श्रद्धेसोबतच ममत्व भावाचे संगोपन
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी होणारी नागपंचमी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. नागदेवतेची पूजा, घराघरातील धार्मिक विधी, महिलांचे झोके, पारंपरिक गाणी, मैत्रिणींच्या गप्पा आणि हास्य-विनोदाच्या मैफलींमुळे आज सर्वत्र नागपंचमीचा उत्साह अनुभवायला मिळत आहे. श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम घडवणारा हा सण समाजात निसर्गाविषयी आदराची भावना जागवतो.
भारतीय परंपरेनुसार नागदेवतेला भगवान शिव, भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाशी जोडले गेले आहे. पौराणिक कथांमध्ये सर्प हे भूमी, पर्जन्य आणि जीवनरक्षणाचे प्रतीक मानले गेले असल्याने नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि संकटांपासून संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते. शेतीप्रधान संस्कृतीत पावसाळ्यात सापांचे अस्तित्व अधिक जाणवत असल्याने मानव आणि निसर्ग यांच्यात सहअस्तित्वाची भावना रुजवण्यासाठीही या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
नागपंचमीची खरी रंगत मात्र महिलांच्या पारंपरिक उत्सवात पाहायला मिळते. गावागावांत झाडांना झोके बांधून महिला व मुली पारंपरिक ओव्या आणि श्रावणगीते गात झोके घेतात. सखी-सहेल्यांच्या भेटीगाठी, जुन्या आठवणी, कोडी, विनोद आणि हलकेफुलकी मजा-मस्करी यामुळे वातावरण आनंदाने भारून जाते. दैनंदिन धावपळीपासून दूर कुटुंबीय आणि मैत्रिणींना एकत्र आणणारा हा सण सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ करतो.
बदलत्या काळात झोक्यांच्या जागी सोशल मीडियावरील शुभेच्छा आणि विनोदी संदेशांची भर पडली असली, तरी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे, एकत्र हसणे आणि परंपरा जपणे यालाच आजही अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे नागपंचमी हा केवळ धार्मिक सण न राहता आनंद, आपुलकी आणि संस्कृतीचा उत्सव बनला आहे.
सापाचे अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील कीटक, डासांच्या अळ्या, घुशी यांवर साप नियंत्रण ठेवतो. एक धामण वर्षात शेकडो उंदीर- घुशी खाते. सापाचे उंदीर पकडण्याचे तंत्र परिणामकारक आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर या निसर्गमित्राला जपण्याबरोबरच सर्पाविषयी थोडी माहिती जाणून घेऊया-
भारतात २७५ प्रकारचे सर्प आहेत. जगातील एकूण सर्पसंख्येपैकी भारताचा वाटा ८.७ टक्के आहे. भारतातील २७५ सापांच्या जातींपैकी ६० विषारी, उर्वरित २१५ बिनविषारी आहेत. जागतिक आकडेवारीनुसार, जगातल्या तीन हजार ९७० सापांपैकी २८० साप विषारी, तर दोन हजार ८९० बिनविषारी आहेत. भारतातील विषारी साप तीन कुळांत विभागले आहेत. पैकी नाग, मण्यार हे विषारी इलापिडी कुळात मोडतात. नाग प्रकारातले पाच, मण्यार प्रकारातले १२ अशा १७ सापांचा या कुळात समावेश आहे. २२ पैकी १२ सापांच्या गटात ट्रायमेरेसरसमधील वेणुनाग, चापडा हे साप सापडतात. या गटातील अन्य साप पश्चिम घाट, पूर्वोत्तर हिमालयाच्या जंगलांत सापडतात.
संरक्षण आणि कायदे
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार साप पकडणे, बाळगणे, ठार करणे हा गुन्हा आहे. १९७५ चे निर्यात धोरण- वन्यजिवांपासून उत्पन्नाविषयीच्या कायद्यानुसार सापांना संरक्षण मिळवून देता येते.
बिनविषारी सर्प
बिनविषारी सापांची भारतात सात कुळे असून, यात वेगवेगळ्या गटांतील २१५ सापांचा समावेश आहे. यातील सर्वांत मोठे कुळ कोलूब्रिडी आहे. या कुळात ४३ गटांतील १५३ भारतीय सापांचा समावेश आहे. युरोपेल्टीडी कुळात सात गटांतील ३५ साप आहेत. यापैकी सर्वांत मोठा गट युरोपेल्टीस आहे. यात २० शिल्डटेल साप आहेत. हे साप पश्चिम घाट, दक्षिण भारतात सापडतात. टीप्लोपाईडीत दोन गटांतील १८ सापांचा समावेश आहे. यापैकी १६ साप टीप्लोप्स गटातील म्हणजे वाळा सर्प आहेत. अजगर, बोवा सापांचा समावेश असलेले बॉईडी कूळ. यात दोन अजगर, तीन बोवा साप आहेत.
सापांविषयी गैरसमज
सर्वच साप विषारी असतात
साप चावला तर मनुष्याचा मृत्यू होतो
साप दूध पितो
गाय, शेळीच्या कासेला तोंड लावून दूध पितो
नाग सापपुंगीच्या तालावर डोलतो
रात्री शीळ घातल्यानंतर किंवा साप असे म्हटल्यानंतर तो घरात येतो
केवडा, रातराणी, चाफा झाडांवर अस्तित्व असते, सापाला सुगंध आवडतो
साप सूड घेतात, पाठलाग करतात, डुख धरतात
पुनरुत्पादन
अंडी देणारे : नाग, मण्यार, अजगर, धामण
थेट पिलांना जन्म देणारे : घोणस, चापडा, हरणटोळ
वर्गीकरण
बिनविषारी : नानेटी, दिवड, धामण
निमविषारी : मांजऱ्या, हरणटोळ
विषारी : नाग, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्रसर्प
सापांचे संर्वधन करूया!
भारतीय संस्कृतीत सापांचे धार्मिक महत्त्व मानले जाते. वस्तुतः साप हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या कृषिप्रधान देशात तो शेतकऱ्यांचा निसर्गमित्र आहे. नागपंचमीच्या निमित्ताने केवळ त्याची पूजा न करता, केवळ साप दिसला म्हणून त्याला न मारता, त्याला जीवदान देऊन त्यांचे सरंक्षण व संवर्धन करायला हवे. त्यासाठी प्रबोधनही हवे.
या नागपंचमीला आपण आपली परंपरा तर जपूयाच पण त्याचबरोबर या निसर्गमित्राचे संवर्धनही करूया! कारण आपली संस्कृती सहजीवनावरच आधारलेली आहे.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment