'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेचा लाभ घेऊन सुरू केले खते, बी-बियाण्याचे दुकान

कळंबमधील व्यावसायिकाला योजनेचा झाला चांगला उपयोग

'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेचा लाभ घेऊन सुरू केले खते, बी-बियाण्याचे दुकान मुख्य फोटो
मुख्य फोटो

कळंब (धाराशिव) : उद्योग उभारण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यासाठी कर्ज हा एक प्रभावी पर्याय मानला जातो; मात्र कर्जावरील व्याजाचा वाढता ताण अनेक नवउद्योजकांसाठी अडथळा ठरतो. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेऊन कळंब (ता. जि. धाराशिव) येथील अमर पुरुषोत्तम तापडिया यांनी खते, बी-बियाणे दुकान सुरू केले आहे. अमर तापडिया यांनी स्थानिक बाजारपेठेतील मागणी ओळखून हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बँकेतून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. नियमित हप्ते भरल्यामुळे त्यांना अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळाला.

या योजनेअंतर्गत कर्जदाराने बँकेचे हप्ते वेळेवर भरल्यास, कर्जावरील १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा मिळतो. त्यामुळे व्याजाचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो. तापडिया यांना आतापर्यंत ७९,७०६ रुपयांचा व्याजपरतावा मिळाला असून, तो थेट बँक खात्यात जमाझाला आहे. ही रक्कम त्यांनी उद्योगविस्तारासाठी वापरली. 

'शासनाच्या योजनांची योग्य माहिती घेतली आणि प्रामाणिकपणे कर्जफेड केली, तर उद्योग उभारणे आणि चांगल्या प्रकारे चालवणे शक्य आहे. अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेमुळे माझ्यावरचा आर्थिक ताण कमी झाला आणि व्यवसाय वाढवण्यास मदत झाली,' असे अमर तापडिया यांनी सांगितले.

अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता? 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?

वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65469 

पत्ता : अमृत संस्थेचे धाराशिव जिल्हा कार्यालय,

ऋणानुबंध, तळमजला, वृंदावन कॉलनी,

जिल्हा कारागृहासमोर, धाराशिव 

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 06:06 PM News publication time | Views: 194 Number of times this news has been viewed | District: dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 06:06 PM News publication time | Views: 194 Number of times this news has been viewed | District: dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words