छत्रपती संभाजीनगर येथील N-1 काळा गणपती मंदिर, सिडको येथे अमृतच्या वतीने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठे’च्या चौथ्या पर्वाला आज उत्साहात सुरुवात झाली.
छत्रपती संभाजीनगर : घरातून छोटा व्यवसाय करणाऱ्या, स्वतःच्या हाताने विविध वस्तू तयार करणाऱ्या आणि आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ हा चांगला प्लॅटफॉर्म ठरत आहे. अमृतच्या वतीने आयोजित अमृतपेठ थेट बाजारपेठेचे चौथे पर्व आज छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात सुरू झाले.
गौरी-गणपती महोत्सवानिमित्त N-1 काळा गणपती मंदिर, सिडको येथे या बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले आहे. बाजारपेठेचे उद्घाटन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, उपव्यवस्थापक योगेश रोडे आणि यशस्विनी उद्योजिका समूहाच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
महिलांनी घरबसल्या तयार केलेल्या खाद्यपदार्थांपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, हस्तकला आणि इतर उत्पादनांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे. विशेष म्हणजे, आपला व्यवसाय छोटा असला तरी तो ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी स्टॉल लावता येतो, हा विश्वास या उपक्रमातून महिलांमध्ये निर्माण होत आहे.
अनेक महिला घरातूनच आपल्या आवडीचे पदार्थ किंवा वस्तू तयार करतात; मात्र त्या वस्तू विकण्यासाठी योग्य ठिकाण आणि ग्राहक मिळत नाहीत. अशा महिलांसाठी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ एक चांगली संधी घेऊन आली आहे. आपल्या हातच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळताना पाहणे आणि त्यातून व्यवसाय वाढवणे, हा अनुभव महिलांसाठी नक्कीच उत्साह वाढवणारा ठरत आहे.
‘अमृतपेठ’चे हे चौथे पर्व असून मागील उपक्रमांना मिळालेल्या प्रतिसादानंतर यावेळीही महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. भविष्यात आणखी महिलांनी पुढे येऊन आपल्या व्यवसायाचे स्टॉल लावावेत, आपल्या उत्पादनांची ओळख निर्माण करावी आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
ही बाजारपेठ १०, ११ आणि १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार असून, N-1काळा गणपती मंदिर, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे नागरिकांना विविध वस्तूंची खरेदी करता येणार आहे. “घरात तयार होणाऱ्या वस्तूंना घराबाहेरची बाजारपेठ मिळाली, तर छोटा व्यवसायही मोठा होऊ शकतो.” या विचारातून महिलांना व्यवसायाची संधी आणि ग्राहकांशी थेट जोडण्याचा प्रयत्न अमृतच्या माध्यमातून केला जात आहे.
महिलांनी या बाजारपेठेला भेट देऊन सहभागी महिला उद्योजिकांच्या वस्तूंची खरेदी करावी, तसेच “आपणही आपल्या व्यवसायासाठी भविष्यात अमृतपेठेत स्टॉल लावू शकतो”, असा विचार करून पुढे यावे, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment