विहामांडवा (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) : खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या ‘अमृत’ या महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेच्या योजनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील विहामांडवा गावातील पाच विद्यार्थ्यांना कम्प्युटर टायपिंगचे प्रशिक्षण विनामूल्य घेता आले आहे.
विहामांडवा (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) : खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या ‘अमृत’ या महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेच्या योजनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील विहामांडवा गावातील पाच विद्यार्थ्यांना कम्प्युटर टायपिंगचे प्रशिक्षण विनामूल्य घेता आले आहे. गौरी संतोष कुलकर्णी, वेदिका अनंत लंबे, तुषार कैलास कुलकर्णी, पार्थ विजय तुपकरी, वरद अनंत लंबे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्था आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिंदी, इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचे (स्पीड ३०, ४० शब्द प्रति मिनिट) सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले जाते. जून २०२५मध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर फीचे प्रत्येकी साडेसहा हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ‘अमृत’कडून जमा करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. गावातील श्री लक्ष्मी इन्स्टिट्यूटमध्ये या विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले. या विद्यार्थ्यांना ‘अमृत’च्या योजनेच्या माध्यमातून परीक्षा फीचे साडेसहा हजार रुपये परत मिळाल्याबद्दल श्री लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे संचालक अस्लम शेख यांनी ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांचे विशेष अभिनंदन केले.
योजना नेमकी काय आहे?
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाइन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगारक्षम आणि रोजगारक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत अशा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील ‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती (वयोगट १६ ते ४५ वर्षे) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अर्ज केल्यानंतर फीचे साडेसहा हजार रुपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात.
‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जाती : ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, ऐयागर, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, कानबी, राजपूत, कोमटी, इत्यादी.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीय आणि रहिवास प्रमाणपत्र), अमृत लक्ष्यित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, राष्ट्रीय बँक पासबुक किंवा पोस्ट खात्याचे आयएफएससी कोडसह तपशील.
तुम्हालाही घ्यायचा आहे का ‘अमृत’च्या या किंवा अन्य कोणत्याही योजनांचा लाभ?
संपर्क : अक्षय चंद्रकांत लंबे – 7391065475
‘अमृत’, जिल्हा व्यवस्थापक – छत्रपती संभाजीनगर.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment