विशेष योजनेतून दरमहा १० हजार रुपयांचे अर्थसाह्य
बीड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. एम्स (एआयआयएमएस), आयआयटी, ट्रिपलआयटी, आयआयएम यांसारख्या नामवंत केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याच्या योजनेचाही त्यात समावेश आहे. या योजनेचा लाभ बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलंबा गावातील वरद विजय सुलाखे या गुणवंत विद्यार्थ्याला मिळाला आहे.
लक्ष्यित गटातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक बळ देण्याचे महत्त्वाचे कार्य अमृत संस्था सातत्याने करत आहे. वरद विजय सुलाखे हा विद्यार्थी त्यापैकीच एक. वरद पंजाबमधील भटिंडा येथील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. अत्यंत कठीण आणि बुद्धिमत्तेचा प्रचंड कस पाहणाऱ्या प्रवेश परीक्षेत यश मिळवल्यामुळे त्याला त्या संस्थेत प्रवेश मिळाला. अमृत संस्थेकडून गेल्या वर्षी वरदला एक लाख १० हजार रुपयांचे साह्य करण्यात आले होते. या वर्षी त्याला ६० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले असून, पुढील चार वर्षांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अमृत संस्था त्याला दरमहा १० हजार रुपयांचे साह्य करणार आहे.
वरद सुलाखे याने याबद्दल भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, 'एमबीबीएस हे खूप खर्चिक शिक्षण आहे; मात्र अमृत संस्थेच्या योजनेमुळे मला मोठा आधार मिळाला. मला मिळालेल्या या साह्याचा मी माझ्या शिक्षणाकरिता सर्वोत्तम उपयोग करेन. अमृत संस्थेचा मी मनापासून आभारी आहे.'
या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर सतत मार्गदर्शन करून समन्वय साधल्याबद्दल वरदने अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांचेही विशेष आभार मानले आहेत.
वरदच्या या प्रेरणादायी यशाबद्दल अमृत संस्थेने त्याचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. वरदसारखे अनेक विद्यार्थी सध्या अमृत संस्थेच्या या योजनेचा लाभ घेत असून, लक्ष्यित गटातील युवक-युवतींनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमृत संस्था मेहनती आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभी राहते, याचा विश्वास अशा उदाहरणांतून दृढ होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468
पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय,
अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड,
वाघ नेत्रालयाशेजारी, बीड
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment