महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृत (AMRUT) पुणे यांच्या वतीने अमृत मुख्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाला (EDP) आज उत्साहात सुरुवात झाली. नवउद्योजकांना व्यवसायाच्या विविध पैलूंची माहिती मिळावी, त्यांच्यामध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी लाभार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षक तुषार सर आणि योगेश सर यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत व्यवसाय क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि उद्योजक म्हणून आवश्यक असणाऱ्या मानसिकतेविषयी मार्गदर्शन केले.केवळ व्यवसाय सुरू करणे म्हणजे उद्योजक होणे नव्हे, तर बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या दिवसाचा केंद्रबिंदू – ‘Business Mindset’
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसामध्ये ‘Business Mindset’ अर्थात व्यावसायिक मानसिकता कशी विकसित करावी आणि ती योग्य पद्धतीने कशी सेट करावी,यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
उद्योजकतेच्या प्रवासात केवळ भांडवल किंवा व्यवसायाची कल्पना पुरेशी नसते. ‘मी हे करू शकतो’, ‘अडचणींमधून संधी कशी शोधायची’, ‘अपयशातून काय शिकायचे’ आणि ‘ग्राहकांच्या गरजेनुसार व्यवसायात बदल कसा करायचा’, अशा सकारात्मक विचारसरणीचा उद्योजकाच्या यशामध्ये मोठा वाटा असतो, हे प्रशिक्षणातून अधोरेखित करण्यात आले.लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या व्यवसायाच्या कल्पना, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठ समजून घेणे, ग्राहकांची गरज ओळखणे, योग्य नियोजन करणे आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे या बाबींवरही भर देण्यात आला.
उद्योजक घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आजच्या स्पर्धात्मक युगात रोजगाराच्या पारंपरिक संधींबरोबरच स्वतःचा व्यवसाय उभारून इतरांसाठी रोजगारनिर्मिती करण्याची क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन अमृतच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले EDP प्रशिक्षण लाभार्थ्यांसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये पुढील दोन दिवसांत व्यवसायाच्या विविध आवश्यक बाबींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून केवळ व्यवसायाचे ज्ञान न मिळता उद्योजकीय आत्मविश्वास, निर्णयक्षमता, नियोजनशक्ती आणि व्यवसायाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे.
पहिल्याच दिवशी झालेल्या संवादात्मक आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे लाभार्थ्यांमध्ये नव्या कल्पना, आत्मविश्वास आणि व्यवसाय सुरू करण्याची ऊर्जा निर्माण झाली. ‘नोकरी शोधणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा उद्योजक घडवणे’ या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेने अमृतच्या या उपक्रमाची सुरुवात महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.
आगामी दोन दिवसांतही विविध विषयांवरील मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या उद्योजकीय प्रवासाला अधिक सक्षम दिशा मिळणार आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment