कोकणातील पहिल्याच उपक्रमाचा पर्यटकांनी लुटला आनंद
निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणभूमीतील पर्यटन म्हणजे एक वेगळीच अनुभूती देणारा अनुभव असतो. सुंदर किनाऱ्यांपासून बेलाग किल्ल्यांपर्यंत आणि मनःशांती देणाऱ्या देवस्थानांपासून देवरायांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन रत्नागिरी जिल्ह्यात करता येते. दापोली तालुक्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळे असल्याने पर्यटनाच्या प्रमुख हंगामांमध्ये दापोलीला पर्यटकांची मोठी गर्दी असते. आता हॉट एअर बलूनमुळे दापोलीच्या पर्यटनाला नवी ओळख मिळाली आहे. कोकणात यंदा पहिल्यांदाच हॉट एअर बलूनमधून निसर्गदर्शनाचा रोमांचक आणि अविस्मरणीय अनुभव दापोलीत पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला
या हॉट एअर बलून सफरीतून पर्यटकांना शेकडो फूट उंचीवरून कोकणातील हिरवीगार शेते, डोंगररांगा, विस्तीर्ण पठारे, धुक्याची दुलई आणि निसर्गाचा विहंगम नजारा अनुभवता येतो. सूर्योदयावेळी कोवळ्या उन्हात आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या साक्षीने होणाऱ्या या सफरी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. आकाशातून कोकणाचा निसर्ग पाहण्याचा अनुभव यापूर्वी कधीही न मिळाल्याने पर्यटकांमध्ये या उपक्रमाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
हॉट एअर बलून हा साहसी पर्यटनाचा प्रकार आहे. या उपक्रमात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. प्रशिक्षित तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपकरणांच्या साह्याने या सफरी घेतल्या जात असून, त्यामुळे सहकुटुंब, तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही निर्धास्तपणे या अनुभवाचा आनंद घेता येत आहे. छायाचित्रणप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि पर्यटनप्रेमींसाठी हा अनुभव पर्वणी ठरत आहे.
या अभिनव उपक्रमामुळे दापोली हे केवळ समुद्रकिनारे किंवा शैक्षणिक केंद्र म्हणूनच नव्हे, तर साहसी पर्यटनाचे नवे केंद्र म्हणूनही पुढे येत आहे. कोकणातील पर्यटनाच्या नकाशावर दापोली अधिक ठळकपणे स्थान मिळवत असून, स्थानिक पर्यटन व्यवसाय, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळत असल्याचे चित्र आहे.
हा हॉट एअर बलून पर्यटन उपक्रम दापोली तालुक्यातील वाकवलीजवळील पितांबरी अॅग्रो टुरिझम सेंटर येथे पितांबरी उद्योगसमूहाचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. सध्याच्या हंगामातील हा हॉट एअर बलून उपक्रम तीन जानेवारी २०२६ रोजी समाप्त झाला. त्यामुळे अनेक पर्यटकांनी हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोकणात पहिल्यांदाच सुरू झालेल्या या आकाश पर्यटनामुळे दापोलीची पर्यटननगरी ही ओळख अधिक बळकट होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment