स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त (२८ मे) निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा लेख...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता मुख्य फोटो
मुख्य फोटो

स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे, की शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते; त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत व त्यांचे विचार प्रत्येक भारतीयासाठी अमर आहेत. सरसंचालक बाळासाहेब देवरस लिहितात - 'स्वा. सावरकर हे ज्वलंत व जन्मजात देशभक्त, क्रांतिमंत्राचा उद्गाता, विज्ञानाधिष्ठित, तर्कसिद्ध व सार्वकालिक सत्य हिंदुत्वाचा प्रवक्ता, अखंड प्रेरणादायी श्रेष्ठ नेता, दिक्कालाला भेदून भविष्याचा वेध घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी, आशयसंपन्न निबंधकार, जीवनदर्शन घडवणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक, रक्ताच्या शाईत बुडवून विद्युल्लतेच्या लेखणीने लिहिणारा आणि उज्ज्वल भूतकाल व श्रेष्ठ परंपरांचे ज्ञान देऊन राष्ट्रभक्तीचा स्फुल्लिंग चेतवणारा ग्रंथकार, अतीत घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखवणारा द्रष्टा इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ, दूरदृष्टीचा राजनीतिज्ञ, क्रियावान समाजसुधारक, दशसहस्रेषु आढळणारा ओजस्वी वक्ता असे व्यक्तिमत्त्व होते. 'हे मातृभूमी, तुजला मन वाहियेले। लेखाप्रति विषय तूचि अनन्य झाला।' अशा समर्पण वृत्तीने इतिहासाच्या ज्ञानप्रकाशाने प्रकट केलेल्या व डोळसपणे स्वीकारलेल्या दिव्य व दाहक व्रताची सांगता करण्यासाठी त्यांनी हे सर्व गुण उपयोगात आणले, हे स्वा. सावरकरांचे आगळे वैशिष्ट्य होते.

आध्यात्मिक गुरू प. वि. वर्तक यांच्या मते सावरकर हे राजयोगी होते. ते महायोगी होते व त्यांना दिव्यदृष्टी होती. पातंजल योगात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा जन्मजात गुण आणि वागणुकीची पद्धत यांचा अभ्यास करून त्यांनी अतीत म्हणजे पूर्वीच्या गोष्टींची सविस्तर माहिती मिळवली होती व त्यामुळे त्यांना अनागत म्हणजे भविष्यात होणाऱ्या गोष्टी यांचे अचूक ज्ञान प्राप्त झाले होते. वर्तक यांच्या मते जवळजवळ ४० अशी उदाहरणे देता येतील, जेव्हा सावरकरानी फार पूर्वी पुढे काय होईल ते सांगितले होते व त्याप्रमाणेच घडले. सावरकरांची कूटनीती, हिंदुत्वाचे महत्त्व, सैनिकीकरण, समाज क्रांती, सामाजिक बंधुता, भाषाशुद्धी, अर्थचिंतन, त्यांचे इस्लामविषयक विचार, विज्ञाननिष्ठा, गो-विचार, स्त्री सबलीकरण, युवकांना प्रेरणा देणारे विचार असे सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.

सावरकरांच्या मते -

'अल्पसंख्याकांमधील जे विचारवंत आहेत, विवेकी आहेत, त्यांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे.'

'धर्मप्रचार वेगळा आणि फसवून, लालूच लावून धर्मांतर करणे वेगळे.'

सावरकरांचे काही विषयांवरील विचार आपण थोडक्यात पाहू या.

ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान

भारताचा इतिहास अतिप्राचीन असला, तरी सर्वसामान्य इतिहासकार ज्याला मान्यता देतात, अशा सिकंदराच्या भारतावरील मोहिमेपासूनच्या काळाचे सावकरांनी विश्लेषण केले आहे. भारत सार्वभौम राहावा, स्वतंत्र राहावा व परकीयांचा गुलाम होऊ नये यासाठी सावरकरांनी सहा सोनेरी पाने किंवा Six Glorious Epochs यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. सुवर्णपाने का लिहिली त्याबद्दल सावरकर सांगतात, 'प्रत्येक देशाला स्वातंत्र्ययुद्धांचे स्मरण केल्यामुळे जोश प्राप्त होतो. त्यांची अस्मिता तीव्र होते व माणसे आत्मविश्वासाने काम करून अनेक क्षेत्रांमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करतात. जसे, अमेरिकेच्या बाबतीत American war of Independence चे महत्त्व आहे. आपल्या प्राचीन इतिहासामुळे चीन, बॅबिलॉन, पर्शिया, इजिप्त, प्राचीन पेरू आणि मेक्सिको, ग्रीस आणि रोम अशा अनेक देशांना आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पाने परत परत वाचावीशी वाटतात. परंतु या सर्व राष्ट्रांतील ऐश्वर्य व वैभव काळाच्या ओघात नाहीसे झाले आहे व त्यांचे फक्त नाव शिल्लक राहिले आहे. परंतु भारताचा इतिहास हा सतत प्रेरणा देणारा व चिरंतन आहे. चीनच्या बाबतीत भारतासारखेच शक, हूण, मुघल यांनी चिनी संस्कृती नामशेष केली. प्रसिद्ध चायना वॉल बांधूनही चीन स्वतःचे संरक्षण करू शकला नाही. परंतु भारतीयांनी मात्र परकीयांचा प्रत्येक वेळी पराभव केला. परंतु तरीही खोडसाळ इंग्रजी इतिहासकारांनी जाणूनबुजून खोटा प्रचार केला, की हिंदू सतत पराभूत होत राहिले व ते नेहमीच परकीयांचे गुलाम होते. दुर्दैवाने काही भाडोत्री भारतीय इतिहासकारांनीही त्यांचीच री ओढली. सावरकर लिहीतात, 'हा प्रचार केवळ आपल्या देशाचा अभिमान कायम ठेवण्यासाठीच नव्हे तर ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी देशकार्य म्हणून करणे आवश्यक आहे.' सावरकर सांगतात, 'पिढ्यांमागून पिढ्यांनी, भारतीय योद्ध्यांनी परकीय हल्लेखोरांचा पराभव करून देशाचे स्वातंत्र्य कसे आबाधित ठेवले हे स्पष्ट करण्यासाठी मी सहा सुवर्णपाने वाचकांपुढे उलगडून दाखवत आहे.' सावरकरांनी सांगितलेले हे विचार त्रिकालाबाधित आहेत व शाळा, महाविद्यालयांच्या पुस्तकातून हे विचार जाणीवपूर्वक दूर ठेवूनही ज्या कोणाला जेव्हा केव्हा हे विचार वाचायला मिळतात तेव्हा त्यातील सत्यतेमुळे वाचक पूर्णपणे भारावला जातो व हे विचार आपण आधी का वाचले नाहीत म्हणून स्वतःला दोष देतो.

अनेक इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना इतिहासकार समजण्यास नाखूश असतात. परंतु सुप्रसिद्ध रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई एकदा वीर सावरकर यांना मुद्दाम भेटायला गेले असताना त्यांनी सांगितले, की 'सावरकर, आपण इतिहासातील घटनांची जंत्री देणारे नसून, आपण इतिहास निर्माण करणारे आहात.' वीर सावरकर यांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांना भारत सोडायला लावण्यात महान कारवाई तर केलीच; पण त्याशिवाय वसाहतवादी इंग्रज आणि इतर युरोपीयन, तसेच इंग्रजांच्या प्रोत्साहनाने स्वतःला इतिहासकार म्हणवणाऱ्या, खऱ्या इतिहासाची पूर्वग्रहदूषित मांडणी करणाऱ्या भारतीय व तत्सम अन्य तज्ज्ञांचेही दावे सत्यावर आधारित नाहीत, हे सप्रमाण दाखवून दिले.

वीर सावरकर यांचे ठाम मत होते, की जे देशवासीय जागरूकपणे आपल्या इतिहासाची माहिती करून घेत नाहीत, त्यांचे भविष्य हे अंधारमय आहे. देशाने आपल्या इतिहासाची चोख माहिती ठेवावी. परंतु, पूर्व इतिहासाचे गुलाम होऊ नये. वीर सावरकरांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस मुघलांचा विरोध हा त्या वेळेनुसार न्याय्य व योग्य होता. परंतु तीच भावना आज कायम ठेवणे हे अयोग्य आणि वेडेपणाचे होईल.

वीर सावरकरांनी त्यांच्या काळात असलेले इतिहासाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी संशोधन करून व अत्यंत परखडपणे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताचा खरा इतिहास लोकांपुढे ठेवला. वीर सावरकर आपल्या प्रत्येक लिखाणात प्रभावीपणे सांगतात, की 'इतिहासाच्या तीन सहस्र वर्षांत प्रबळ राजकीय शत्रूवर हिंदू राष्ट्राने वारंवार विजय मिळवून 'हिंदू हे गुलाम रहायलाच योग्य आहेत' हा अपसमज दूर केला. अलेक्झांडरच्या यावनी सैन्याने हिंदुस्थानवर स्वारी केली, त्या वेळी त्यांना दाती तृण धरायला लावून हिंदुकुशपर्यंत पिटाळून लावले. प्रलयंकारी हूणांच्या हल्ल्यात रोमन साम्राज्याचा चक्काचूर होऊन गेला; पण त्याच हूणांना हिंदू राष्ट्राने पूर्णपणे नाहीसे करून टाकले. त्यानंतर आलेल्या शक, कुशाणांच्या बरोबर चाललेल्या तीन शतकांच्या युद्धात शेवटी शक, कुशाण कोण होते ते प्रदर्शनात दाखवण्यापुरतेसुद्धा उरले नाहीत. पुढे मुसलमानांच्या हल्ल्यामध्ये सारे भारतवर्ष मुसलमानांनी ग्रासून टाकले; पण वीर सावरकर सप्रमाण दाखवून देतात, की जसे राहू सूर्यास ग्रासतो तसे केवळ ग्रहणकाळापुरते. संधी मिळताच हिंदूंनी मुसलमानांना 'दे माय धरणी ठाय' केले. मोगली तख्ताच्या ठिकऱ्या उडवल्या. सर्वांत शेवटी ज्या समुद्रातून ब्रिटिश भारतावर चढाई करून आले त्या समुद्रातच त्यांच्या साम्राज्यसत्तेला भारताने बुडवून टाकले. वीर सावरकर आग्रहाने सांगतात, 'Survival of the fittest — आम्ही हिंदू श्रेष्ठतम होतो म्हणून, जगावयास योग्य ठरलो.'

वीर सावरकर यांनी सप्रमाण दाखवून दिले, की हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी मराठ्यांनी, भारताच्या सर्व भागांमध्ये चढाई केली व तिथे न्यायावर आधारित प्रशासननिर्मिती केली. अनेक इतिहासकारांनी मराठ्यांना पेंढारी, लुटारू म्हणून संबोधले. परंतु, हे धादांत खोटे होते, हे त्यांनी सिद्ध केले.

आजही इंग्रज इतिहासकारांवर विश्वास ठेऊन १८५७मध्ये केवळ शिपायांचे बंड झाले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेक जण करत असतात. परंतु, १८५७मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध झालेले ते स्वातंत्र्यसमर होते हे अनेक इंग्रज इतिहासकारांच्याच पुस्तकांतून व तथ्यांच्या आधारे दाखवत अत्यंत कोवळ्या वयाच्या वीर सावरकरांनी अतुलनीय असे काम केलेले आहे. त्यांच्या या लेखनामुळे भारतातील सर्व ठिकाणच्या तरुणांमध्ये, विचारवंतांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व 'पूर्व दिव्य ज्यांचे, रम्य त्यांना भावीकाळ' यावर वीर सावरकरांनी शिक्कामोर्तब केले.

हिंदूपदपादशाही

मराठ्यांच्या इतिहासाबद्दल लिहिताना एक दुष्प्रचार केला जातो, की मराठे हे फक्त लुटारू होते व त्यांनी केवळ चौथाईचा हक्क वसूल करणे एवढेच काम केले. महाराष्ट्राच्या बाहेरील हा खोटा प्रचार खोडून काढत सावरकर आपल्या लिखाणातून सप्रमाण दाखवून देतात, की शिवाजी महाराज व पेशवे यांच्यामुळेच हिंदू साम्राज्य स्थापन होऊ शकले. मोगलांबद्दल लिहिणाऱ्या त्या काळच्या सर्व मुसलमान लेखकांनी केवळ मुसलमान बादशहांबद्दल स्तुतिपर लिहिले आहे. सावरकर लिहितात, 'हिंदू आणि मुसलमान यांच्या ऐक्यासाठी भाऊसाहेब व विश्वासराव यांनी १७६१ साली दिल्लीचे तख्त फोडले हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या घटनेने हिंदूंनी आम्ही शारीरिकदृष्ट्याही समानतेच्या पातळीवर समर्थ आहोत हे दाखवून दिले. हिंदूंना जिंकणाऱ्यांचा त्यांनी पूर्ण पाडाव केला. आमच्याबरोबर मुसलमानांना मैत्री पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याशी समानतेने वागले पाहिजे हे अधोरेखित केले व त्यामुळेच हिंदू व मुसलमान यांचे ऐक्य कायमचे कसे राहील याचा धडा दिला. सावरकरांच्या मते, छत्रपती शिवाजी, बाजीराव, भाऊसाहेब आणि जनकोजी, नाना आणि महादजी, रामदास आणि मोरोपंत यांच्या अभ्यासामुळे न्याय आणि मानवी हक्क तसेच स्वातंत्र्य व देशाची सार्वभौमता याचे उत्कृष्ट उदाहरण डोळ्यांसमोर उभे राहते. सावरकरांचे वरील विचार वाचल्यानंतर सामाजिक ऐक्य राखण्यासाठी प्रत्येकाला मदत होईल याचे आश्चर्य वाटायला नको.

१८५७चे स्वातंत्र्यसमर

प्रसिद्ध होण्यापूर्वीच बंदी घातलेले, मराठीतील पुस्तक नाहीसे झालेले असतानाही लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी ज्याचे पारायण केले ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे '१८५७ चे पहिले स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक होय. १८५७ साली झालेले युद्ध हे शिपायांचे बंड नसून ते स्वातंत्र्यसमर होते हे सावरकरांनी विस्तृतपणे दाखवून दिले आहे. ज्या देशाला आपल्या इतिहासाची योग्य जाणीव नसेल, त्याला कोणतेही भविष्य असत नाही हे स्पष्ट करताना इतिहासाचे योग्य ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सावरकर लिहितात. सावरकर पुढे लिहितात, छत्रपती शिवाजींच्या काळात मोगलांविरुद्धचा राग योग्य असला तरी आजच्या काळात मुसलमानांविरुद्ध कोणतीही भावना ठेवणे हे केवळ मूर्खपणाचेच नसून पूर्णपणे अन्यायकारक आहे. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध हिंदू व मुसलमान यांनी एकत्रपणे परकीय इंग्रजांशी दिलेल्या लढ्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सिंधूपासून म्यानमारमधील इरावडीपर्यंत भारत एक आहे व भारत अखंड राहिला पाहिजे हे सावरकरांचे ठाम मत होते. १८५७चे युद्ध म्हणजे स्वधर्म व स्वराज्य यासाठीचा लढा होता हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हिंदू समाजातील वैगुण्ये

हिंदू समाजातील विविध चालींचा प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतर सावरकर अंतर्मुख होतोत आणि भारतातील विविध प्रकारच्या सात बंदींकडे लक्ष वेधतात. त्या अशा

१. वाळीत टाकणे – श्रुतीस्मृतीपुराणोक्त बेडी

२. लोटीबंदी (पाणी पिण्यावरील बंदी)

३. रोटीबंदी (जेवणावरील बंदी)

४. बेटी बंदी (आंतरजातीय विवाहावरील बंदी)

५. स्पर्शबंदी (अस्पृश्यता)

६. शुद्धीबंदी (धर्मांतर केलेल्या लोकांना शुद्ध करून/पल्या धर्मात घेण्यास बंदी)

७. सिंधुबंदी (समुद्रप्रवासावर बंदी)

सावरकर लिहितात, या सात बंदी म्हणजे हिंदू समाजाच्या पायातील बेड्या होत्या. या बेड्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य परकीय सत्तेने घातलेल्या नव्हत्या, तर हिंदूंनीच त्यांच्या धर्मरक्षणासाठी घातल्या होत्या. त्यामुळे सावरकर त्यांचा उल्लेख सात स्वदेशी बेड्या असा करतात. हिंदूंचे गुणच विवेक न बाळगल्यामुळे त्यांचे दोष बनले. भगवद्गीतेचा संदेश असा आहे, की गुण हेसुद्धा सापेक्ष आहेत आणि परिपूर्ण नाहीत. माणसामाणसांमध्ये सत्त्व, रज आणि तामस गुणांवर आधारित भेद करण्याची आवश्यकता आहे. भगवद्गीतेच्या या महत्त्वाच्या संदेशाकडे हिंदूंनी दुर्लक्ष केले आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला. जिंकल्यानंतर शरण आलेल्या शत्रूला जीवदान देणे हा आपल्याकडे गुण समजला जातो; परंतु त्याचा गैरवापर करून कृतघ्न अशा महम्मद घोरी, रोहिला नजीबखान यांना मोकळे सोडल्यामुळे त्यांच्यावर उपकार करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण याला त्यांनी ठार मारले व दुसऱ्याने मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात पराभव करणाची हिंमत दाखवली. हिंदूंच्या अत्यंत पवित्र अशा सोमनाथ मंदिराचा विध्वंस मुसलमानांनी केला. त्यानंतर अनेक वेळेला सुवर्णसंधी लाभूनही विषारी अशा नाग-सापांसारख्या क्रूर मुस्लिम हल्लेखोरांच्या एकाही मशिदीची एकही वीट हिंदूंनी उपसून काढली नाही.

भुकेलेल्याला जेवण व तहानलेल्याला पाणी देणे हा गुण आहे असे हिंदूंनी पाठ केले होते. त्यामुळे या अत्यंत विषारी अशा नाग-सापांसारखा क्रूर मुस्लिम हल्लेखोरांना योग्य धडा शिकवण्याऐवजी ते दूध पाजत राहिले. मथुरा, काशी ते थेट रामेश्वरपर्यंतच्या अनेक मंदिरांमध्ये फोडून तिथल्या विटा हिंदूंचा अपमान करण्यासाठी मुसलमानांची शौचालये आणि मुताऱ्यांमध्ये पायदळी तुडवल्या जात असताना अशा अक्षम्य अपराधाकडे दुर्लक्ष करून त्यांना क्षमा करणे हा हिंदूंचा सर्वांत मोठा अपराध समजला पाहिजे. राजकीय विजय मिळवल्यानंतरही काशी, मथुरा येथील एकही मशीद हिंदू राजांनी फोडली नाही. जास्तीत जास्त काही ठिकाणी त्यांनी पुन्हा मंदिरे उभारली. हे एकदा नव्हे, तर वारंवार घडल्याचे सावरकर अधोरेखित करतात.

