'अमृत'च्या योजनेमुळे कोरोनानंतर व्यवसाय सावरण्यासाठी डॉ. मोहनलाल कुलकर्णी यांना मिळाला भक्कम आधार
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर उद्भवलेली परिस्थिती अत्यंत बिकट होती. संसर्ग आटोक्यात आणण्यात नंतर यश आले. त्या काळातील लॉकडाउनमुळे व्यवसायांचे झालेले नुकसान भरून येण्याासाठी मात्र खूप काळ जावा लागला. त्यामध्ये अनेक छोटे व्यवसाय बंद पडले, तर अनेक व्यवसायांचे नुकसान अद्यापही भरून आलेले नाही. कोल्हापुरातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. मोहनलाल सुधीर कुलकर्णी हेही असा फटका बसलेल्यांपैकीच एक; मात्र अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेमुळे त्यांच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांना आतापर्यंत ५३ हजार २४६ रुपयांचा व्याजपरतावा एकरकमी मिळाला आहे.
डॉ. मोहनलाल सुधीर कुलकर्णी यांनी आपली वैयक्तिक आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी त्यांनी व्यावसायिक कर्ज घेतले; पण कोरोना काळात उद्भवलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होऊन बसले. कर्जाच्या व्याजाचा भारही वाढत होता. दरम्यानच्या काळात त्यांना अमृत मेळाव्यातून अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी अमृत संस्थेच्या कोल्हापूर कार्यालयातून याबद्दलची सविस्तर माहिती घेतली आणि अमृत संस्थेच्या वेबसाइटवर सर्व कागदपत्रे अपलोड केली. त्यांना लेटर ऑफ इंटेंट मिळाले. त्यानंतर त्यांनी कर्जाच्या व्याजफेडीची कागदपत्रेही अपलोड केली. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांना मंजुरीपत्र प्राप्त झाले आणि ५३ हजार २४६ रुपयांचा व्याजपरतावादेखील मिळाला. यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला असून, अमृत संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना कुलकर्णी यांच्या व्यवसायाला नवसंजीवनी देणारी ठरली.
कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, 'कोरोनानंतर व्यवसायात निर्माण झालेल्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेने मला आर्थिक बळ दिले. या मदतीमुळे व्यवसाय उभा राहू शकला. व्यवसायात आर्थिक संकट असतानाही अमृत संस्थेमुळे सावरता आले, व्यवसायात स्थिरावता आले. एक महिन्याच्या आत एखाद्या लाभार्थ्याला लाभ मिळवून देणारी अशी सक्षम शासकीय यंत्रणा विरळाच असेल. या आर्थिक साह्यामुळे केवळ कर्जाचा ताण कमी झाला नाही, तर भविष्यासाठी नवी आशा निर्माण झाली.'
अमृत संस्थेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लक्ष्यित गटातील नागरिकांनी निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन करून त्यांनी इतर उद्योजकांनाही पुढे येण्याचे आवाहन केले.
अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता?
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment