नवी ऊर्जा देणारे पर्यटनस्थळ
महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे १११८ मीटर उंचीवर वसलेले चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे. हिरवीगार निसर्गसंपत्ती, वैविध्यपूर्ण जीवसृष्टी आणि आल्हाददायक हवामान यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि इतिहासाच्या अभ्यासकांसाठी एक शांत, सुंदर आश्रयस्थान ठरते.
चिखलदरा हे नाव महाभारताच्या पुराणकथांशी जोडले गेले आहे. असे मानले जाते, की याच ठिकाणी भीमाने बलाढ्य कीचकाचा पराभव करून त्याला खोल दरीत फेकून दिले. यामुळे या ठिकाणाला सुरुवातीला कीचकदरा असे नाव मिळाले. ते पुढे चिखलदरा म्हणून ओळखले जाऊ लागले. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले चिखलदरा घनदाट जंगलांनी वेढलेले आहे आणि मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा एक भाग आहे. या हिरव्यागार परिसरात असंख्य वनस्पती आणि प्राण्यांचे विविध प्रकार आढळतात. येथील जंगलात साग, बांबू आणि औषधी वनस्पतींची विपुलता आहे.
वन्यजीवप्रेमींना येथे वाघ, बिबटे, अस्वल आणि सांबर, हरीण आदी प्राणी पाहायला मिळू शकतात. तसेच, पक्षिनिरीक्षणासाठीही हे ठिकाण स्वर्गासारखेच आहे. कारण येथे विविध दुर्मीळ आणि रंगीबेरंगी पक्ष्यांचे वास्तव्य आहे. चिखलदऱ्यात आणि आसपास फिरताना आवर्जून भेट द्यावीत अशी काही खास ठिकाणे येथे आहेत. भीमकुंड, हरिकेन पॉइंट आणि कॉफीचे मळे ही ती ठिकाणे आहेत. याशिवाय मोजरी पॉइंट, शक्कर तलाव, सेमादोह तलाव आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प ही ठिकाणेसुद्धा आवर्जून भेट द्यावीत अशी आहेत.
चिखलदऱ्याचे हवामान वर्षभर आल्हाददायक असते; पण ऑक्टोबर ते जून हा काळ प्रवासासाठी सर्वोत्तम मानला जातो. चिखलदरा नागपूर, अमरावती आणि अकोला यांसारख्या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे. तुम्ही इतिहासप्रेमी असाल, निसर्गाच्या कुशीत रमणारे असाल किंवा फक्त शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर चिखलदरा तुमच्या प्रत्येक इच्छेला न्याय देणारे ठिकाण आहे. इथे घालवलेला प्रत्येक क्षण लक्षात राहील असा, नवी ऊर्जा देणारा ठरेल.
(संदर्भ - maharashtratourism.gov.in)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment