शिरपूर तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांचा ‘अमृत संवाद सेतू’; प्रशासनाची कार्यपद्धती जाणून घेतली
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमांतर्गत शिरपूर तहसील कार्यालयास विद्यार्थ्यांनी भेट देत विविध शासकीय योजना, प्रशासकीय कामकाज आणि उपलब्ध संधींबाबत माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये शासकीय यंत्रणेची कार्यपद्धती, विविध विभागांचे कामकाज तसेच शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचावी, या उद्देशाने ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शासकीय कार्यालयास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची संधी मिळत आहे.
शिरपूर तहसील कार्यालयातील भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाच्या विविध विभागांची माहिती घेतली. महसूल विभागाचे कामकाज, नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा, प्रमाणपत्रे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, तसेच प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या सुविधांविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारत अधिकाऱ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेचे समाधान करताना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, योग्य माहितीचे महत्त्व तसेच युवकांनी शिक्षणासोबतच शासनाच्या विविध कौशल्यविकास व रोजगाराभिमुख योजनांचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणारा नसून विद्यार्थी, प्रशासन आणि समाज यांच्यातील संवादाचा दुवा मजबूत करणारा उपक्रम ठरत आहे. शासकीय कार्यालयांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेली उत्सुकता दूर करून प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून देणे, त्यांना उपलब्ध संधींची माहिती देणे आणि भविष्यातील करिअरविषयी जागरूक करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणेचे प्रत्यक्ष कामकाज समजून घेण्यासोबतच ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात अशा प्रकारच्या उपक्रमांमधून अधिकाधिक माहिती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अमृतच्या माध्यमातून युवक व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, कौशल्यविकास, उद्योजकता आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबविले जात असून, ‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनव्यवस्था आणि उपलब्ध संधींशी जोडण्याचे प्रभावी काम सुरू आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment