तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) यांच्या प्रतिष्ठित वेद पारायण योजनेत वे. मू. प्रथमेश बाळासाहेब निर्मळ यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अमृत (AMRUT) या स्वायत्त संस्थेच्या बीड जिल्हा कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
बीड (प्रतिनिधी) : तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) यांच्या प्रतिष्ठित वेद पारायण योजनेत वे. मू. प्रथमेश बाळासाहेब निर्मळ यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अमृत (AMRUT) या स्वायत्त संस्थेच्या बीड जिल्हा कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या वैदिक परंपरेचा गौरव वाढला असून अमृत परिवाराने अभिमान व्यक्त केला. तिरुमला तिरुपती देवस्थानम् ही देशातील अत्यंत मानाची धार्मिक संस्था असून, वेदसंवर्धनासाठी राबविण्यात येणारी वेद पारायण योजना ही वैदिक क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित योजनांपैकी एक मानली जाते. सुमारे १५ वर्षांनंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम् यांनी वेद पारायण योजनेसाठी देशव्यापी निवड प्रक्रिया राबविली. या विशेष निवड प्रक्रियेत देशभरातून सुमारे ७०० नवीन वेदपंडितांची निवड करण्यात आली. त्यामध्ये शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व शाखेतून महाराष्ट्रातील एकमेव वेदपाठी म्हणून वे. मू. प्रथमेश निर्मळ यांची निवड झाली आहे. त्यामुळे ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून महाराष्ट्राच्या वैदिक परंपरेसाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. वे. मू. प्रथमेश निर्मळ यांनी तमिळनाडू राज्यातील श्री चतुर्वेद विद्या गणपती वेदशास्त्र वेदपाठशाळा, चेंगलपट्टू, कांचीपुरम् येथे शुक्ल यजुर्वेद काण्व शाखेचे अध्ययन घनांतपर्यंत पूर्ण केले आहे. वैदिक अध्ययनातील पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ आणि घनपाठ या प्रगत अध्ययन पद्धती पूर्ण करून त्यांनी वैदिक परंपरेतील सखोल प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच त्यांनी श्री कांची कामकोटी पीठम्, श्री शृंगेरी शारदा पीठम्, श्री वेदशास्त्र परिषद (राजमहेंद्रवरम्), श्री वेदशास्त्रोत्तेजक सभा (निजामाबाद), श्री वेदधर्मशास्त्र परिपालन सभा (कुंभकोणम्), श्री सख्याभिवर्धक निलय वेदशास्त्र परिषद (सरीपल्ली), श्री भाविस्मृत तत्त्वप्रसारण प्रतिष्ठान, श्री वादीराज मठ तसेच श्री रमणाश्रम (अरुणाचलम्) आदी नामांकित संस्थांच्या विविध परीक्षांमध्ये यश संपादन केले असून घनांत परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. त्यांच्या वैदिक कार्याची दखल घेत त्यांना सन २०२३ मधील “कांची महास्वामी पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. सध्या ते वैदिक अनुसंधान केंद्र, नागपूर येथे वेद अध्यापक म्हणून कार्यरत असून वैदिक ज्ञानाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. अमृत बीड जिल्हा कार्यालयात आयोजित सत्कार समारंभास बीड नगरपरिषदेतील नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, अमृतचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी, ॲड. अक्षय भालेराव, बालासाहेब निर्मळ, रोहित कुलकर्णी व राहुल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वे. मू. प्रथमेश निर्मळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “वेद ही भारताची अमूल्य ज्ञानपरंपरा असून तिचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. आधुनिक युगात वेदाध्ययनाकडे कल कमी होत असताना वे. मू. प्रथमेश निर्मळ यांच्यासारखे युवा वेदपाठी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या या यशामुळे अनेक युवकांना वेदाध्ययनाची प्रेरणा मिळेल आणि वैदिक परंपरेच्या संवर्धनाला नवे बळ प्राप्त होईल.” वे. मू. प्रथमेश निर्मळ यांची तिरुमला तिरुपती देवस्थानम् यांच्या प्रतिष्ठित वेद पारायण योजनेत झालेली निवड ही बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या या यशामुळे वैदिक परंपरेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment