बीडच्या भूमीवर घडलेला मराठा सामर्थ्याचा पुनर्जन्म - राक्षसभुवनची लढाई

महाराष्ट्राच्या इतिहासात पानिपतचे युद्ध जितके प्रसिद्ध आहे, तितकीच महत्त्वाची पण तुलनेने कमी चर्चिली गेलेली एक लढाई म्हणजे राक्षसभुवनची लढाई.

बीडच्या भूमीवर घडलेला मराठा सामर्थ्याचा पुनर्जन्म - राक्षसभुवनची लढाई      मुख्य फोटो
बीडच्या भूमीवर घडलेला मराठा सामर्थ्याचा पुनर्जन्म - राक्षसभुवनची लढाई      अतिरिक्त फोटो

महाराष्ट्राच्या इतिहासात पानिपतचे युद्ध जितके प्रसिद्ध आहे, तितकीच महत्त्वाची पण तुलनेने कमी चर्चिली गेलेली एक लढाई म्हणजे राक्षसभुवनची लढाई. १० ऑगस्ट १७६३ रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या राक्षसभुवन येथे मराठे आणि हैदराबादचा निजाम यांच्यात ही घनघोर लढाई झाली. या युद्धाने केवळ एक लढाई जिंकली नाही, तर पानिपतच्या पराभवानंतर खचलेल्या मराठा साम्राज्याला नवसंजीवनी दिली.

आज राक्षसभुवनचे नाव अनेकांना माहीत नसले तरी मराठा इतिहासाच्या दृष्टीने हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याच भूमीवरून मराठा साम्राज्याच्या पुनरुत्थानाची खरी नांदी झाली. पानिपतचा आघात आणि संकटात सापडलेले साम्राज्य-

१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा मोठा पराभव झाला. हजारो सैनिक मारले गेले, अनेक नामवंत सरदार गमावले गेले आणि संपूर्ण साम्राज्यावर दुःखाची छाया पसरली. त्याच वर्षी नानासाहेब पेशव्यांचेही निधन झाले. अशा अत्यंत कठीण काळात अवघ्या सोळा वर्षांच्या थोरल्या माधवराव पेशव्यांवर पेशवाईची वस्त्रे आणि राज्यकारभाराची मोठी जबाबदारी आली.

मराठा साम्राज्य कमकुवत झाले आहे असा गैरसमज अनेक शत्रूंनी करून घेतला. त्यात उदगीरच्या युद्धात झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी हैदराबादच्या निजाम अलीने संधी पाहिली. मराठा दरबारातील दुहीचा फायदा घेत निजामाने थेट पुण्याच्या रोखाने चाल करून उरुळी, पाटस परिसरात जाळपोळ केली, पर्वतीच्या मूर्तींची तोडफोड केली आणि प्रचंड लुटालूट केली. मल्हारराव होळकरांची मुत्सद्देगिरी आणि मराठ्यांची एकजूट-

रघुनाथराव दादासाहेब आणि थोरले माधवराव पेशवे यांच्यातील मतभेदांमुळे अनेक मराठा सरदार नाराज होऊन निजामाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे निजामाचे पारडे जड झाले होते. या अत्यंत बाका प्रसंगी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मराठेशाहीतील फूट भरून काढण्याची मोठी कामगिरी केली.

निजामाचे यश हे मराठ्यांच्या आपापसातील फुटीवर अवलंबून आहे हे ओळखून मल्हाररावांनी साम, दाम, दंड, भेद या उपायांनी जानोजी भोसले, भवानराव प्रतिनिधी, पिराजी नाईक निंबाळकर व घारघुडे यांची समजूत काढली. फुटलेले सरदार माघारी फिरले आणि सर्व मराठी दल पुन्हा एकदा एकत्र आले. नेतृत्व, रणनीती आणि 'साडेतीन शहाणे'-

मराठेशाहीच्या इतिहासात मुत्सद्देगिरीसाठी 'साडेतीन शहाणे' प्रसिद्ध मानले जात. त्यात सखारामबापू बोकील, देवाजीपंत चोरघडे आणि निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर (राजा प्रतापवंत) हे तीन पूर्ण शहाणे, तर नाना फडणीस यांना अर्धा शहाणा मानले जाई.

यातील निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर हा केवळ मुत्सद्दी नसून प्रत्यक्ष रणांगणात लढणारा निष्णात शस्त्रधारी योद्धा होता. त्याच्याच सल्ल्याने निजामाने मराठ्यांशी वैर ताणले होते. दुसरीकडे, तरुण श्रीमंत माधवराव पेशवे आणि त्यांचे काका रघुनाथराव (राघोबादादा) यांनी या युद्धाचे नेतृत्व सांभाळले. रघुनाथरावांचा लष्करी अनुभव आणि तरुण माधवरावांचे शौर्य यामुळे मराठा सैन्यात नवा उत्साह संचारला. गोदावरीचा पूर आणि ऐन मोक्याची रणनीती- ऑगस्ट १७६३ च्या सुरुवातीला पावसाळ्याचे दिवस असल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आला होता. ९ ऑगस्ट रोजी मराठ्यांच्या फौजा माजलगाव परिसरात असताना त्यांना निजामाचे लष्कर राक्षसभुवन येथे असल्याची बातमी मिळाली.

१० ऑगस्ट रोजी निजामाचा एक मोठा लष्करी दोष मराठ्यांच्या लक्षात आला. निजाम अली स्वतः काही तोफा, बाजारबुणगे आणि निम्म्या सैन्यासह गोदावरी पार करून पैलतीरावर निघून गेला होता. परंतु त्याचा मुख्य तोफखाना, गारदी आणि ७ ते ८ हजारांचे सैन्य घेऊन दिवाण विठ्ठल सुंदर अलीकडच्या तीरावर (राक्षसभुवनच्या बाजूला) अडकला होता. गोदावरीच्या पुरामुळे निजामाचे सैन्य दोन भागांत विभागले गेले. ऐन मोक्याच्या वेळी शत्रूची झालेली ही दोन शकले पाहून मराठ्यांनी तातडीने निर्णायक हल्ल्याची योजना आखली. १० ऑगस्ट १७६३ : विजयाचा दिवस-

१० ऑगस्ट १७६३ रोजी सकाळी दीड प्रहराच्या सुमारास 'हर हर महादेव'च्या गर्जनेने मराठ्यांनी विठ्ठल सुंदरच्या सैन्यावर तुफान हल्ला चढवला. आबा पुरंदरे आणि हुजूरपागेच्या सरदारांनी आघाडी सांभाळली. युद्धाच्या सुरुवातीलाच निजामाच्या दारूखान्याला आग लागल्याने त्यांच्या फौजेत गोंधळ उडाला.

रघुनाथराव दादासाहेब हत्तीवर बसून सैन्याची टोळी घेऊन शत्रूच्या मध्यभागी घुसले. परंतु निजामी सैन्याने त्यांना चोहोबांजूंनी वेढल्यामुळे ते शत्रूच्या हाती लागण्याची परिस्थिती निर्माण झाली. ही आणीबाणीची वेळ ओळखून श्रीमंत माधवराव पेशव्यांनी स्वतः हुजुरातीची फौज घेऊन आणि मल्हारराव होळकरांनी कुमक पाठवून दादासाहेबांची सुरक्षित सोडवणूक केली.

त्यानंतर सर्व मराठी सरदारांनी चोहोकडून तुफान हल्ले चढवले. या घनघोर धुमश्चक्रीत मराठा सरदार महादजी शितोळे आणि होळकरांच्या सैन्याने गाजवलेल्या पराक्रमामुळे विठ्ठल सुंदर मारला गेला. त्याचा पुतण्या विनायकदास व राजा गोपाळसिंग हेही ठार झाले. सेनापती मारला गेल्याचे समजताच निजामाच्या सैन्याची दाणादाण उडाली. नदीपलीकडचा निजाम पूर आलेल्या गोदावरीमुळे मदतीला येऊ शकला नाही आणि उघड्या डोळ्यांनी आपल्या सैन्याचा पराभव पाहत राहिला. विजयाचे परिणाम आणि ऐतिहासिक महत्त्व-

या युद्धात मराठ्यांनी निजामाचे १५ हत्ती, २५ तोफा आणि प्रचंड युद्धसाहित्य ताब्यात घेतले. औरंगाबादचा सुभेदार मुरादखान आणि एलिचपूरचा अजमलखान यांसारखे निजामाचे २२ प्रमुख सरदार कैद झाले. पानिपतनंतर खचलेल्या मराठा सैन्याला या विजयाने जबरदस्त आत्मबळ दिले. मराठे अजूनही भारतवर्षात सर्वोच्च लष्करी ताकद आहेत, हा स्पष्ट संदेश संपूर्ण भारताला मिळाला.

पेशवेपद स्वीकारल्यानंतर हातात तलवार घेऊन थेट रणांगणात लढलेली ही थोरल्या माधवराव पेशव्यांची पहिलीच लढाई होती. माधवरावांच्या पराक्रमाचे कौतुक करताना राघोबादादांनी गोपिकाबाईंना पत्रात लिहिले होते, "चिरंजीव रायांनी यंदा मेहनतीत व शिपाईगिरीत आम्हापेक्षा अधिक केले. त्यांच्या पुढे कर्तेपणाचा भरवसा आम्हास आला."

या पराभवानंतर २४ ते २५ सप्टेंबर १७६३ दरम्यान औरंगाबादचा प्रसिद्ध तह (नेऊरगाव-भालकीचा तह) झाला. निजामाने भालकी, नेऊरगाव, लिंबागणेश या भागांसह सुमारे ८२ लाख ते १ कोटी रुपयांचा मुलुख मराठ्यांना देऊन शरणागती पत्करली. या दणक्यामुळे निजामाने पुढील अनेक वर्ष मराठ्यांविरुद्ध डोके वर काढण्याची हिम्मत केली नाही. बीड जिल्ह्याचा ऐतिहासिक व धार्मिक अभिमान बीड जिल्ह्याला संतांची, समाजसुधारकांची, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक घटनांची देदीप्यमान परंपरा लाभली आहे. राक्षसभुवन हे महाराष्ट्रातील शनिदेवाचे आद्यपीठ (प्रथम पीठ) म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. गोदावरीच्या पवित्र संगमावर असलेल्या या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या भूमीवर झालेली राक्षसभुवनची लढाई ही इतिहास आणि संस्कृतीचा अपूर्व संगम दर्शवते. आजही राक्षसभुवन येथे पुराभिमूख महादेव मंदिरासमोर (दादेश्वर मंदिर) विठ्ठल सुंदरची ऐतिहासिक छत्री (स्मारक) पाहायला मिळते, जी या ऐतिहासिक युद्धाची साक्ष देते. ज्या भूमीवर पराभवाच्या राखेतून मराठा साम्राज्यामध्ये नव्या चैतन्याची फुंकर घातली गेली, तो इतिहास जतन करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. १० ऑगस्ट हा दिवस पराभवातून पुन्हा जिद्दीने उभे राहण्याच्या मराठी बाण्याचा आणि धैर्याचा प्रेरणादायी प्रतीक आहे. - विशाल जोशी संदर्भ साहित्य (References): १. मराठी रियासत (खंड ६ : छत्रपती रामराजा व निग्राहक माधवराव) - गोविंद सखाराम सरदेसाई २. ऐतिहासिक लेखसंग्रह (भाग २) - वासुदेव वामनशास्त्री खरे ३. होळकरशाहीचा इतिहास (खंड १) - वा. वा. ठाकूर व डॉ. देवीदास पोटे ४. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास - द. वि. आपटे आणि रा. वि. ओतूरकर ५. नागपूर प्रांताचा इतिहास - यादव माधव काळे ६. पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक ७. माधवराव पेशवा : विजय आणि व्यथा - डॉ. उदय कुलकर्णी (अनुवाद : विजय बापये) ८. मराठ्यांची शौर्यगाथा - राक्षसभुवन लढाई - डॉ. अशोक बांगर प्रतिमा संदर्भ - विश्व संवाद केंद्र (देवगिरी प्रांत)

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 09-08-2026 News publication date | Time: 12:39 PM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 09-08-2026 News publication date | Time: 12:39 PM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement