धुळ्यातील भूमी शाह हिला मिळाला अमृत संस्थेच्या 'जीसीसी-टीबीसी' योजनेचा लाभ; शिक्षणाला नवी उभारी
धुळे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत शासकीय टायपिंग परीक्षा (जीसीसी-टीबीसी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फी परतावा देण्याची योजना सुरू आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ धुळ्यातील कु. भूमी अरविंद शाह या विद्यार्थिनीला मिळाला आहे. तिला साडेसहा हजार रुपयांच्या प्रशिक्षण शुल्काचा परतावा देण्यात आला असून, त्यामुळे तिच्या शैक्षणिक प्रवासाला नवचैतन्य मिळाले आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असताना या मदतीमुळे तिच्या शिक्षणाला भक्कम आधार मिळाला आहे.
अमृत संस्था विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने विविध योजना राबवत असून, जीसीसी-टीबीसी ही योजना त्यापैकीच एक प्रभावी उपक्रम ठरत आहे. या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य मिळते आणि ते शिक्षणासोबतच इतर कोर्सही करू शकत आहेत. यामुळे स्पर्धात्मक युगात त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढत आहे.
या लाभाबद्दल भूमीने अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ती म्हणाली, 'माझ्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात जाणवत होत्या. त्यामुळे नियमित शिक्षणासोबत मला आणखी कोर्स करणे शक्य होत नव्हते; पण मला अमृत संस्थेच्या धुळे जिल्हा कार्यालयातून जीसीसी-टीबीसी योजनेची माहिती मिळाली. मी लगेच या योजनेच्या लाभासाठी अर्ज केला. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला थोड्याच दिवसांत ६५०० रुपयांचे शुल्क परत मिळाले. या अर्थसाह्यामुळे मला पुढील शिक्षण सुरू ठेवण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.'
एकंदरीतच, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमृत संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अनेक विद्यार्थी या योजनेत सहभागी होऊन कौशल्यविकासाद्वारे उज्ज्वल करिअरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment