जैवविविधतेने नटलेले स्थान
आपण या निसर्गाचा किती छोटा भाग आहोत, हे जंगलात गेल्यावर समजते. तेथील विविधता, विविध प्रजातींचे प्राणी-पक्षी पाहिले की हे लक्षात येते. प्रत्येक प्राणी वेगळा, त्याची खाण्याची-राहण्याची पद्धत वेगळी. हे सगळे प्राणी-पक्षी एका अन्नसाखळीने एकमेकांशी जोडले आहेत. ‘जीवो जीवस्य जीवनम’ या उक्तीप्रमाणे निसर्ग अव्याहतपणे पुढे जातो. हे सगळे अनुभवायचे असेल तर अभयारण्य हे उत्तम साधन आहे. असेच एक उत्तम अभयारण्य म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प.
ताडोबा येथील दाट जंगल १९५५मध्ये संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. ते चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे. नागपूरपासून १५४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडोबाच्या जंगलात अगदी मध्यभागी ताडोरा नावाचा तलाव आहे. साग, मोह, नीलगिरी अशी झाडे या सुमारे ११६ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या जंगलाच्या परिसरात आहेत. वाघ, लांडगे, कोल्हे, रानकुत्रे, रान मांजरे, अस्वल, चारसिंगा, रान डुक्कर, चिंकारा, चितळ, सांबर हे प्राणी आणि अनेक सरपटणारे प्राणीही या जंगलात आढळतात. येथे सुमारे २५० प्रकारचे पक्षीही आढळतात. येथील मगरपालन केंद्र हे आशिया खंडातील उल्लेखनीय केंद्र आहे. सुंदर झोपडीतील वन्यप्राणिसंग्रहालय, तेथील प्राण्यांचे सांगाडे, पक्षांची घरटी हेसुद्धा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान व जोडूनच असलेले अंधारी वन्यजीव अभयारण्य या दोन्ही प्रकल्पांना एकत्रितपणे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प असे म्हटले जाते. स्थानिक आदिवासी देव तारू किंवा तारोबा यावरून ताडोबा हे नाव रूढ झाले. जंगलातून अंधारी नदी वाहते त्यावरून अभयारण्यास नाव देण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानाला ‘विदर्भाचे रत्न’ असे म्हटले जाते. जंगलामध्ये सफारीसाठी उत्तम सोय आहे. त्यामुळे वाघांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहता येते.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment