नेत्रदान- तुमच्या डोळ्यांनी बघेल कोणी हे सुंदर जग!!

नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती करण्यात येते. तुमच्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते. आज जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करणारा हा लेख—

नेत्रदान- तुमच्या डोळ्यांनी बघेल कोणी हे सुंदर जग!! मुख्य फोटो
मुख्य फोटो

आज जागतिक दृष्टीदान दिन आहे. डोळा हा मानवी शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही. परंतु, आपल्यापैकी काही दुर्दैवी लोकांना हे सौंदर्य पाहता येत नाही. त्यांच्या अंधपणामुळे त्यांना कितीतरी गोष्टींचा आनंद घेता येत नाही. आपल्या संस्कृतीत तर दानाचे पुण्य अनन्यसाधारण आहे. त्यात हे नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर करावे लागते, म्हणजे आपल्या मृत्यूनंतरही आपण कोणाला तरी दान करू शकतो, हे खरंच किती सुखकारक आहे ना!

या नेत्रदानाविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत, ते दूर करून नेत्रदानाचे प्रमाण वाढवणे, हाच या दिवशी आपण संकल्प करूया. नेत्रदानाविषयीची काही तथ्ये जाणून घेऊया—
वयाचे १ वर्ष पूर्ण केलेली कोणताही व्यक्ती नेत्रदान करू शकते...
भारतात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार, नेत्रदान हे मरणोत्तर करण्याचा नियम असला तरी, वयाचे एक वर्ष पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. हे नेत्रदान मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह किंवा चष्मा वापरत असलेली व्यक्तीही करू शकते. आपल्या मृत्यूपत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाईकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या मृतदेहाची जबाबदारी ही त्या व्यक्तीच्या वारसदाराची असते. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी दिली नाही तर नेत्रदान होऊ शकत नाही. तसे मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केले जाऊ शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहरलेले हे नयनरम्य जग बघता येऊ शकते.
नेत्रदानाविषयी ही तथ्ये देण्याचे कारण म्हणजे भारतात याविषयी प्रचंड अनास्था आहे. संपूर्ण जगात ४५ दशलक्ष अंध लोक आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच १५ दशलक्ष अंध लोक भारतात आहेत. भारतासह जगभरातील असंख्य देशांमध्ये गरिबीमुळे, पुरेसा पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते अशी नोंद आहे. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर ऑपरेशन करून नवीन दृष्टीपटल बसवून त्यांची दृष्टी परत दिली जाऊ शकते.
मृत्यूनंतर ६ ते ८ तासांच्या आत नेत्रदान करणे गरजेचे—
नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ ते ८ तासांच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तीला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा (दृष्टीपटल) वापर करायचा आहे, त्याला २४ तासांच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपण करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरीरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्यातील फक्त कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.
तुम्हीही करू शकता नेत्रदान—
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्यूनंतर काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत झालेल्या व्यक्तीचे डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येतात. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे जग प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानाची माहिती, प्रक्रिया आणि नोंदणी करू शकता.
कसे होते नेत्रदान—
या सर्व प्रक्रियेत नेत्रपेढीची भूमिका महत्त्वाची असते. नेत्रदात्याचे मरणोत्तर नेत्र संकलन करणे हे या पेढीचे प्रमुख कार्य आहे. नेत्रदात्याची एचआयव्ही व हिपेटायटिससाठी मरणोत्तर रक्ततपासणी करण्यात येते. सूक्ष्म यंत्रांच्या माध्यमातून या बुबुळांची तपासणी करून त्यांची प्रत्यारोपणासंदर्भात योग्यता तपासण्यात येते. नेत्रदानाबाबत कॉल आल्यानंतर संबंधित रक्तपेढीच्या डॉक्टरांची टीम त्वरित त्या ठिकाणी पोहोचते आणि अगदी काळजीपूर्वक व जलदतेने काम पूर्ण करते, यामुळे अंत्यविधीला कोणत्याही प्रकारचा विलंब होत नाही.
१० जून हा जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो, कारण त्या दिनाचे औचित्य साधून दृष्टिदानाचे स्मरण राहील. त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी आताच नेत्रपेढीत जाऊन विहित नमुन्याचा फॉर्म भरून दिला, की मरणोत्तर नेत्रदानाचे कार्य सत्कारणी लागेल. दृष्टी नसेल तर जीवन अंधकारमय बनते. दृष्टीहीनतेमुळे आज कोट्यवधी लोक हे सुंदर जग बघू शकत नाहीत. या अंधांचे जीवन सुखकर बनण्यासाठी नेत्रदानाची चळवळ देशात उभी राहिली पाहिजे. त्यासाठी सातत्याने जनजागृती करणे गरजेचे आहे. आता परिस्थितीत बदल होत आहे. नेत्रदानाचा संकल्प अनेकजण करत आहेत. मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ हळूहळू वाढते आहे. मात्र त्याचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. आपल्या डोळ्यांनी जर कोणी हे सुंदर जग पाहू शकले, तर त्याचा आनंद नक्कीच अवर्णनीय आहे, हो ना!

-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-06-2026 News publication date | Time: 12:08 PM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-06-2026 News publication date | Time: 12:08 PM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement