चौसाळा (ता. जि. बीड) : काही तरी वेगळे करून दाखवण्याची असलेली जिद्द, त्यासाठी मेहनत करण्याची असलेली तयारी आणि त्याला मिळालेली योग्य प्रशिक्षणाची जोड यातून काय चमत्कार घडू शकतो, ते पाहायचे असेल, तर बीडमधील प्रथमेश प्रसाद देशमुख या तरुणाला भेटायला हवे.
चौसाळा (ता. जि. बीड) : काही तरी वेगळे करून दाखवण्याची असलेली जिद्द, त्यासाठी मेहनत करण्याची असलेली तयारी आणि त्याला मिळालेली योग्य प्रशिक्षणाची जोड यातून काय चमत्कार घडू शकतो, ते पाहायचे असेल, तर बीडमधील प्रथमेश प्रसाद देशमुख या तरुणाला भेटायला हवे. त्याची यशोगाथा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य सरकारची स्वायत्त संस्था असून, खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ती कार्यरत आहे. या संस्थेच्या मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाचा लाभ प्रथमेशला मिळाला आणि त्याच्या जिद्दीला आणि मेहनतीला जणू प्रेरणेचे नवे पंखच मिळाले. त्यातून त्याने मोठी झेप घेतली आहे.
प्रशिक्षणातून व्यवसायासाठी तयार
प्रथमेश कृषिशास्त्र पदवीचे शिक्षण घेत होता, तेव्हाच त्याला अमृत संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. यातून आपल्याला नवे काहीतरी करता येईल याची जाणीव होताच त्याने लगोलग आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आणि फेब्रुवारी २०२५मध्ये राहुरी (जि. अहिल्यानगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘अमृत’तर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून त्याला ड्रोनची मूलभूत ते प्रगत टप्प्यांवरची (बेसिक टू अॅडव्हान्स) सारी माहिती मिळाली. तसेच, ड्रोन ऑपरेशन म्हणजेच शेतात ड्रोन प्रत्यक्ष उडवायचा कसा, त्यातून शेतात फवारणी नेमकी कशी करायची याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण अर्थात प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रथमेशला मिळाले. ड्रोन उडवण्यासाठी ड्रोन पायलट लायसेन्सही लागते. तेही त्याला मिळाले.
चार महिन्यांत मिळवला शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास
प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रथमेशला आपण योग्य पाऊल उचलल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. कारण त्याला आता या क्षेत्रातील मोठ्या व्यवसायिक संधी खुणावू लागल्या होत्या. त्याची आवड आणि क्षमता या गोष्टींचा विचार करून त्याला त्याच्या वडिलांनी शेतात फवारणीसाठीचा ड्रोन आणि आवश्यक संच विकत घेऊन दिला. त्यातून त्याने जून २०२५मध्ये आपला व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आतापर्यंतच्या अवघ्या चार महिन्यांत प्रथमेशने २०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या साह्याने फवारणी केली आहे. त्यातून त्याने सुमारे एक लाख रुपयांची कमाई केली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याने शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यातून त्याच्या व्यवसायाचा पाया पक्का झाला आहे.
सतत अपडेट होत राहणे हा प्रगतीचा मूलमंत्र
शेतात फवारणी करणे हा हंगामी म्हणजे सीझनेबल व्यवसाय असल्याचे प्रथमेशच्या लक्षात आले; पण त्याच वेळी त्याला अमृतने सुरू केलेल्या नवीन, अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्या प्रशिक्षणात ड्रोनद्वारे सर्वेक्षण (Survey) आणि मॅपिंग, ड्रोनचे कृषी क्षेत्रातील विविध उपयोग, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयात ड्रोनचा वापर, तपासणी व मॉनिटरिंग आणि ड्रोन मास्टर ट्रेनर आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यापैकी ड्रोनद्वारे मॅपिंग आणि सर्वेक्षण या विषयातील प्रशिक्षण प्रथमेशने नुकतेच पूर्ण केले आहे. सतत शिकत राहणे हा प्रगतिशील उद्योजकाचा एक गुणधर्म असतो. प्रथमेशमध्ये तो दिसतो. नव्या प्रशिक्षणामुळे ड्रोन या विषयातील त्याचे ज्ञान अद्ययावत झाले असून, त्याचा व्यवसाय आता अधिक उंच भरारी घेत आहे. (प्रथमेशचा व्हिडिओही सोबत दिला आहे.)
‘अमृत’साठी अभिमानाची गोष्ट
अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी आणि अमृतमित्र सुमित धिरडे यांनी प्रथमेशची नुकतीच प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत त्यांनी त्याच्या व्यवसायातील कामकाज जाणून घेतले. त्याच्या व्यवसायाच्या अधिक वाढीसाठी मार्गदर्शन केले. तसेच, अमृत संस्था भविष्यातही पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी दिला. या पाठबळामुळे प्रथमेश अत्यंत आनंदित झाला असून, त्याने अमृत संस्थेचे मनापासून आभार मानले आहेत.
अमृत संस्थेच्या प्रशिक्षणातून घडलेला हा उद्योजक आज स्वबळावर उभा आहे, हे ‘अमृत’चे सर्वांत मोठे यश असून, ‘अमृत’साठी ती अभिमानाची गोष्ट आहे. प्रथमेशला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
संपर्क : प्रथमेश प्रसाद देशमुख – 093225 30562
पुढची यशोगाथा तुमचीही असू शकते!
‘अमृत’कडून राबवण्यात येणाऱ्या विविध मोफत प्रशिक्षण योजनांची माहिती घ्या, कौशल्य प्राप्त करा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा.
अधिक माहितीसाठी संपर्क –
विशाल अशोकराव जोशी, बीड जिल्हा व्यवस्थापक, अमृत
मोबाइल : 7391065468, 9421173251
अमृत जिल्हा कार्यालय : अथर्व कॉम्प्लेक्स, पहिला मजला, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड.
…….
‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जाती : ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, ऐयागर, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, कानबी, राजपूत, कोमटी, इत्यादी.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीय आणि रहिवास प्रमाणपत्र), अमृत लक्ष्यित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र
तुम्हालाही घ्यायचा आहे का ‘अमृत’च्या या किंवा अन्य कोणत्याही योजनांचा लाभ?
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment