अकोल्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या मोफत उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण बॅचचा यशस्वी समारोप झाला.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण (Entrepreneurship Development Program - EDP) बॅचचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दहा दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये उद्योग उभारणीची संकल्पना, व्यवसायाची निवड, व्यवसाय आराखडा तयार करणे, शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, बँक कर्ज प्रस्ताव तयार करणे, आर्थिक व्यवस्थापन, लेखांकनाची मूलभूत माहिती, विपणन कौशल्ये, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, ब्रँडिंग, ऑनलाईन व्यवसायाच्या संधी तसेच उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व गुणांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
समारोप कार्यक्रमात प्रशिक्षकांनी संपूर्ण प्रशिक्षणाचा आढावा घेत लाभार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवसायात उपयोग करून स्वयंरोजगाराच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असा संदेश देण्यात आला. तसेच उद्योग उभारणीसाठी सातत्य, योग्य नियोजन आणि कौशल्य विकास ही यशस्वी उद्योजकतेची महत्त्वाची सूत्रे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील युवक-युवतींना कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता, संशोधन आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम सातत्याने राबवत आहे. अशा उपक्रमांमुळे राज्यातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत असून स्वावलंबी महाराष्ट्र घडविण्यास हातभार लागत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment