उत्तम व्यवसाय करण्यासाठी वयाचा अडसर नाही; अमरावतीच्या चित्रा सुतकरांचे आदर्श उदाहरण

अमृतपेठ प्रदर्शनातील घरगुती खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

उत्तम व्यवसाय करण्यासाठी वयाचा अडसर नाही; अमरावतीच्या चित्रा सुतकरांचे आदर्श उदाहरण मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांना वयाची मर्यादा नसते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चित्रा सुतकर. वयस्कर असूनही त्यांनी पहिल्या अमृतपेठ प्रदर्शनामध्ये घरगुती खाद्यपदार्थांचा स्टॉल लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या हातचे चविष्ट, पारंपरिक आणि स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेले पदार्थ ग्राहकांच्या पसंतीला उतरले. त्यामुळे त्यांच्या स्टॉलवर मोठी गर्दी झाली. साहजिकच त्यांच्या स्टॉलवरच्या विक्रीने विक्रमाचे आकडे ओलांडले.

चित्रा सुतकर यांची खासियत म्हणजे हार न मानण्याची वृत्ती. अनेकांना या वयात विश्रांती हवी असते; पण चित्राताई मात्र उत्साहाने, हसतमुखाने आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करतात. प्रत्येक ग्राहकाला प्रेमाने समजावून सांगणे, चवीची खात्री देणे आणि स्वतः उभे राहून स्टॉल सांभाळणे ही त्यांची वैशिष्ट्ये. विशेष म्हणजे आता त्यांच्या या व्यवसायात त्यांच्या सूनबाईसुद्धा सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. सासू-सुनेची ही जोडी एकत्रितपणे घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय पुढे नेत आहे. अनुभव आणि नव्या पिढीची ऊर्जा यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यवसायात पाहायला मिळतो. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे.

सहा ते आठ मार्च या कालावधीत झालेल्या अमृतपेठ प्रदर्शनामध्येही त्यांचा स्टॉल होता. त्यांच्या हातच्या घरगुती खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या स्टॉलला भेट दिली. चित्रा सुतकर यांचे उदाहरण सर्व महिलांसाठी आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. वय काहीही असो, जिद्द, कुटुंबाचा आधार आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: अश्विनी संजीव पुसतकर News publisher name | Date: 02-03-2026 News publication date | Time: 04:39 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: अश्विनी संजीव पुसतकर News publisher name | Date: 02-03-2026 News publication date | Time: 04:39 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words