अमृत संस्थेच्या पुढाकाराला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद
पेठवडगाव हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या लगत असलेले कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव गणपतीच्या एका मोठ्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. ती मूर्ती आपल्याला हायवेवरून थोडे आत पेठवडगावच्या दिशेने आले असता दिसते. हे गाव खूप प्रगत व्हायला पाहिजे होते. कारण येथील नगर परिषद स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे; पण अनेक सोयी-सुविधांपासून हे गाव अजूनही वंचित असल्याचे गावकऱ्यांकडून माहिती घेताना जाणवते. खूप काही सुविधा करण्यासारख्या आहेत; पण त्या अजून झालेल्या दिसत नाहीत. बऱ्याच सुविधांचा व रस्त्यांचा, तसेच स्वच्छतेचा अभाव जाणवला.
अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेची माहिती देण्यासाठी आम्ही पेठवडगावला गेलो, तेव्हा तेथील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला. त्या वेळी या अनुषंगाने आणखी काही करता येऊ शकते का, याबाबत विचार केला. अमृत परिवाराचे आमचे मार्गदर्शक, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून गावागावांमध्ये पर्यटनाचा विचार व्हावा असा विचार दिला आहे. हा विचार डोक्यात ठेवून माहिती देत देत या गावाबाहेर येताना एक तलाव दृष्टीस पडला. तलावाच्या जवळ गेल्यावर तेथील परिसराची पाहणी करताना असे लक्षात आले, की इथे पूर्वी मुलांसाठी खेळण्याचा परिसर, वॉकिंग ट्रॅक होता; पण सध्या या तलावाच्या सभोवती तारेचे कंपाउंड घालून हा तलाव सर्वसामान्यांसाठी खुला नसल्याचे दिसून आले. वावर नसल्यामुळे येथील दुरवस्था जाणवली. या परिसराचा आनंद येथील लोकांना घेता येत नाही.
या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास करून पर्यटनस्थळ तयार होऊ शकते. मॉर्निंग वॉक ट्रॅक व ऑक्सिजन पार्क उभारू शकतो. त्याचबरोबर बागबगीचा, वृक्षारोपण करून निसर्गरम्य परिसराला एक वेगळे स्वरूप देता येऊ शकते. तलावामध्ये बोटिंगची व्यवस्था केल्यास पर्यटनातून आर्थिक आवक होऊ शकते. त्याचा उपयोग येथील परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्यासाठी होऊ शकतो. तलावाचा परिसर खूप मोठा आहे. त्यामुळे पर्यटनाचा विचार करून कार्यवाही केल्यास खूप मोठे पर्यटनस्थळ या ठिकाणी होऊ शकते. या ठिकाणी राहणाऱ्या ब्राह्मण समाजातील काही प्रमुख व्यक्तींना याबद्दलची माहिती दिल्यानंतर त्यांच्याही मनामध्ये या बाबतीत सकारात्मकता दिसून आली.
'त्या पद्धतीने विचार करून ब्राह्मण समाजाची एक बैठक घेऊन लवकरच यासंबंधीचा एक प्रस्ताव तयार करून नगर परिषदेला देऊन त्यांच्याकडून मान्यता घेऊ. तसेच, अमृत संस्थेच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करून व समाजातील काही दानशूर व्यक्तींकडून मदत घेऊन या ठिकाणी एक चांगले पर्यटनस्थळ विकसित करू शकतो,' असा विश्वास सर्वांकडून व्यक्त करण्यात आला.
त्यानुसार, लवकरच अमृत संस्थेच्या माध्यमातून सर्व स्तरांतील व्यक्ती, दानशूर व्यक्ती आणि जनसामान्यांना सोबत घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे नियोजन केले जाणार आहे. लवकरच पेठवडगाववासीयांना, तसेच आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक चांगले पर्यटनस्थळ उपलब्ध करून देण्याचा विचार यामागे असून, याबाबत गावकऱ्यांची भूमिका सकारात्मक आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment