रायगडावर साकारला स्वराज्याचा भव्य सोहळा- शिवराज्याभिषेक दिन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन

रायगडावर साकारला स्वराज्याचा भव्य सोहळा- शिवराज्याभिषेक दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची घटना मानली जाते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी म्हणजेच ६ जून १६७४ रोजी त्यांचा विधीवत राज्याभिषेक झाला. त्या दिवशी त्यांनी स्वराज्याची एक सार्वभौम राज्य म्हणून घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्यांनी राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. या अनुपम सोहळ्यात महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराज यांचाही अभिषेक करण्यात आला.
याप्रसंगी भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे महाराजांना जाणे शक्य नव्हते. म्हणून ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेला अर्पण केली. २१ मे ला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधींत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन, तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली गेली. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींची तुला झाली.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधी सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणतीही परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथांतून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सरदार, राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज गढून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंचे आशीर्वाद घेतले.

६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. सोन्याने मढवलेल्या मंचावर महाराज बसले. शेजारी सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बाल संभाजीराजे मागे बसले होते. अष्टप्रधान मंडळातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्यांनी जलकुंभांनी छत्रपती शिवाजीमहाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चार केले जात होते आणि वाद्ये वाजविली जात होती. सुवासिनींनी आरती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुकुट घातला. आपल्या ढाल, तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या ग्रंथात आलेले वर्णन असे होते की- ३२ मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेने महाराजांना आशीर्वाद दिला. सोन्या-चांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेला. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती' असा उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना याप्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. समारंभ संपल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वर मंदिराकडे गेले. हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनतेने दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
शिवराज्याभिषेकाचे हे वर्णन आपण वाचले. आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी असा सोहळा का केला असेल? त्यावेळी स्वराज्याची अवस्था हालाखीची होती, असे असताना महाराजांनी इतका भव्य सोहळा करण्यामागचे कारण काय असेल? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला देशोदेशीचे राजे, इंग्रज अधिकारी, मुघलांचे अधिकारी आले होते. या सर्वांच्या उपस्थितीत महाराजांनी या सोहळ्यातून स्पष्ट संदेश दिला की, आता हे राज्य सार्वभौम आहे. ही मराठेशाही आता स्वबळावर आपले राज्य टिकवू शकते, ते वाढवू शकते. या सोहळ्यातून या सर्व आमंत्रितांना मराठ्यांची ताकद, एकजूट आणि स्वराज्य टिकविण्यासाठी त्यांच्यापाशी असणारे सामर्थ्य दिसले. मराठी जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्यही या सोहळ्यातून साध्य झाले. आता आपण पोरके नाही, आपले रक्षण करणारा, आपला पोशिंदा राजा आता आहे, हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. आता जे काही करायचे ते स्वराज्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी, हे त्यांच्या मनात ठसले. हा त्यांचा आत्मविश्वास, स्वाभिमान हेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित होते. आता ही जनता पराभूत मानसिकतेने न जगता अभिमानाने आणि स्वराज्य प्रेमाच्या भावनेतून राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने कार्यरत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा या सोहळ्यामागचा हेतू होता. महाराजांच्या या दूरदृष्टीने स्वराज्याची पायाभरणी झाली.
संदर्भ- विकीपिडीया

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-06-2026 News publication date | Time: 12:34 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-06-2026 News publication date | Time: 12:34 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement