उद्योजक महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे अमृत संस्थेचे महत्त्वाचे काम : डॉ. तोरल शिंदे
रत्नागिरी : 'आजच्या काळात महिला उद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. अगदी घरापासून मोठ्या उद्योगापर्यंत वेगवेगळ्या पातळीवर महिला वैविध्यपूर्ण उत्पादने करतात; मात्र त्या सगळ्यांना बाजारपेठ मिळवून देणे हे खूप महत्त्वाचे काम आहे. त्या दृष्टीने अमृत संस्थेचे अमृतपेठ थेट बाजारपेठ हे खूप मोठे पाऊल आहे,' असे प्रतिपादन रत्नागिरीतील धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉ. तोरल शिंदे यांनी केले. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने रत्नागिरीत भरवलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज (११ एप्रिल) दुपारी झाले. त्यानंतर त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ग्रामविकास आयामाचे कोकण प्रांत संयोजक मोहन भावे आणि प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुहास ठाकूरदेसाई हे मान्यवरही उपस्थित होते. उद्घाटनानंतर मान्यवरांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी करून, लघुउद्योजकांशी संवाद साधला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनीही संध्याकाळी उशिरा प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी आणि खरेदी केली.
शहरातील साळवी स्टॉप परिसरात भरलेले हे प्रदर्शन १२ एप्रिलला दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेतही सुरू राहणार असून, अधिक तपशील बातमीच्या शेवटी दिला आहे. या प्रदर्शनात हापूस आंबे, कोकणी मेवा, कोकण प्रॉडक्ट्स, आइस्क्रीम, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, ज्वेलरी, पर्सेस, सेंद्रिय उत्पादने, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्स, सुगंधी अगरबत्त्या-धूप, लाकडी घाणा तेल, आयुर्वेदिक उत्पादने, शोभिवंत मासे अशा विविध उत्पादनांचे स्टॉल्स स्थानिक उत्पादकांनी मांडले आहेत. त्याशिवाय, चटकदार खाद्यपदार्थ, लाइव्ह मेंदी स्टॉल, आविष्कार या मतिमंद मुलांच्या शाळेतील मुलांनी केलेली उत्पादने आदींचेही स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. १२ एप्रिलला संध्याकाळी चार ते आठ या वेळेत आठ ते १२ वयोगटातील मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी सांगितले, 'रत्नागिरीतील अमृतपेठ थेट बाजारपेठेतील ३५ स्टॉल्सपैकी बहुतांश स्टॉल्स महिला उद्योजकांचे आहेत. देशातील ७० हजार स्टार्टअप उद्योगांपैकी ८० टक्के महिला आहेत, ही अभिमानाची बाब आहे आणि आपली ताकद आहे. अमृतपेठ हा उपक्रम राज्यभर यशस्वी झाला आहे; मात्र रत्नागिरीच्या अमृतपेठेचे वैशिष्ट्य हे, की यामध्ये स्टॉलधारकांना निःशुल्क स्टॉल देण्यात आला आहे. विविध जातींमधील दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासनाच्या विविध संस्था आहेत. अमृत ही खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली संस्था आहे; मात्र अमृतपेठ, अमृतवर्ग, अमृत पर्यटन अशा आयामांमध्ये संस्था जातीपातींचा विचार न करता सर्व जातींच्या गरजू व्यक्तींच्या विकासासाठी उपक्रम राबवते.'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ग्रामविकास आयामाचे कोकण प्रांत संयोजक मोहन भावे म्हणाले, 'प्रत्येकाचा विकास झाला तरच भारताचा विकास होईल. स्वदेशीचा आचार आणि स्वदेशीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यातून बेरोजगारीची समस्या संपुष्टात येईल. अमृतपेठसारख्या उपक्रमांचा उपयोग करून घेतला पाहिजे. सध्या खेडी ओस पडत असून, शहरे बकाल होत आहेत. अमृत संस्थेच्या सामाजिक योजनांना सर्वांचे सहकार्य लाभले, तर देशाची प्रगती होईल. उद्योजकता विकसित करताना उत्पादन उत्कृष्ट दर्जाचे असावे, किमतीच्या स्पर्धेत टिकणारे असावे. आपल्यात काय कमी आहे ते शोधले पाहिजे, काय चुकते आहे ते सुधारले पाहिजे. विक्रीची कला शिकली पाहिजे. कौशल्यविकासासाठी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. सगळे संपन्न असले, तर आपण संपन्न होऊ, हा विचार ठेवला पाहिजे.'
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अमृत संस्थेचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक संतोष जुवळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. महेश गर्दे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. बेकरी प्रशिक्षणाचा लाभ घेतलेले हृषीकेश सरदेसाई यांनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. अमृतसखी ऋचा बापटही या वेळी उपस्थित होत्या.
उद्घाटनाचा व्हिडिओ पुढील लिंकवर... https://www.facebook.com/share/v/1Dm9zK86Fp/
मान्यवरांनी केलेल्या पाहणीचा व्हिडिओ पुढील लिंकवर.... https://www.facebook.com/share/v/18b78TMmPm/
श्री. सरदेसाई - बेकरी प्रशिक्षण लाभार्थी व्हिडिओ :https://www.facebook.com/share/v/1Kdmb8Zv1a/
निमिष भावे - स्टॉलधारक :https://www.facebook.com/share/v/1D3nQ4dxmC/
आविष्कार संस्था : https://www.facebook.com/share/v/1CTFTvx7Lo/
अपूर्वा जोशी - स्टॉलधारक : https://www.facebook.com/share/v/1XwYh7p2iY/
केतन नाटेकर - स्टॉलधारक :https://www.facebook.com/share/v/18ZmsZhmkU/
https://www.facebook.com/share/v/1CYgpzbKUD/
https://www.facebook.com/share/r/1Lq2MHumAm/
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवते. त्यात उद्योजकतेला साह्य करण्यासाठी अमृतपेठ हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामुळे शेतकरी, महिला बचत गट, लघुउद्योजक, तसेच अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लाभार्थी, आणि स्वयंरोजगार करणाऱ्या लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होते. स्थानिक लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार स्थानिक उत्पादने खरेदीची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरत असून, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिनांक : ११, १२ एप्रिल २०२६
वेळ : दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत
आठ ते बारा वयोगटासाठी विविध स्पर्धा
संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत
स्थळ : बाळासाहेब ठाकरे यूथ अॅक्टिव्हिटी सेंटर हॉल,
डॉ. भोळे हॉस्पिटलच्या शेजारी, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
लोकेशन लिंक : https://share.google/ql5Ym7AabEgrCarSc
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228761, 9422003128, 7021209405
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment