६ ऑगस्ट २०२६ रोजी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून (ITR) हे प्रक्षेपण करण्यात आले. या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष अत्यंत अचूकतेने पूर्ण केले.
भारताने आपल्या लष्करी सामर्थ्यात आणखी एक ऐतिहासिक भर घालत 'अग्नी-४' (Agni-4) या अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. ६ ऑगस्ट २०२६ रोजी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून (ITR) हे प्रक्षेपण करण्यात आले. या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष अत्यंत अचूकतेने पूर्ण केले.
स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडकडून युझर ट्रायल यशस्वी- संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही चाचणी भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या देखरेखीखाली पार पडली. लष्कराची ऑपरेशनल सज्जता तपासण्यासाठी नियमित घेतल्या जाणाऱ्या युझर ट्रायल्सचा (User Trials) हा एक भाग होता. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात आपले नियोजित लक्ष्य अचूकपणे गाठले.
शत्रूची झोप उडवणारी 'अग्नी-४' ची वैशिष्ट्ये:
मारक क्षमता: हे दोन टप्प्यांचे, घन इंधनावर चालणारे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र असून त्याची क्षमता ४,००० किलोमीटरपर्यंत आहे. चार हजार किलोमीटरच्या मारक क्षमतेचा थेट अर्थ असा आहे की, भारत आता संपूर्ण दक्षिण आशियासह चीनच्या अतिदुर्गम भागांपर्यंत अचूक निशाणा साधू शकतो. 'क्विक रिस्पॉन्स टाईम' हे या क्षेपणास्त्राचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य आहे. घन इंधनाचा वापर होत असल्यामुळे हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी वेळेत तयार करून मोबाईल लाँचरवरून डागता येते, म्हणजेच आणीबाणीच्या परिस्थितीत शत्रूला सावरण्याची कोणतीही संधी मिळणार नाही.
वजन आणि लांबी: या क्षेपणास्त्राची लांबी सुमारे २० मीटर असून त्याचे वजन साधारण १७ टन आहे.
अण्वस्त्र क्षमता: हे क्षेपणास्त्र १,००० किलो ग्रॅमपर्यंतची पारंपरिक तसेच अण्वस्त्रे वाहून नेण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
हायटेक तंत्रज्ञान: यामध्ये अत्याधुनिक 'रिंग लेझर गायरो आधारित नॅव्हिगेशन सिस्टीम' (RINS) आणि डिजिटल कॉम्प्युटर यंत्रणा बसवली आहे.
मोबिलिटी: हे क्षेपणास्त्र रस्त्यावरून धावत्या मोबाईल लाँचरवरूनही डागता येते, ज्यामुळे युद्धकाळात याची हालचाल करणे सोपे जाते.
संरक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन- या ऐतिहासिक यशानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड' (SFC) आणि DRDO च्या शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.
अग्नी मालिकेतील ही चाचणी भारताच्या "विश्वासार्ह किमान प्रतिबंधक" (Credible Minimum Deterrence) धोरणाला अधिक बळकटी देणारी ठरेल, असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment