अकोला जिल्ह्यातील पुरातन धार्मिक पर्यटनस्थळ
श्री बालादेवी म्हणजे बालापरमेश्वरी हे पुरातन देवस्थान आहे. शास्त्रामध्ये श्री दशमहाविद्यांची उपासना सांगितली आहे. काली, तारा, षोडशी, धूमावती, छिन्नमस्ता वगैरे या सर्व महाशक्ती आहेत. या दहा महाशक्तींपैकी जी श्री विद्या आहे, ती प्रत्यक्षात श्री बालापरमेश्वरी आहे. म्हणजे हे श्री विद्यामंदिर आहे. बालापूर हे प्राचीन नगर आहे. या नगराचे नावसुद्धा श्री बालादेवी मातेच्या नावावरून पडले आहे. जुन्या काळी हे नगर परगणा म्हणजे प्रांत होते. त्या काळात येथील लोकसंख्या एक लक्ष होती. पूर्वी अकोले प्रगणा बालापूर असे लिहावे लागत असे. आता अकोला मोठे झाले. येथे असलेले हे मंदिर सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी येथे (टेकडीवर) तीन दिवस निवास केला होता.
श्री बालादेवी मंदिर असलेल्या टेकडीच्या पूर्वेला म्हणजे मंदिरासमोर मनकर्णिका (मन) नदी उत्तरवाहिनी आहे आणि टेकडीच्या पश्चिमेला म्हणजेच मंदिराच्या मागे महेशा (मस) नदी उत्तरवाहिनी आहे. त्या दोन नद्यांच्या संगमावर टेकडीवर श्री बालापरमेश्वरी पूर्वाभिमुख विराजमान आहे. या दोन्ही नद्या पुन्हा रुंद होऊन वाहतात आणि खाली पाऊण किलोमीटर अंतरावर त्यांचा संगम झाला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम
या मंदिराचे बांधकामसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. २१ मार्च आणि २१ सप्टेंबर हे दोन दिवस उत्तरायण व दक्षिणायन यांचे अयनमध्य दिन आहेत. म्हणजे या दिवशी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. दिवस-रात्र समान असतात. या दोन्ही दिवशी सूर्योदयाची किरणे श्री बाला मातेश्वरीच्या श्री विग्रहावर पडतात.
श्री बालादेवी मातेचा नाममंत्र श्री बालात्रिपुरसुंदर्य नमः असा आहे. श्री यंत्राची (श्री चक्र) मुख्य देवता श्री त्रिपुरसुंदरी आहे. हे शक्तिपीठ नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. टेकडीवर वटवृक्ष, अश्वत्थ वृक्ष, औदुंबरवृक्ष, बिल्ववृक्ष, आवळा वृक्ष, अशोक वृक्ष, पारिजात, करवीर, तगर, मोगरा, गुलाब, नंद, तुळस अशी वृक्षवल्ली आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment