गृहिणीच्या जिद्दीला मिळाले 'अमृत'चे पाठबळ आणि उभा राहिला डेअरी उद्योगातील ब्रँड

बीडमधील स्नेहल जोशी यांची प्रेरक यशोगाथा

गृहिणीच्या जिद्दीला मिळाले 'अमृत'चे पाठबळ आणि उभा राहिला डेअरी उद्योगातील ब्रँड मुख्य फोटो
गृहिणीच्या जिद्दीला मिळाले 'अमृत'चे पाठबळ आणि उभा राहिला डेअरी उद्योगातील ब्रँड अतिरिक्त फोटो

बीड : उद्योजक व्हायचे असेल, तर भांडवल महत्त्वाचे असतेच; पण त्यापेक्षाही महत्त्वाची असते ती जिद्द आणि चिकाटीने मेहनत करण्याची वृत्ती. बीडमध्ये याचे उत्तम उदाहरण सौ. स्नेहल मनोज जोशी यांनी घालून दिले आहे. एक मार्च २०२६ रोजी श्री समर्थ सत्येंद्रनाथ डेअरी फार्म या नावाने त्यांनी स्वतःच्या अधिकृत ब्रँडची स्थापना करून नव्या व्यवसायाचा प्रारंभ केला. उत्पादनांची शुद्धता, सात्त्विकता आणि ग्राहकांचा विश्वास यावर हा स्थानिक ब्रँड उभा राहिला आहे. त्यांची इथपर्यंतची वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. 

सौ. स्नेहल मनोज जोशी या एक सर्वसामान्य गृहिणी. त्यांचे पती शिक्षक आणि या दाम्पत्याला दोन मुले. संसार सुरळीत सुरू असतानाही त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची जिद्द सतत प्रज्ज्वलित होती. कोणता व्यवसाय करायचा, कसा सुरू करायचा, याबद्दल स्पष्टता नव्हती; पण स्वप्न मात्र ठाम होते. या काळात त्यांना पतीची भक्कम साथ मिळाली आणि दोघांनी मिळून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बीडमध्ये शुद्ध, सात्त्विक आणि घरगुती चवीची लस्सी आणि बासुंदी उपलब्ध करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम रंग, फ्लेव्हर्स, रासायनिक घटक आणि कृत्रिम घट्टपणा आणणारे पदार्थ न वापरता फक्त शुद्ध दूध, दर्जेदार घटक वापरून त्यांनी ही उत्पादने तयार करायला सुरुवात केली. घरगुती प्रेमाची चव असल्याने त्यांची गोडी काही वेगळीच होती. सुरुवातीला त्यांनी घरातूनच लस्सी आणि बासुंदी तयार करून विक्री सुरू केली. अवघ्या १५ दिवसांतच ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. 'चव अप्रतिम आहे,' 'मोठ्या प्रमाणावर सुरू करा - आम्ही सहकार्य करू' अशा प्रतिक्रिया ग्राहकांकडून येऊ लागल्या. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि व्यवसाय विस्ताराचा विचार पक्का झाला.

परंतु व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्यामुळे पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज त्यांना भासू लागली. त्याचवेळी त्यांना अमृत संस्थेच्या उद्योजकता कौशल्यविकास कार्यक्रमाची माहिती मिळाली. पतीसह त्यांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांच्याकडून योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन घेतले आणि तत्काळ प्रशिक्षणासाठी नोंदणी केली.

बीडमध्ये अलीकडेच झालेल्या पार पडलेल्या १० दिवसांच्या उद्योजकता विकास कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. उद्योजकतेचे मूलभूत तत्त्वज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, जाहिरात व ब्रँडिंग, विक्री व्यवस्थापन, बिझनेस प्लॅन तयार करणे, आवश्यक कागदपत्रे, बँकिंग व फायनान्शियल मॅनेजमेंट, शासकीय योजना आणि अमृतपेठ याबाबत त्यांना सखोल माहिती मिळाली. विविध क्षेत्रांतील उद्योजक सहकारी लाभल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिकच बळकट झाला.

आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास या बळावर त्यांनी होळीच्या एक दिवस आधी म्हणजे एक मार्चपासून श्री समर्थ सत्येंद्रनाथ डेअरी फार्म या नावाने स्वतःचा अधिकृत ब्रँड सुरू करून नव्या व्यवसायाचा रीतसर प्रारंभ केला. आता त्यांनी उत्पादनांच्या श्रेणीत वाढ करून ताक, तूप, पनीर, दही, खवा यांसारखी शुद्ध व ताजी उत्पादने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व उत्पादने आरोग्याच्या दृष्टीने पोषक असून, उपवास करणाऱ्यांसाठीही योग्य व विश्वासार्ह ठरण्याकरिता विशेष काळजी घेतली जात आहे. शुद्धतेला आणि गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन स्थानिक ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून हा व्यवसाय उभा राहत आहे. शुद्धता, सात्त्विकता आणि विश्वास यावर आधारित असलेला स्थानिक ब्रँड त्यांनी उभारला आहे. त्यांच्या या यशाचा अमृत संस्थेला अभिमान असून, त्यांच्या पुढील वाटचालीतही अमृत संस्था त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही अमृत संस्थेकडून देण्यात आली आहे.

सौ. स्नेहल जोशी यांच्यासारख्या अनेक महिलांना अमृत संस्था विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून प्रगतीचे नवे पंख देत आहे, त्यांचा आत्मविश्वास उंचावत आहे आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवत आहे. अमृत संस्था विविध कौशल्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे राबवत असून, इच्छुकांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून पुढील प्रशिक्षणवर्गासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468

पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय,

अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड, 

वाघ नेत्रालयाशेजारी, बीड

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 10:59 AM News publication time | Views: 161 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 10:59 AM News publication time | Views: 161 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words