वर्ध्याच्या भाविक धाबलियाने गुणवत्तेच्या जोरावर मिळवला 'आयआयटी हैदराबाद'मध्ये प्रवेश

अमृत संस्थेकडून मिळाले ६० हजार रुपयांचे अर्थसाह्य

वर्ध्याच्या भाविक धाबलियाने गुणवत्तेच्या जोरावर मिळवला 'आयआयटी हैदराबाद'मध्ये प्रवेश मुख्य फोटो
मुख्य फोटो

वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. देशातील नामांकित केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपयांचे आर्थिक साह्य देण्याच्या महत्त्वपूर्ण योजनेचाही त्यात समावेश आहे. या योजनेचा लाभ वर्धा शहरात राहणाऱ्या भाविक जयेश धाबलिया या गुणवंत विद्यार्थ्याला मिळाला आहे. 

भाविक सध्या हैदराबाद येथील आयआयटी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेत यश मिळवून त्याने या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला आहे. त्याची जिद्द, मेहनत आणि चिकाटीमुळे त्याने आपल्या स्वप्नांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अमृत संस्थेकडून या वर्षी भाविकला ६० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. यामुळे त्याच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासाला नवे बळ मिळाले आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना भाविक म्हणाला, 'अमृत संस्थेच्या या योजनेमुळे मला मोठा आधार मिळाला आहे. आर्थिक साह्यामुळे माझ्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. मला मिळालेल्या या अर्थसाह्याचा मी माझ्या शिक्षणासाठी सर्वोत्तम उपयोग करीन. अमृत संस्थेचा मी मनापासून आभारी आहे.'

या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा पातळीवर मार्गदर्शन करून समन्वय साधल्याबद्दल भाविक आणि त्याच्या वडिलांनी अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश पंडितराव खराटे यांचे विशेष आभार मानले. भाविकचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अमृत संस्थेने त्याचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लक्ष्यित गटातील युवक-युवतींनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य संधी मिळाल्यास छोट्या शहरातील विद्यार्थीही देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाविक धाबलिया होय. अमृत संस्था अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहून त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227632

पत्ता : अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा कार्यालय, 

प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,

सिव्हिल लाइन, वर्धा.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 13-03-2026 News publication date | Time: 12:14 PM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: wardha Related district of the news
Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 13-03-2026 News publication date | Time: 12:14 PM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words