हिंदूंच्या स्त्रिया पळवणे व त्यांना स्वतःच्या जनानखान्यात कोंबणे हे आक्रमक मुसलमान आपले धर्मकर्तव्य समजत होते. परंतु अनेक वेळा आक्रमक मुसलमानांवर विजय मिळवल्यानंतरही मुसलमानांनी कोंडलेल्या हिंदू बायकांना हिंदू राजांनी सोडवले नाही व त्यांना मुसलमानांच्या कैदेतच गुलाम म्हणून खितपत ठेवले. सावरकरांच्या मते हा अक्षम्य अपराध होता. मुस्लिम स्त्रियांना हिंदू करणे हा तर घोर अपराध समजला जात होता. अनेक मुस्लिम स्त्रियाही हिंदू स्त्रियांवर अत्याचार करत होत्या. परंतु तरीही स्त्रियांवर दया दाखवण्याचा हा गुणाचा अतिरेक होऊन हिंदूंनी स्वतःचे अपरिमित नुकसान केले. सावरकर खेदाने म्हणतात, अहिंसा, दया, शत्रूच्या बायकांबद्दलही उदारता, शरण आलेल्यांना क्षमा, धार्मिक सहिष्णुता हे नक्कीच गुण आहेत. परंतु ते कधी व कसे वापरायचे याचा विवेक चालवल्यानेच हिंदू समाजाचे ते दोष ठरले. सावरकर खेदाने म्हणतात,

पात्रापात्र विवेकशून्य, आचरि जरी सद्गुण ।।

तो तोचि ठरे दुर्गुण, सद्धर्मघातक ।।

(पाचवे सुवर्णपान - प्रकरण सात)

सावरकरांच्या मते 'ज्याची ज्याची पितृभू आणि पुण्यभू आसिंधुसिंधू भारतभू आहे तो हिंदू!'

विज्ञाननिष्ठ सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विज्ञाननिष्ठ निबंध यामध्ये अनेक विषयांवर सविस्तर लिहिले आहे. निसर्गचक्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सावरकर लिहितात, विश्वातील यच्चयावत वस्तुजातीच्या मुळाशी जी शक्ती आहे तिला देव म्हणावयाचे असेल, तर देवाने हे सारे विश्व मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना भाबडी, खुळी व खोटी आहे. मनुष्य हा विश्वाच्या देवाच्या खिजगणतीतही नाही. या विश्वाच्या देवाशी कोणताही संबंध जोडण्याची हाव मनुष्याने सोडून द्यावी हेच इष्ट. कारण तेच सत्य आहे. माणसाचे वाईट किंवा बरे करणे या दोन्ही भावना विश्वाच्या देवाच्या ठायी असमंजस आहेत. सावरकर पुढे लिहितात, मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट अशी नीती-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवाला आवडते ते चांगले आणि मनुष्याला जे सुखदायी ते देवाला आवडते, या दोन्ही समजुती खुळचट आहेत. कारण त्या असत्य आहे. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही. फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे, फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे – असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची तीच खरी खरी पूजा!

सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद

बुद्धिप्रामाण्यावर भर देऊन सावरकरांनी सामाजिक क्रांती केली. सावरकरांच्या मते हिंदू राष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत होणाऱ्या दुष्ट राष्ट्रीय रूढींसही हे श्रुतिस्मृतिपुराणोक्तच अमर करून ठेवत आले आहेत. कर्तृत्वाचे हातपाय जखडून टाकण्याच्या या बेड्या तोडल्याच पाहिजेत आणि ते सुदैवाने आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. कारण या बेड्या मानसिक आहेत.

सावरकर आग्रहाने सांगतात, भारतीयांनी विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा! यापुढे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट, सुधारणा इष्ट की अनिष्ट या प्रश्नांचे उत्तर ती आज उपयुक्त की अनुपयुक्त आहे या एकच प्रत्यक्ष कसोटीवर पारखून दिले पाहिजे. तिला शास्त्राधार आहे का, हा प्रश्न आता कधीही विचारला जाऊ नये.

कोणतीही गोष्ट राष्ट्राच्या उद्धारार्थ आज आवश्यक आहे ते प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. कोणताही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित आम्ही मानत नाही. पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वे सन्मानतो, पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून, अनुलंघ्य धर्मग्रंथ म्हणून नाही. त्यातील सारे ज्ञान, अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्राच्या उद्धारणास जे आवश्यक वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार.

ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?

आधुनिक इतिहासातील एक हजार वर्षांच्या इतिहासाचे विश्लेषण करून सावरकर लिहितात, की केवळ ज्याला आपण तपस्या म्हणतो त्यामुळे कदाचित आत्मप्रसाद मिळत असेल; पण त्यामुळे राष्ट्रीय उत्थान इत्यादी भौतिक चळवळींचे यश किंवा अपयश अवलंबून नसते, तर मुख्यतः ते भौतिक सामर्थ्यावर अधिष्ठित असते. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे तेव्हाच यशस्वी झाले, जेव्हा त्यांनी ऐहिक, भौतिक, प्रत्यक्ष सृष्टीत उपयोगी पडतील तेवढी साधने संपादून विपक्षावर सामर्थ्यात मात केली. मग त्याला धार्मिक पोथ्यातील कल्पनांप्रमाणे आध्यात्मिक अधिष्ठानाचा पाठिबा असो वा नसो. हे स्पष्ट करताना सावरकर पुढे म्हणतात, त्यामुळेच या प्रत्येक धर्मातील लोकांचा कधी जय वा कधी पराजय झाला आहे. सावरकर पुढे म्हणतात, ज्यांना ज्यांना आपल्या चळवळीस ऐहिक यश हवे, त्याने त्याने आमच्या पक्षास न्याय आहे, आमच्या पक्षास देव आहे, आम्ही विजयी होणारच अशा वल्गना करण्याच्या नादी न लागता 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे,' इतकेच काय ते खरे मानावे आणि वैज्ञानिक सामर्थ्यशाली प्रत्यक्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहून वरचढ होण्याचा यत्न करावा. हेही लक्षात ठेवावे, की कोणतेही वैभव कोणाचेही सदैव टिकलेले नाही. वैज्ञानिक बळाने जे ऐहिक यश मिळवू शकतात, ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले, तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले, तरी ऐहिक यश मिळत नाही हाच सिद्धांत!

स्पर्शबंदी (अस्पृश्यता)

आम्ही शाळंतून पूर्वास्पृश्य मुलांना सरमिसळ बसवण्याची चळवळ रत्नागिरी जिल्हाभर चालवली, तेव्हा गावोगाव स्पृश्य जनता चवताळून उठली. जो तो आम्हांस म्हणाला, 'अहो, तुम्ही आम्हा स्पृश्यांच्या धर्मभावना का दुखवता?' तेव्हा आम्ही त्यांना विचारावे, की 'आम्ही तरी काय करावे? तुम्हास जशा भावना आहेत तशाच अस्पृश्यांना नाहीत का? तुमची भावना त्यांना कुत्र्याहून दूर सारावे ही. ती न दुखवावी तर आमच्या मानवी धर्मबंधूंना कुत्र्याहून अस्पृश्य मानण्यात नि ज्या शाळेत कुत्री बसतात त्यातून त्यांना हुसकून देण्यात त्यांच्या भावना दुखतात? अशा परिस्थितीत ज्यांची भावना अन्याय्य, लोकहितविघातक, आततायी, त्यांचीच भावना दुखवणे प्राप्त. चोराची भावना दुखवू नये म्हणून सावास जागवू नये की काय?' तोच न्याय बुद्धिभेद करू नका, भावना दुखवू नका ही ओरड करणाऱ्या सर्वांच्या प्रकरणी लागू आहे!

खरोखरच चातुर्वर्ण्यालाच जर सनातन धर्म म्हणावयाचा असेल, तर सनातन धर्माचा-जर कोणी कट्टर शत्रू असेल तर तो जातिभेदाचे निर्मूलन करू निघालेला सुधारक नसून जातिभेदासही सनातन म्हणून उचलून धरणारा 'सनातन धर्माभिमानी'च होय.

सिंधुबंदी (समुद्रप्रवासावर बंदी)

मलबारातील मोपल्यांचे आणि मध्य प्रांतातील 'हलबीचे' उदाहरण वानगीसाठी विवंचून पाहा! 'समुद्र यातु: स्वीकार: कलौ पंच विवर्जयेत् – समुद्रगमन करणाऱ्याला जातिबहिष्कृत करावे, हा सिंधुबंदीचा करंटा धर्मनियम जेव्हा शास्त्रांनी घालून दिला, तेव्हापासून हिंदूराष्ट्राचा सारा परदेशीय वाणिज्य व्यापार आम्ही आपण होऊन परक्यांच्या हाती सोपवून दिला! अर्थात मलबारातील हिंदूराजेही समुद्र उल्लंघणे महापाप समजू लागले. परंतु अरब लोक मलबाराशी जो सामुद्रिक व्यापार करत, त्याद्वारे अलोट संपत्ती मिळते तीही आपल्याला मिळाली, आपल्याच सत्तेखालच्या सेवकांनी आपल्या मोठमोठ्या वाणिकनौका घेऊन नि जगातील द्रव्य आणून आपल्या कोशात त्याची भर घालावी, अशीही लालसा त्या मलबारी हिंदू राजांना झाली. तेव्हा समुद्रगमनाचे पाप तर हिंदूंच्या हातून होऊ नये आणि समुद्रगमनानेच मिळणारी जागतिक वाणिज्यसंपदा तर संपादिता यावी, या दोन्ही परस्परविरुद्ध हेतूंना साधणारी कोणती फक्कड युक्ती त्या हिंदू राजांनी काढली म्हणता? तर प्रत्येक हिंदू कुटुंबातील एका एका मुलाने मुळातच हिंदूचे मुसलमान व्हावे ही!! तशी राजाज्ञा सुटली आणि या 'धार्मिक' भावनेपायी सहस्रावधि कुटुंबांतील एक एक मुलगा मुसलमानास देऊन टाकला! स्वयंपाक करावयास सरपण हवे म्हणून हातपायच कापून चुलीत कोंबण्यात आले!! ही ऐतिहासिक घटना आहे – सिंधुबंदीचा 'धर्म' रक्षावा म्हणून मुसलमान झाले – त्यांचेच वंशज हे मोपले मुसलमान! आज तेच हिंदू समाजावर अनन्वित बलात्कार करून, सहस्रावधी हिंदूंना तरवारीच्या धाकाने बाटवून गोताचेच काळ झाले आहेत!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे अजरामर आहेत व त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते. सावरकरांनी हे विचार मोठ्या प्रमाणात १९३५ ते १९५० या काळात लिहिलेले असले, तरीही ते जणू काही आजच लिहिलेले आहेत इतके ताजेतवाने आहेत व त्यातून त्यांनी काढलेली अनुमाने पूर्णपणे काळाच्या मर्यादांवरती विजय मिळवून चिरंतन झाली आहेत. हे विचार जेवढे आपण वाचतो, विचार करतो, तेवढे ते आपल्याला पटत जातात आणि अभ्यास करणारा तेव्हाच सावरकरमय होऊन जातो. विशेष म्हणजे लोकांनी स्वतःच हे विचार स्वीकारल्यामुळे त्यांचा कोणीही प्रचार न करताच ते विचार पुनःपुन्हा वाचले जातात व त्यामुळेच लोकांना स्फूर्ती प्राप्त होऊन ते अमर झालेले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांतर्फे त्यांना साष्टांग अभिवादन!

- प्रवीण दीक्षित

(निवृत्त पोलीस महासंचालक)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 26-05-2026 News publication date | Time: 11:58 AM News publication time | Views: 209 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 26-05-2026 News publication date | Time: 11:58 AM News publication time | Views: 209 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement