स्थानिक कृषी आणि गृहोद्योगांतील उत्पादनांना मिळाली हक्काची बाजारपेठ
वणी (जि. यवतमाळ) : स्थानिक उत्पादक आणि शेतकरी यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे भरवण्यात आलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. जैताई मंदिर येथे आयोजित केलेल्या या अमृतपेठेचे उद्घाटन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सेवानिवृत्त नायब तहसीलदार अरुण कावडकर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी, महिला बचत गट व लघुउद्योजक यांनी तयार केलेल्या कृषी व गृहोद्योगातील विविध उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे उत्पादकांना योग्य दर मिळण्यास मदत झाली आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध झाली. उपस्थित मान्यवरांनी अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून शेतकरी व ग्रामीण उद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमृत संस्थेचे अधिकारी-कर्मचारी, तसेच स्थानिक स्वयंसेवक अमित उपाध्ये, ॲड. परितोष पानट, प्रा. कुंतलेश्वर तुरविले, कार्तिक पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment