अचलपूरमधील भूषण जोशी यांच्या मेडिकल सर्व्हिसच्या व्यवसायाला मिळणार आर्थिक हातभार
अचलपूर (जि. अमरावती) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था लक्ष्यित घटकांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. त्यातील वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेमुळे अचलपूर येथे मेडिकल सर्व्हिसचा व्यवसाय करणारे भूषण जोशी यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल सुरू होणार आहे. व्यवसायवाढीच्या उद्देशाने त्यांनी आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून, त्या कर्जावरील व्याजपरतावा अमृत संस्थेमार्फत मंजूर करण्यात आला आहे.
भूषण जोशी यांनी मेडिकल सर्व्हिसचा व्यवसाय अधिक सक्षमपणे उभारण्याकरिता आवश्यक साहित्य खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी अमृत संस्थेकडे व्यावसायिक वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेअंतर्गत अर्ज सादर केला होता. योजनेसाठी पात्र ठरल्याने आता वैयक्तिक कर्जावरील व्याजपरताव्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या व्याजपरताव्यामुळे भूषण जोशी यांच्या मेडिकल सर्व्हिसच्या व्यवसायाला मोठा हातभार लागणार असून, त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यास बळ मिळणार आहे.
अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता?
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment