अन्न हे पूर्णब्रम्ह!!

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त अन्न सुरक्षा आणि सकस अन्न यांविषयी माहिती सांगणारा हा लेख-

अन्न हे पूर्णब्रम्ह!! मुख्य फोटो
मुख्य फोटो

आपल्या भारतीय संस्कृतीत अन्न हे ‘पूर्णब्रह्म’ मानले जाते. आपल्या शरीराचे भरणपोषण आणि चालन याच अन्नामुळे होते. प्रत्येक सजीवाची ती महत्त्वाची गरज आहे. आपण जसजसे प्रगत होत गेलो, तसतसे अन्नावर विविध संस्कार करून ते खाल्ले जाऊ लागले. म्हणजे इतर सजीवांसारखे कच्चे अन्न न खाता ते भाजून, वाफवून, तळून, शिजवून अशा विविध प्रकारे ग्रहण करू लागलो. आपल्या पारंपारिक अन्नपदार्थांमध्ये कोणता पदार्थ कशाप्रकारे खाल्ला की तो शरीराला जास्तीत जास्त पोषण देऊ शकतो, हे सांगितलेले आहे. म्हणजे त्या पदार्थातील पोषक द्रव्ये टिकवून ठेवून त्याची चवही वाढेल अशा पद्धतीने त्यात मसाले व इतर जिन्नस घातले जाऊ लागले.
अन्नाविषयी इतके तपशीलात लिहिण्याचे कारण म्हणजे ७ जून हा 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' आहे. त्यानिमित्त शुद्ध आणि सात्विक अन्नाचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. मानवाने प्रगती केली आणि घरगुती अन्नाची जागा हॉटेलमधील चमचमीत खाण्याने घेतली. नोकरी, व्यवसाय यांमुळे घरी जेवण्यापेक्षा पार्सल मागवून जेवणे जास्त सोयीचे वाटू लागले. आपल्या घरात आपण भाज्या, फळे यांची योग्य ती स्वच्छता करतो. आपल्या संस्कृतीत तर अन्नाइतकेच स्वयंपाकघरातील स्वच्छतेला सुद्धा महत्त्व दिलेले आहे. असे असतानाही बाहेरचे खाणे जास्त आवडीने खाल्ले जात आहे. हे सगळे होत असताना, हे असे चमचमीत, आयते आणि झटपट अन्न किती सुरक्षित आहे? या अन्नातून किती प्रमाणात आपल्या शरीरात विषारी पदार्थ जात आहेत? जिभेची चव जपताना आपण आपल्याच पोटावर आणि एकंदर शरीरावर अन्याय तर करत नाही ना? या सगळ्या विषारी अन्नामुळे आणि ते ज्या डब्यातून येते त्यामुळे आपण आपल्या आरोग्याला किती प्रमाणात आणि कसा धोका निर्माण करत आहोत? या सगळ्याचा साधक-बाधक विचार होणे आणि त्यावर कृती करणे आत्यंतिक गरजेचे आहे.
यासाठीच जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. दूषित अन्नामुळे होणाऱ्या आजारांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित, पोषक अन्नाचे महत्त्व पटवून देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. असुरक्षित किंवा दूषित अन्नाचे सेवन केल्यामुळे जगभरात लाखो लोक आजारी पडतात आणि अनेकांचा मृत्यू होतो. या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुढाकार घेतला. अधिकृतपणे पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिन ७ जून २०१९ रोजी साजरा करण्यात आला. दूषित अन्न खाल्ल्याने जुलाब, उलट्या, कर्करोग यांसारखे २०० हून अधिक आजार होऊ शकतात. आपण जे प्रक्रिया केलेले अन्न खातो, ते ज्या प्लास्टिक डब्यांमधून पार्सल केले जाते, त्यामुळे आपल्या रक्तात, इतकेच काय, आईच्या पोटात असणाऱ्या अर्भकाच्या रक्तात सुद्धा मायक्रोप्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळू लागले आहेत. हे फार भयंकर आहे. एकतर आजकाल जास्त उत्पन्न घेता यावे म्हणून पिकांवर प्रचंड प्रमाणात रासायनिक जंतुनाशकांची फवारणी केली जात आहे. त्यात हे अन्न न धुता, ते खाण्यास योग्य आहे की खराब झाले आहे, याची तपासणी न करता आणि ते जास्त काळ टिकून राहावे व आकर्षक दिसावे म्हणून त्यात अनेक प्रकारची रासायनिक परिरक्षके (प्रिझर्व्हेटिव्हज) घातल्याने ते अन्न म्हणजे एकप्रकारचे विषच झाले आहे!
अन्नाची गुणवत्ता जपण्यासोबतच त्याची नासाडी टाळण्याचा संदेश या दिवशी दिला जातो. सर्वांसाठी सुरक्षित अन्न: शेतापासून ते आपल्या ताटापर्यंत येणारे अन्न सुरक्षित, स्वच्छ आणि कीटकनाशक मुक्त असावे, याची खात्री करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. याचा अर्थ असुरक्षित अन्नामुळे होणाऱ्या आजारांचा जागतिक भार समजून घेणे आणि त्यावर विज्ञान-आधारित उपाययोजना लागू करण्यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे. अन्न सुरक्षा ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे: अन्न शिजवताना आणि खाण्यापूर्वी हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवावेत. अन्नपदार्थ झाकून ठेवावेत आणि कच्चे अन्न (उदा. फळे, भाज्या) स्वच्छ धुऊन खावेत. बाहेरचे उघड्यावरील किंवा शिळे अन्न खाणे टाळावे. अन्न साठवताना योग्य तापमानाचा वापर करावा. याशिवाय बाहेरचे अन्न खाताना ते पदार्थ ज्या तेलात तळले आहेत, ज्या प्रकारे त्यातील जिन्नसांचा साठा केला आहे, ते देताना किंवा बनवताना स्वच्छतेबाबत काय खबरदारी घेतली आहे, हे सगळे नीट तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण एरवी आपण कसे दिसतोय? याकडे बारीक लक्ष असणारे आपण, आपल्या आरोग्याच्या बाबतीत इतके बेफिकीर कसे आहोत? याचेच विशेष वाटते. आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे, तेव्हा या दिनानिमित्त आपण आरोग्याविषयी आणि विशेषतः आपल्या अन्नाविषयी जबाबदारीने वागूया, हीच अपेक्षा!
-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-06-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-06-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Sharad Godbole
07-06-2026 09:48 PM

जागतिक अन्न सुरक्षा दिना निमित्त चांगले अन्न कसे असावे ह्या बद्दलचा सुरेख लेख.अमृत महाराष्ट्र शुभेच्छा

Write a Comment
0 / 50 words
Advertisement