विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले श्री अंबादेवी मंदिर हे केवळ श्रद्धास्थान न राहता धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.
विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले श्री अंबादेवी मंदिर हे केवळ श्रद्धास्थान न राहता धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. प्राचीन परंपरा, पौराणिक संदर्भ, मंदिराची वास्तुरचना आणि नवरात्रोत्सवातील उत्साह यामुळे अमरावतीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा हा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व: श्री अंबादेवी मंदिराचा उल्लेख जुन्या गॅझेटिअर्समध्ये आढळतो. मंदिराला भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या पौराणिक कथेशी जोडले जाते. प्रचलित आख्यायिकेनुसार, रुक्मिणीने विवाहापूर्वी देवीचे दर्शन घेतले आणि याच परिसरातून श्रीकृष्णाने तिला सोबत नेले, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिराला धार्मिकतेसोबतच पौराणिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. अमरावती शहराचे नावही अंबादेवी मंदिराशी संबंधित असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या इतिहासविषयक माहितीत नमूद आहे. त्यामुळे मंदिर हे शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग मानले जाते. प्राचीन वास्तुकलेचा अनुभव: मंदिर परिसरातील प्रवेशद्वार, शिल्पकला, कोरीवकाम आणि धार्मिक प्रतिमा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या वास्तूमध्ये पारंपरिक मंदिरशैलीसोबत विविध काळातील स्थापत्य प्रभाव दिसून येतात. गर्भगृहात अंबादेवीसह अन्य देवतांच्या मूर्ती असून मंदिर परिसरात ऐतिहासिक शिल्पकलेचे दर्शन घडते. नवरात्रोत्सवात भक्तीचा जल्लोष: नवरात्रोत्सव हा अंबादेवी मंदिरातील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत मंदिर परिसरात धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात मोठी यात्रा भरते आणि विविध भागांतून भाविक व पर्यटक अमरावतीत दाखल होतात. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात अंबादेवी मंदिर परिसराला विशेष पर्यटनाचे स्वरूप प्राप्त होते. अंबादेवीसोबत एकविरादेवीचेही दर्शन: अंबादेवी मंदिराच्या जवळच श्री एकविरादेवी मंदिर आहे. त्यामुळे अमरावतीला येणाऱ्या भाविकांना एकाच परिसरात दोन्ही देवींचे दर्शन घेता येते. नवरात्रोत्सवात दोन्ही मंदिरांमध्ये उत्सवाचे वातावरण असते. अंबादेवी मंदिरात कसे जाल? श्री अंबादेवी मंदिर हे अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी चौक परिसरात आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतून मंदिरापर्यंत पोहोचणे सोपे आहे. रेल्वेने : अमरावती रेल्वे स्थानकापासून मंदिर अंदाजे १ किलोमीटर पश्चिमेकडेआहे. स्थानकातून ऑटो, टॅक्सी किंवा स्थानिक वाहनाने सहज मंदिरापर्यंत पोहोचता येते. बसने : अमरावती बस स्थानकापासून मंदिर अंदाजे १.५ किलोमीटर अंतरावर आहे. बस स्थानकातून ऑटो, टॅक्सी किंवा इतर स्थानिक वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरून : बडनेरा रेल्वे स्थानकावर उतरून अमरावती शहराकडे येण्यासाठी टॅक्सी व इतर प्रवासी वाहतूक साधने उपलब्ध आहेत. विमानाने : अमरावतीसाठी जवळचे प्रमुख विमानतळ नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तेथून रस्तेमार्गे अमरावतीला येता येते. पर्यटकांसाठी का ठरतेय आकर्षण? अंबादेवी मंदिराला भेट देताना पर्यटकांना श्रद्धा, इतिहास, पौराणिक कथा, स्थापत्यकला आणि स्थानिक संस्कृती यांचा एकत्रित अनुभव मिळतो. मंदिराच्या परिसरात स्थानिक बाजारपेठही असल्याने धार्मिक पर्यटनासोबत स्थानिक खरेदीचा अनुभव घेता येतो. नवरात्रोत्सवात तर संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्सवी वातावरणाने भारून जातो. अमरावती शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी अंबादेवी मंदिरासोबत एकविरादेवी मंदिर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, छत्री तलाव आणि शहरातील इतर पर्यटनस्थळांनाही भेट दिल्यास अमरावतीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा समृद्ध अनुभव घेता येतो. अमरावतीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणारे श्री अंबादेवी मंदिर त्यामुळे भाविकांसोबतच इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठीही एक महत्त्वाचे आकर्षण ठरत आहे.
- संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment