एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ. कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?
आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन मुख्य फोटो
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन अतिरिक्त फोटो

जिवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ. कोण ही जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केले जाते आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

दिवा हे ज्ञानाचे, वृद्धिंगतेचे प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळलात तर त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता, म्हणूनच याला वंशवृद्धीचे प्रतीक मानतात. या प्रतीकाचे पूजन म्हणजेच दीपपूजन.

दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती.

जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा-जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध-बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते, त्याची कारण मिमांसा...

*प्रथम भगवान नरसिंह का?*

भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे, याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.

म्हणजेच...

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तींपासून बाळाचा बचाव करतात, जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी.

*त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-*

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीही श्रावणातील आराध्य दैवत आहेत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की, या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

म्हणजेच...

कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तींपासून, जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतो. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात, म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका.

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता आहेत. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृहद्रथ याला दोन राण्या होत्या. दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते. परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री नसल्यामुळे राजा चिंतीत होता. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतात परंतु केवळ अर्धे-अर्धे. अशा विचित्र आणि अर्धवट अब्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळी तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शकले सांधते. जरा ते सांधलेले अब्रक संध्यासमयी बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो, अशी ही जरा देवी. जराचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूला बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.


*प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती -*

बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेले आणि हातात चाबूक घेतलेले दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचे वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचे प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा, हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते.

बृहस्पतीचे वाहन वाघ - हे अहंकाराचे प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा, हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध-बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळाले.

प्रथम रक्षक देवता. नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणाऱ्या देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

श्रावण अमावास्येला हा कागद उपडा करून ठेवायचा व दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचा, अशी प्रथा आहे; श्रावणा नंतर मुलांना तो दिसता कामा नये.

-संकलन हृषीकेश वैद्य

Publisher: माया रत्नपारखी- खेत्रे News publisher name | Date: 14-08-2026 News publication date | Time: 01:05 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news
Publisher: माया रत्नपारखी- खेत्रे News publisher name | Date: 14-08-2026 News publication date | Time: 01:05 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement