मराठी भावसंगीताचा राजा- गजाननराव वाटवे

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांची आज जयंती; त्यानिमित्त त्यांच्या संगीतमय प्रवासाचा हा अल्पपरिचय.

मराठी भावसंगीताचा राजा- गजाननराव वाटवे मुख्य फोटो
मुख्य फोटो

गजाननराव वाटवे यांना मराठी भावसंगीताचा राजा म्हणून ओळखले जाते. त्यांच्या गाण्यांनी ग्रामोफोनच्या युगात घराघरांत स्थान मिळवले. पुण्यात १९६० च्या दशकात ग्रामोफोन आल्यावर वाटव्यांची रेकॉर्ड घ्यावीच, असा जणू पायंडाच पडला होता. त्यांच्या आवाजातील "गर्जा जयजयकार," "आपण पुन्हा गडे," "हवेलीस," यांसारखी गीते आजही रसिकप्रिय आहेत.
गजानन जीवन वाटवे यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी बेळगाव येथे झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. बेळगावमध्येच त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील भिक्षुकी करत होते; आपल्या मुलाने तेच करावे असे त्यांना वाटत होते, परंतु गजानन वाटवे यांना ते मान्य नव्हते, म्हणून त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी आपले घर सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यातील गोपाळ गायन समाज येथे चार वर्षे अतिशय बिकट परिस्थितीत ते संगीत शिकले. गजानन वाटवे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी काव्यगायनाला सुरुवात केली; त्यांचा पहिला कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात झाला.
त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली, त्यात त्यांचे 'वारा फोफावला' हे गाणे त्यावेळी खूपच गाजले. त्यामुळे ते तरुण वर्गात विशेष प्रसिद्ध झाले. मराठी सुगम संगीताला त्यांनी खूप लोकप्रिय केले. त्यांचा आवाज लोकांना इतका आवडत असे की त्यांच्या कार्यक्रमाला खूप गर्दी जमत असे. त्यांनी उत्तमोत्तम कविता निवडून त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांची गाणी लोक सहजपणे गुणगुणत असत. गजानन वाटवे 'राधे तुझा सैल आंबाडा' हे गाणे अशा पद्धतीने म्हणत की रसिक त्या कवितेच्या शब्दात, गाण्यात आणि त्यांच्या आवाजात रंगून जात. गजाननराव वाटवे यांच्या कार्यक्रमाला लोक अक्षरशः मिळेल ती जागा पटकावत, अनेकजण पुढील जागा बसायला मिळावी म्हणून खूप आधीपासून येत असत. कार्यक्रमात गजानन वाटवे एकटेच गात, त्यांच्या साथीला फक्त तबला आणि व्हायोलिन असे आणि ते स्वतः हार्मोनियम गाणे म्हणताना वाजवत. गाणे म्हणताना ते चालीमध्ये विविधता आणत असत जेणेकरून गाणे उत्तम होईल. कवितेतील अर्थ भावपूर्णरीत्या श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची हातोटी त्यांच्या गाण्यात होती. काव्याची उत्तम निवड, उत्तम चाल आणि स्पष्ट शब्दोच्चार, कवितेला पूर्ण न्याय देणारी चाल ही त्यांच्या गाण्यांची वैशिष्ट्ये होती.
अनेक नामवंत कवींच्या कविता घेऊन त्या कविता त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांची ‘रानात सांग कानांत’, ‘आपुले नाते मी भल्या पहाटे येते’, ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’, ‘यमुना काठी ताजमहाल’, ‘आभाळीचा चांद माझा’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘ती पहा बापूजींची प्राणज्योती’, ‘मी निरंजनातील वात’, ‘गाऊ त्यांना आरती’, ‘तू असतीस तर झाले असते उन्हाचे गोड चांदणे’, ‘मोहुनीया तुजसंगे नयन खेळले जुगार’... अशी त्यांची असंख्य गाणी त्यावेळी रसिकांना तोंडपाठ होती.
गजानन वाटवे यांना सन १९९३ चा दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला, तर महाराष्ट्र सरकारने देखील त्यांना सन १९९४ सालचा लता मंगेशकर पुरस्कार दिला. विजय फाऊंडेशनतर्फे त्यांना सन २००१ मध्ये युगनिर्माता पुरस्कार मिळाला, तर गदिमा प्रतिष्ठानने वर्ष २००५ मध्ये त्यांचा सन्मान केला. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 'गगनी उगवला सायंतारा' हे त्यांचे आत्मचरित्र सन १९७१ साली प्रकाशित झाले आणि ते वर्ष २००७ मध्ये पुनःप्रकाशित केले गेले.
गजानन वाटवे यांचे २ एप्रिल २००९ मध्ये वृद्धापकाळाने निधन झाले.
-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 08-06-2026 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 16 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 08-06-2026 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 16 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement