प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वत्वाची ओळख जागवणारा लेख...
स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताकदिन म्हटले, की त्या दिवसापुरता का होईना, आपल्या देशभक्तीला पूर येतो. सगळीकडे देशभक्तीची गाणी अगदी मोठ्या आवाजात ऐकू येतात. असेच एक गाणे म्हणजे 'ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा... तुझे है पुकारा... ' गाणे नकळत आपल्या मनात उतरत जाते. 'स्वदेस है तेरा...' भारत माझा देश आहे... शाळेत रोज म्हणायचो ती प्रतिज्ञा आठवली... 'माझा देश... माझी मातृभूमी... ' ही भावनाच रोमांचकारी आहे. ' गाण्यातल्या एकेका शब्दाबरोबर भारत डोळ्यासमोर आला. सोन्याचा धूर निघणारा... अनेक परकीयांची आक्रमणे झेललेला... स्वातंत्र्यासाठी झगडणारा.
७८ वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळाले... ७६ वर्षांपूर्वी प्रजासत्ताक देश म्हणून ओळखसुद्धा मिळाली. काळ बदलला तसे देशात अनेक बदल झाले. आता आपला देश कात टाकतोय, बदलतोय. एके काळी गरिबांचा देश म्हणून हिणवला जाणारा हा देश जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे. अनेक प्रगत देश भारताकडे भविष्य म्हणून पाहात आहेत. भारतीय बुद्धिमत्ता सगळ्या जगभर वाखाणली जाते. मग तो अमेरिका असो वा रशिया, इंग्लंड असो वा जपान.... सर्वच देश भारताला एका आदरभावाने वागवतात. प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून काळाची पावलं भारताने ओळखली आहेत.
अहो, काय नाही आहे आपल्याकडे? तरुण मनुष्यबळ आहे, कुशाग्र बुद्धिमत्ता आहे, तंत्रज्ञान आहे. एक प्रगत राष्ट्र बनण्यासाठी जे जे लागते, ते सगळे आहे. भारत बदलतो आहे... भारत बदलेल.. पण तुम्ही... बदलताय ना?
तुम्ही म्हणाल, 'कुठे बदलतोय? भ्रष्टाचार तसाच आहे. स्त्रियांवर अत्याचार तर अजिबात कमी नाही. स्त्रीभ्रूण हत्या चालूच आहेत, गरिबी, बेकारी तर कुठे कमी होताना दिसत नाही. अपराध म्हणायचे तर दहापैकी पाच-सहा बातम्या खून, मारामारी अशाच असतात. राजकारणाविषयी तर न बोललेलेच बरे. बघा, यात काय आशावादी आहे?'
पण मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ओळीनुसार
पेला अर्धा सरला आहे असं म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं, की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा... सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत... तुम्हीच ठरवा...
'माझा देश' म्हणजे हे सगळे आपलेच आहे ना? आई जशी आपल्या अशक्त मुलाला जास्त जपते त्याप्रमाणे आपणसुद्धा आपल्या देशातील दुर्बल घटकांना पुढे नको का न्यायला? हे वर दिलेले 'काटे' तर सलणारच हो, पण सलायचे, की फुलासारखे फुलायचे आपणच ठरवू या ना! आणि हे सगळे कुणासाठी? आपल्या भविष्यासाठी, आपल्या लहानग्यांच्या भल्यासाठीच ना? जेव्हा सामान्य माणूस बदलायचे ठरवतो ना, तेव्हा तो देश नक्कीच उंच भरारी घेतो. इतिहास आपल्याला हेच सांगतो. चला तर मग आपणही बदलू या... ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या तरी सुधारू या... आपल्या घरापासून सुरुवात करू या. कसे? कधी? कोणी? या प्रश्नांची उत्तरे ज्याच्या-त्याच्याजवळ आहेत. कळतेय सगळे; पण आता वळवायचे आहे.
देश माझा आहे म्हणूनच मलासुद्धा बदलायचे आहे...
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment