"इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचाही असतो!" या प्रेरणादायी विचाराला केंद्रस्थानी ठेवत अमृततर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या १८ ऑगस्ट यादिवशीच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय विभागनिहाय निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ३१ जुलै करण्यात आले आहे.
"इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचाही असतो!" या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत अमृत – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे अजिंक्य सेनानी, अद्वितीय रणनितीकार आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचे शिल्पकार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त विभागस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ३१ जुलै, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. इतिहासाचा हा अमुल्य वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ह्या उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे. विद्यार्थी, इतिहासप्रेमी, संशोधक आणि युवकांसाठी हा उपक्रम प्रेरणेचा नवा अध्याय ठरणार आहे. अमृत मुख्यालय ,महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध , पुणे येथे होणाऱ्या या भव्य सोहळ्यात इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा संगम अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून केवळ इतिहासाची उजळणीच नव्हे, तर बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमातून नेतृत्व, धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार युवकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदराव कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री. पांडुरंग बलकवडे हे प्रमुख वक्ते म्हणून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्यगाथा, त्यांच्या विलक्षण युद्धनीती आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारामागील प्रेरणादायी इतिहासावर प्रकाश टाकणार आहेत. आजच्या डिजिटल युगात इतिहास नव्या माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने पारंपरिक निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसोबतच रील (Reel) स्पर्धेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे युवकांना आपल्या सर्जनशीलतेतून इतिहास नव्या पद्धतीने मांडण्याची संधी मिळणार आहे. इतिहासाचा अभ्यास हा केवळ परीक्षेपुरता मर्यादित न राहता तो जीवनमूल्ये, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी घडविणारा ठरावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले, आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ सेनानींपैकी एक मानले जातात. त्यांचे धैर्य, दूरदृष्टी, राष्ट्राभिमान आणि विजिगीषू वृत्ती आजच्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभी राहावी, यासाठीच हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, इतिहासप्रेमी नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.
"अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे जीवन म्हणजे पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाचा अखंड प्रेरणास्रोत आहे. त्या तेजस्वी इतिहासाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न निश्चितच इतिहासप्रेमींसाठी संस्मरणीय ठरेल,"असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. इतिहासाच्या स्मृती जागविणारा, राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा आणि युवकांना नव्या विचारांची दिशा देणारा हा उपक्रम पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्यांपैकी एक ठरणार आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment