लक्ष्यित गटातील इच्छुकांनी 'अमृत'च्या योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय उभा करण्याचे आवाहन
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेचे सांगली जिल्हा कार्यालय, सांगली पालकमंत्री कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या सहयोगाने अमृत शासकीय योजना संवाद मेळावा २४ फेब्रुवारी रोजी सांगलीतील विश्रामबाग येथे पार पडला. उपस्थित मान्यवरांनी या वेळी शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांनी अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, उद्योजकांकरिता राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याजपरताव्यासारख्या योजना, विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विविध योजना यांची माहिती दिली. तसेच लक्ष्यित गटातील नवोदित उद्योजक व व्यापाऱ्यांना व्यवसायवाढीसाठी उपयुक्त अशा अमृत पेठ ऑनलाइन व ऑफलाइन उपक्रमांची माहिती दिली. नोकरीच्या मागे न लागता लक्ष्यित गटातील इच्छुकांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय उभा करून नोकरी देणारे व्हावे असे आवाहन केले.
प्रास्ताविकात विजय वरूडकर यांनी पालकमंत्री कार्यालय हेल्पलाइन ही संकल्पना मांडली आणि त्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका सौ. विद्या कुलकर्णी यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून राबवण्यात येणाऱ्या योजना व अनुदान याबद्दल सविस्तर माहिती दिली. या योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावा आणि रोजगारनिर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
'स्वावलंबी भारत'चे समन्वयक भूपाल सुल्ह्यान यांनी बँक व्यवहार, कर्ज प्रकरणे व इतर बाबतीत नेमके काय करावे हे सांगितले. समन्वयक माधव कुलकर्णी यांनी स्वावलंबी भारत संस्था उद्योग क्षेत्रात करत असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच उद्योजकांना असलेल्या संधी व उद्योजकतेचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका सौ. विद्या कुलकर्णी यांचे स्वागत पालकमंत्री कार्यालयाचे संयोजक विजय वरूडकर यांनी केले. अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी व जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचे स्वागत केदार खाडिलकर यांनी केले. 'स्वावलंबी भारत'चे माधव कुलकर्णी व भूपाल सुल्ह्यान यांचे स्वागत श्री. साठे यांनी केले.
विविध योजनांच्या माहितीसाठी पालक मंत्री कार्यालय व अमृत जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सर्व मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र यरगट्टीकर यांनी केले. तसेच श्री. साठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत जिल्हा कार्यालय,
अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर,
राजवाडा, सांगली ४१६४१६
शैलेंद्र जहागीरदार (जिल्हा व्यवस्थापक, अमृत) : ९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment