छत्रपती संभाजीनगर : कोणताही मोठा उद्योग उभा करायचा असेल, तर त्याकरिता पैसे उभारण्यासाठी कर्ज हा एक चांगला पर्याय असतो; मात्र व्याजाची टक्केवारी लक्षात घेता परतफेडीच्या रकमेचा मोठा ताण उद्योजकावर येतो. म्हणूनच प्रामाणिकपणे उद्योग करणाऱ्या आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या उद्योजकांसाठी ‘अमृत’ या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेऊन वडोद-चाथा (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सागर सोनटक्के यांनी उद्योजकतेचे आधुनिक, यशस्वी मॉडेल उभे केले आहे. त्यांची यशोगाथा प्रेरक आहे.
छत्रपती संभाजीनगर : कोणताही मोठा उद्योग उभा करायचा असेल, तर त्याकरिता पैसे उभारण्यासाठी कर्ज हा एक चांगला पर्याय असतो; मात्र व्याजाची टक्केवारी लक्षात घेता परतफेडीच्या रकमेचा मोठा ताण उद्योजकावर येतो. म्हणूनच प्रामाणिकपणे उद्योग करणाऱ्या आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या उद्योजकांसाठी ‘अमृत’ या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेऊन वडोद-चाथा (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सागर सोनटक्के यांनी उद्योजकतेचे आधुनिक, यशस्वी मॉडेल उभे केले आहे. त्यांची यशोगाथा प्रेरक आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही संस्था कार्यरत आहे. त्या संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ घेऊन सागर सोनटक्के यांनी गीर या देशी जातीच्या गायीचे दूध आणि तूप उत्पादनाचा व्यवसाय उभा केला आहे. सोनटक्के यांनी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेसाठी अर्ज सादर केल्यानंतर चिखली अर्बन बँकेच्या सिल्लोड शाखेकडून साडेआठ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्या पैशांतून त्यांनी गीर जातीच्या उच्च प्रतीच्या गायी खरेदी केल्या. तसेच गोठ्यासह पशुपालनाची अत्याधुनिक सुविधा उभारली. सुरुवातीपासूनच त्यांनी नेमके नियोजन केले. त्यामुळे व्यवसायाला वेग आला आहे. व्याजपरतावा योजनेअंतर्गत १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाची रक्कम कर्जदाराला ‘अमृत’कडून परत दिली जाते. त्यासाठी कर्जदाराने कर्जाचे बँकेने ठरवून दिलेले हप्ते नियमित भरणे आवश्यक असते. हप्ते नियमित भरलेले असल्यास कर्जावरील केवळ व्याजाच्या रकमेचा परतावा दर तीन महिन्यांच्या अंतराने लाभार्थ्याच्या बँक खात्यात ‘अमृत’तर्फे केला जातो. त्यामुळे लाभार्थ्यावरचा व्याजाचा मोठा ताण कमी होतो. सोनटक्के यांनाही याचाच फायदा झाला.
सध्या गीर गायीचे दूध ८० ते १०० रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. दुधाची विक्री ते सिल्लोड शहरामध्ये करतात. गीर गायीच्या शुद्ध तुपाला संभाजीनगर आणि पुण्यात तब्बल अडीच हजार रुपये प्रति किलो एवढा दर सोनटक्के यांना मिळतो. कारण त्यांच्या उत्पादनाचा दर्जा उत्तम आहे. त्यामुळेच त्यांच्या उत्पादनांना वाढती मागणी आहे. त्यामुळे सोनटक्के यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. व्याजपरतावा मिळाल्यामुळे त्या पैशांचा उपयोग उद्योगातील अन्य गरजांसाठी करता येतो.
शेतीला पूरक म्हणून सोनटक्के यांनी सुरू केलेला हा उद्योग तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दूध व तूप उत्पादनाबरोबरच ते गोठ्यातून तयार होणारे सेंद्रिय शेणखत स्वतःच्या शेतात वापरतात आणि नैसर्गिक शेती करतात. त्यांच्या शेतातील स्वच्छ, नियोजनबद्ध आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्था विशेष कौतुकास्पद आहे.
‘अमृत संस्थेच्या योजनांमधून शेतकरी व ग्रामीण भागातील युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. योग्य वेळी योजना समजून घेतल्या आणि त्यांचा लाभ घेतला, तर प्रत्येक जण स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो. मला यासाठी अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी महत्त्वाचे मार्गदर्सन केले,’ असे सागर सोनटक्के यांनी सांगितले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment