हिंदवी स्वराज्याचे अजिंक्य सेनानी, अद्वितीय रणनितीकार आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचे शिल्पकार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त विभागस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ३१ जुलै रोजी अमृत मुख्यालय,पुणे येथे करण्यात आले होते.
"इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचाही असतो!" या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत अमृत – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे अजिंक्य सेनानी, अद्वितीय रणनितीकार आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचे शिल्पकार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त विभागस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ३१ जुलै रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.नरेंद्र पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. गोविंदराव कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. तर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मा.श्री. पांडुरंग बलकवडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
मा.पांडुरंग बलकवडे यांनी त्यांच्या मनोगतात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्यगाथा, त्यांच्या विलक्षण युद्धनीती आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारामागील प्रेरणादायी इतिहासावर प्रकाश टाकला. त्यांनी पुढे या स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले की, “इतिहासाचा हा अमुल्य वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ह्या उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे. विद्यार्थी, इतिहासप्रेमी, संशोधक आणि युवकांसाठी हा उपक्रम प्रेरणेचा नवा अध्याय ठरणार आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून केवळ इतिहासाची उजळणीच नव्हे, तर बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमातून नेतृत्व, धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार युवकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आजच्या डिजिटल युगात इतिहास नव्या माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने पारंपरिक निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसोबतच रील (Reel) स्पर्धेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे युवकांना आपल्या सर्जनशीलतेतून इतिहास नव्या पद्धतीने मांडण्याची संधी मिळणार आहे. इतिहासाचा अभ्यास हा केवळ परीक्षेपुरता मर्यादित न राहता तो जीवनमूल्ये, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी घडविणारा ठरावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले, आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ सेनानींपैकी एक मानले जातात. त्यांचे धैर्य, दूरदृष्टी, राष्ट्राभिमान आणि विजिगीषू वृत्ती आजच्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभी राहावी, यासाठीच हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.”
या प्रसंगी बोलताना अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदराव कुलकर्णी यांनी अमृतच्या कार्याची प्रशंसा केली. केवळ एकाच समाजाचा विकास एवढाच मर्यादित उद्देश न ठेवता ,अमृतच्या माध्यमातून सर्व समाजाचा विकास ह्या व्यापक ध्येयाने अमृत काम करत आहे,हे खरंच प्रशंसनीय आहे. असे ते म्हणाले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले की, “ छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज, अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांनी कोणत्याही एका विशिष्ट समाजाच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-समाजासाठी कार्य केले. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपले अवघे आयुष्य खर्च केले. खरंतर आजच्या काळात हीच समरसता अपेक्षित आहे. अमृत या दिशेनेच खऱ्या अर्थाने काम करत आहे. विविध समाजांसाठी वेगवेगळी महामंडळे असली तरी या सर्व महामंडळांनी एकत्रितपणे काम केले तरच समस्त समाजाची अपेक्षित प्रगती होणार आहे. अमृत संस्थेने मात्र यासाठी पुढाकार घेतला आहे,ही अत्यंत आनंदाची बाब आहे.यासाठी मी मा.जोशी सरांचे अभिनंदन करतो. सरकारने खरोखरच समाजातील विविध संस्थांना एका मंचावर आणण्याची गरज आहे” त्यांनी अमृतच्या विशेषत: अमृत इ.व्ही.चार्जिंग स्टेशन, घनकचरा व्यवस्थापन, उद्योजकता विकास कार्यक्रम आदी योजनांची दखल घेतली. भविष्यात अमृतसोबत विविध उपक्रम राबविण्याची आणि अमृतला सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमृत संस्थेचे मा.व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय जोशी यांनी आपल्या मनोगतात अमृत संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास, अमृतच्या विविध योजना-उपक्रम, त्यांना समाजाकडून मिळणारा प्रतिसाद, या स्पर्धेमागचा उद्देश, अशा उपक्रमांची समाजाला असणारी गरज स्पष्ट केली. समाजातील इतर संस्थांनी परस्परपूरक काम करण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
यावेळी अमृत पराक्रम दिन स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून ज्या फ्रेम्स दिल्या जाणार आहेत त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात मा.रमेश भागवत ( इतिहास तज्ञ, अमृत पराक्रम दिन समिती सदस्य), मा.जगन्नाथ लडकत ( इतिहास तज्ञ, अमृत पराक्रम दिन समिती सदस्य),मा.काकासाहेब विधाते (ज्येष्ठ इतिहास तज्ञ, अमृत पराक्रम दिन समिती सदस्य-ऑनलाईन उपस्थिती), मा.मोहन शेटे (इतिहास तज्ञ, अमृत पराक्रम दिन समिती सदस्य), मा.प्रशांत गोऱ्हे ( इतिहास अभ्यासक), मा.शिवप्रकाश मंत्री( इतिहास अभ्यासक) यांची विशेष उपस्थिती होती.
या स्पर्धेचे सगळे तपशील,स्पर्धेचे स्वरूप,विषय,नियम व अटी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. आपल्या या गौरवशाली इतिहासाचा वारसा पुढे नेण्यासाठी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पराक्रम दिन वेबसाईट लिंक- https://parakramdin.mahaamrut.org.in
अमृत अधिकृत संकेत स्थळ - www.maharashtra.org.in
Comments 1 Comments
Somnath Puranik
अमृत संस्थेमुळे गरजुना आर्थीक सहाय्य मीळत आहे शिवाय आवश्यक प्रशिक्षण सुद्धा मीळत आहे त्यामुळे निश्चितच अधिकाधिक व्यवसायिक तयार होतील
संधी मीळाल्यास या उपक्रमात सहभागी होण्यास नक्कीच आवडेल
धन्यवाद
सोमनाथ पुराणिक 9764271873
Write a Comment