स्वयंस्फूर्तीने उचलला. त्यांनी व्यक्त केलेला हा कृतिप्रधान आदरभाव अनुकरणीय स्वरूपाचा आहे. प्रकाशन सोहळ्याच्या आयोजनाचे संपूर्ण आर्थिक दायित्व दी अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि अकोला शिक्षण प्रसारक मंडळ यांनी स्वतःकडे घेऊन वसंतरावांच्या कार्याप्रति संस्थेच्या अंत:करणात वसलेल्या ऋणनिर्देशाचे साजेसे प्रकटन केले. आपल्या परिसरातील सभागृह कार्यक्रमाकरिता निःशुल्क उपलब्ध करून देऊन बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीने समाजभान जपण्याची आपली परंपरा अधोरेखित केली. आयोजकांनीही या प्रेरणाक्षरांच्या मार्गात आर्थिक अडसर न ठेवता उपस्थितांना ग्रंथाची प्रत विनाशुल्क भेट दिली. अर्थात ऐच्छिक सहयोग राशीबाबत आवाहन केले होते आणि त्याला पर्याप्त प्रतिसाद मिळाला असणार, याबाबत अकोलेकरांच्या औदार्याची ख्याती ज्ञात असलेल्या कुणालाही शंका असणार नाही. 

स्वागत, सत्कार, प्रास्ताविक, गीत, आभारप्रदर्शन, वक्ते आणि पाहुण्यांचे मनोगत, या सगळ्याच बाबतीत कार्यक्रम आखीवरेखीव होता; कार्यक्रमाचे मॅनेजमेंट कसे असावे याचे उदाहरण घालून देणारा होता. संघाचे सर्वच कार्यक्रम तसेच असतात; पण सार्वजानिक जीवनात असा उत्‍कृष्‍ट व्‍यवस्‍थापन असलेला कार्यक्रम घडवून आणणे हे कौशल्‍य प्रशंसनीय आहे. सभागृहासमोरील आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रुचकर वऱ्हाडी भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. व्‍यवस्‍थेतील स्‍वयंसेवक आलेल्‍यांचे अगदी प्रेमाने स्‍वागत करत होते. सुरुवातीलाच कैरीचे चविष्‍ट पन्‍हे, कार्यक्रमात अधूनमधून थंड पाणी आणि गारेगार हॉलची व्यवस्था यातून आयोजन समितीने किती आत्मीयतेने काम केले होते, याची जाणीव सर्वांनाच झाली. या आयोजनातील ज्ञात-अज्ञात धुरंधरांना अक्षरश: सॅल्‍युट! 

महत्त्वाचे हे, की सोशल मीडियातील रील्सवर आपले पालनपोषण करवून घेण्याच्या या युगात समाजकार्याचा मानदंड स्थापित करणाऱ्या चरित्राच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणारे सभागृह, बसायला जागा नाही म्हणून बाहेर परिसरात उभे असलेले लोक हे एकंदर चित्र आपल्या सरासरी समाजभानाविषयी आश्वस्त करणारे आहे. आदर्श निर्माणाच्या प्रक्रियेत 'आधुनिक दधीचि' मैलाचा दगड ठरणार हा दिलासा देणारा हा प्रकाशन सोहळा सदोदित स्मरणात राहणारा असेल याविषयी काहीही शंका नाही.

- धनंजय देशपांडे, अकोला

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 18-05-2026 News publication date | Time: 10:22 AM News publication time | Views: 311 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 18-05-2026 News publication date | Time: 10:22 AM News publication time | Views: 311 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement