व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वृद्धीसाठी वैयक्तिक संवाद साधून मार्गदर्शन
मलकापूर (जि. कोल्हापूर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरातील श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण समाजाच्या बैठकीत अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या बैठकीत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा जाणून घेण्यात आल्या. विविध योजनांअंतर्गत कोणाला कशाप्रकारे लाभ देता येईल, याबाबत वैयक्तिक चर्चा करण्यात आली. या प्रक्रियेत चार संभाव्य लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यात आली. तसेच पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी पूजासाहित्याच्या दुकानाची संकल्पना सांगण्यात आली. विशेष म्हणजे या संकल्पनेला त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व जागेचीही व्यवस्था झाली असून, लवकरच ते मलकापूर शहरामध्ये आपला व्यवसाय सुरू करणार आहेत.
व्यवसायासाठी कमर्शियल वाहन घेतलेल्या व्यावसायिकाची लाभार्थी म्हणून नोंद करून घेण्यात आली. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आलं. एकूणच, या बैठकीत सुमारे २० जण उपस्थित होते. अमृत संस्थेच्या योजनांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करून विश्वासार्हता वाढवून अधिकाधिक लाभार्थी जोडण्याच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरेल, असा विश्वास ब्राह्मण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment